शिवकर बापूजी तळपदे - विमानाचा शोध लावणारे आद्य वैज्ञानिक

मानवजातीस उपयुक्त ठरलेल्या विमानाच्या शोधाचे जनकत्व राईट बंधूना जाते मात्र राईट बंधूंपूर्वी एका भारतीय मराठी वैज्ञानिकाने भारतीय ग्रंथांचा परिपूर्ण अभ्यास करून विमानाचा शोध लावून त्याचे यशस्वी उड्डाण करून दाखवले होते हे फार कमी जणांना माहित आहे.

शिवकर बापूजी तळपदे - विमानाचा शोध लावणारे आद्य वैज्ञानिक

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

मानवजातीच्या विकासास जे अनेक शोध कारणीभूत ठरले त्यापैकी अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे विमान. विमानाच्या शोधामुळे जगातील सर्व राष्ट्रे एकमेकांच्या जवळ आली. व्यापार आणि दळणवळणात वाढ होऊन मानवाची व राष्ट्रांची प्रगती झाली. अत्यंत कमी काळात एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करणे शक्य झाले.

अशा या मानवजातीस उपयुक्त ठरलेल्या विमानाच्या शोधाचे जनकत्व राईट बंधूना जाते मात्र राईट बंधूंपूर्वी एका भारतीय मराठी वैज्ञानिकाने भारतीय ग्रंथांचा परिपूर्ण अभ्यास करून विमानाचा शोध लावून त्याचे यशस्वी उड्डाण करून दाखवले होते हे फार कमी जणांना माहित आहे.

हे वैज्ञानिक म्हणजे शिवकर बापूजी तळपदे. शिवकर तळपदे यांचा जन्म १८६४ साली झाला. बालपणापासूनच त्यांच्यात शोधक वृत्ती असल्याने जुन्या ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील रहस्ये जी कलियुगात प्रत्यक्षात आणून मानवजातीचे कल्याण कसे करता येईल या कडे त्यांचा कल असे.

विमानविद्या हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय आणि पुरातन भारतीय ग्रंथांत विमानांची वर्णने असल्याने भारतीयांना विमानविद्या ही पूर्वी अवगत असावी मात्र कालांतराने या विद्येचा विसर लोकांना पडला असावा अशी त्यांची खात्री होऊन त्यांनी पुन्हा एकदा प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून आधुनिक युगात विमानविद्या पुनर्जीवित करण्याचा दृढनिश्चय केला आणि ते झपाट्याने विमानविद्येच्या व्यासंगास लागले. 

शिवकर तळपदे यांनी स्वतः संस्कृत भाषेत पांडित्य प्राप्त केले असल्याने त्यांनी अनेक दुर्मिळ ग्रंथ शोधून त्यामधील विमानांची वर्णने संग्रहित केली. या कामी त्यांना त्यांचे मित्र व संस्कृत पंडित सुब्बय्या शास्त्री यांनी मोलाची मदत केली.

सुबय्या शास्त्री यांनी संस्कृत भाषेत अनेक ग्रंथ लिहिले होते व त्यांच्याकडे संदर्भ सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची शिवकर तळपदे यांना मोलाची मदत झाली.

अशाप्रकारे प्रचंड मेहनत करून शिवकर तळपदे यांनी पहिल्या भारतीय विमानाचा आराखडा तयार केला. आराखडा आणि योजना जरी तयार झाली असली तरी विमान प्रत्यक्षात तयार करण्याकरिता प्रचंड खर्च लागणार होता व यावेळी शिवकर तळपदे यांच्या डोळ्यासमोर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड आले कारण त्या काळात सयाजीराव गायकवाड हेच आपल्याला या कामी राजाश्रय देऊन या प्रकल्पाचा आर्थिक खर्चाचा भार हलका करू शकतील अशी तळपदे यांना खात्री होती.

सयाजीराव गायकवाड हे स्वतः सर्व कलांना आश्रय देणारे व विज्ञानप्रेमी असल्याने त्यांनी तळपदे यांना सढळ हस्ते मदत केली आणि तळपदे यांनी पूर्णपणे भारतीय असे एक विमान तयार केले व त्यास मरुतसखा हे नाव दिले. मरुत म्हणजे हवा आणि सखा म्हणजे मित्र या शब्दांचा संयोग करून हवेचा मित्र असा या नावाचा सार्थ अर्थ होत होता.

