संत ज्ञानेश्वर महाराज
ज्ञानेश्वर यांचा जन्म १२७५ साली पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे झाला. आळंदी हे गाव पुण्याच्या उत्तरेस आहे. ज्ञानेश्वर यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रखमाबाई असे होते. विठ्ठलपंत यांच्या वडिलांचे नाव गोविंदपंत असे होते. ज्ञानेश्वरांचे घराणे पैठण येथील आपेगावचे पिढीजात कुळकर्णी होते तर ज्ञानेश्वरांची आई रखमाबाई यांचे वडील सिद्धोपंत हे आळंदी येथील कुळकर्णी होते.
महाराष्ट्र राज्यास प्राचीन अशी संत परंपरा आहे. संतांनी समाजास बोध करून एक चांगला मनुष्य म्हणून जगण्याचे नियम सांगितले. महाराष्ट्रातील महान संतांपैकी एक म्हणजे संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर हे मराठीतील आद्य कवींपैकी एक मानले जातात.
ज्ञानेश्वर यांचा जन्म १२७५ साली पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे झाला. आळंदी हे गाव पुण्याच्या उत्तरेस आहे. ज्ञानेश्वर यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रखमाबाई असे होते. विठ्ठलपंत यांच्या वडिलांचे नाव गोविंदपंत असे होते. ज्ञानेश्वरांचे घराणे पैठण येथील आपेगावचे पिढीजात कुळकर्णी होते तर ज्ञानेश्वरांची आई रखमाबाई यांचे वडील सिद्धोपंत हे आळंदी येथील कुळकर्णी होते.
ज्ञानेश्वर यांचे वडील विठ्ठलपंत हे लहानपणापासून विठ्ठलभक्त होते व लग्न झालेले असताना तरुणपणात त्यांना वैराग्य प्राप्त होऊन त्यांनी काशी येथील रामानंदस्वामी यांच्याकडून गुरुदीक्षा घेऊन संन्यासाश्रम स्वीकारला. विवाहित पुरुषास संन्यासाश्रम स्वीकारायचा असेल तर पत्नीची पूर्वपरवानगी घेण्याचा नियम त्याकाळी होता मात्र विठ्ठलपंत यांनी रखमाबाई यांची परवानगी घेतली नव्हती.
एकेदिवशी रामानंदस्वामी तीर्थाटन करीत असताना आळंदी येथे आले व यावेळी आळंदी क्षेत्र पाहत असताना त्यांना रखमाबाई पिंपळास प्रदक्षिणा घालीत असताना दिसल्या. रामानंद स्वामींना याची कल्पना नव्हती की रखमाबाई या विठ्ठलपंत यांच्या पत्नी आहेत.
रामानंदस्वामी तेथे पोहोचले तेव्हा रखमाबाई यांनी त्यांना नमस्कार केला तेव्हा रामानंदस्वामी यांनी त्यांना 'पुत्रवती भव' असा आशीर्वाद दिला. यावेळी पतीने सन्यास घेतल्याचे रखमाबाई यांनी रामानंदस्वामी यांना सांगितले. आपण संन्यासाश्रमाची दीक्षा दिलेला आपला शिष्य विठ्ठलपंत हेच रखमाबाई यांचे पती हे रामानंदस्वामी यांना समजले व पत्नीची अनुमती न घेताच त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारल्याचे समजल्यावर रामानंदस्वामी यांनी विठ्ठलपंत यांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा केली.
गुरुची आज्ञा मानून विठ्ठलपंत आळंदीस आले व पुन्हा गृहस्थाश्रमी बनले. पुढे त्यांना चार मुले झाली निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई. विठ्ठलपंत यांनी सन्यास सोडून गृहस्थाश्रम स्वीकारल्यावर या मुलांचा जन्म झाला म्हणून मुलांचे मुंज इत्यादी संस्कार आळंदी येथील पुरोहितांनी नाकारले व पैठण येथे जाऊन तेथील शास्त्रसंपन्न ब्राह्मणांची सामंती आणावयास सांगितली.
विठ्ठलपंत पैठण येथे गेले मात्र पैठण येथील ब्राह्मणांनीही मुलांना कोणत्याही संस्काराचा अधिकार नाही असा निर्णय दिला. याच काळात ज्ञानेश्वर यांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून आपल्याला असलेल्या ईश्वरी आशीर्वादाची प्रचिती सर्वांना करून दिली.
पुढे चारही भावंडानी तीर्थयात्रा सुरु केली व तीर्थयात्रा करून आळंदी येथे प्रस्थान केले. वाटेत नेवासे हे क्षेत्र लागते त्याठिकाणी एका मंदिरात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाचे लिखाण केले. ज्ञानेश्वरांनी ज्या खांबास टेकून ज्ञानेश्वरी लिहिली तो खांब आजही नेवासे येथील मंदिरात आहे.
आळंदी येथे आल्यावर ज्ञानेश्वर यांनी अमृतानुभव व पासष्टी या दोन ग्रंथांचे लिखाण केले. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील मराठी टीका असून तिचे मूळ नाव भावार्थ दीपिका असे आहे. भग्वद्गीतेमध्ये जसे १८ अध्याय आहेत तसेच १८ अध्याय ज्ञानेश्वरी मध्येसुद्धा आहेत. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्वाचा मानला जातो व या ग्रंथांची पारायणे केली जातात. निरूपण हा विषय ज्ञानेश्वरीने फार उत्तम रित्या मांडल्याने हा ग्रंथ आजही सर्वसामान्यांना प्रभावित करतो.
अशाप्रकारे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव व पासष्टी हे तीन बहुमोल ग्रंथ व संतकार्य केल्यावर ज्ञानेश्वरांनी १२९६ साली म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली मात्र ७०० वर्षांहून अधिक काळ लोटल्यावरही ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज यांचे विचार अजूनही चिरंजीव आहेत.