अशा प्रकारे जगातील पहिल्या विमानाची निर्मिती झाल्यावर तळपदे यांनी १८९५ साली मुंबईच्या चौपाटीवर विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक संपूर्ण जगाला दाखवण्याची योजना केली. जगातील पहिल्या विमानाचे उड्डाण पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. खुद्द सयाजीराव गायकवाड, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे आणि इतर अनेक मान्यवर हे प्रात्यक्षिक पाहण्यास मुंबईच्या चौपाटीवर आले होते.

तळपदे यांनी तयार केलेले मरुतसखा हे मानव विरहित विमान होते आणि तळपदे यांनी विमानउड्डाणाचे प्रात्यक्षिक सुरु केले आणि पाहता पाहता मरुतसखा विमान आकाशात झेपावले आणि तब्बल १५०० फूट उंचीपर्यंत त्याने उड्डाण करून या विमानाने विमानविद्येत एक मापदंड प्रस्थापित केला.

शिवकर बापूजी तळपदे यांनी केलेल्या प्रयोगाचे सर्व स्तरातून प्रचंड कौतुक झाले. या प्रयोगामुळे भारताचे नाव जगभरात गेले. लोकमान्य टिळक संपादित केसरी व इतर अनेक वृत्तपत्रांत या विषयी ठळक बातमी प्रकाशित झाली होती.

शिवकर बापूजी तळपदे यांच्या शोधाचे वैशिट्य हे की विमानाची वर्णने प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये असली तरी ती तयार कशी करावीत याची माहिती त्यामध्ये नव्हती त्यामुळे फक्त वर्णन पाहून पूर्णपणे स्वतःच्या क्षमतेने हवेत उडणारे विमान विकसित करणे ही त्याकाळी अत्यंत कठीण अशी बाब होती मात्र तळपदे या मध्ये यशस्वी  झाले.

महाराजा सयाजीराव गायकवाड आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी तळपदे यांचे खूप कौतुक केले. खरे तर तळपदे यांनी लावलेल्या या शोधानंतर त्यांना जागतिक स्तरावर मान मिळायला हवा होता मात्र त्याकाळी भारतावर ब्रिटिश राजवट होती आणि एका भारतीय माणसाने पाश्चिमात्य देशांच्या नाकावर टिचून विमानाचा शोध लावणे ब्रिटिशांना पचले नाही आणि त्यांनी या प्रयोगात अडथळे आणायचे ठरवले.

शिवकर तळपदे यांचे कार्य बंद व्हावे म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना अटक केले आणि त्यांना मनोरुग्ण ठरवले. न्यायमूर्ती रानडे, सयाजीराव गायकवाड आणि इतर मान्यवर व्यक्तींनी ब्रिटिश सरकारवर दबाव आणून तळपदे यांची सुटका करवली मात्र या घटनेनंतर तळपदे पूर्णतः खचले कारण एका संशोधकास मनोरुग्ण ठरवून कारावास भोगावा लागणे हे त्यांच्या मनास सहन होण्यासारखे नव्हते.

तळपदे यांना पुढील संशोधनासाठी कुणीच मदत करू नये यासाठी ब्रिटिश सरकारने अनेक लोकांवर दबाव टाकला आणि तळपदे यांना संशोधनासाठी मिळणारी आर्थिक मदत बंद करून टाकली. याच दरम्यान त्यांच्या पत्नीचे सुद्धा निधन झाल्यामुळे त्यांचा मोठा आधार गेला आणि ते सर्व दृष्टीने एकाकी पडले.

शिवकर बापूजी तळपदे यांनी जगातील पहिल्या विमानाचा उड्डाण प्रयोग १८९५ साली केला होता आणि त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजे १९०३ साली राईट बंधूनी विमान उड्डाणाचा प्रयोग केला आणि तळपदे यांना अज्ञात ठेवून पहिल्या विमान उड्डाणाचे जनक राईट बंधूना ठरवले गेले.

१९१६ साली शिवकर बापूजी तळपदे यांचे निधन झाले. जगातील पहिल्या विमानाच्या उड्डाणाचा प्रयोग यशस्वी करूनही इंग्रजांच्या कूटनीतीमुळे आपल्याला विमानविद्येत पुढील काम करता येणे शक्य झाले नाही याची किती तरी मोठी खंत तळपदे यांना मरण समयी असेल याची कल्पना करवत नाही मात्र काळ उशिरा का होईना प्रत्येक गोष्टीची योग्य ती दखल घेतोच आणि शिवकर बापूजी तळपदे यांनी मानव जातीच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची दखल संपूर्ण जग घेईल यात शंका नाही.