कृष्णदेवराय - विजयनगर साम्राज्याचा सम्राट

कृष्णदेवरायाच्या काळात विजयनगर साम्राज्याचा अमल संपूर्ण दक्षिण भारतात प्रस्थापित झाला होता.

कृष्णदेवराय - विजयनगर साम्राज्याचा सम्राट

दक्षिण भारतातील एक संपन्न राज्य म्हणून विख्यात असलेल्या विजयनगर साम्राज्यावर एकूण चार घराण्यांनी वेगवेगळ्या काळात राज्य केले व या चार घराण्यांमधील काही राजांनी इतिहासात पराक्रमाने नाव कोरले.

विजयनगर साम्राज्यावर अमल करणाऱ्या चार घराण्यांपैकी तुलूव घराण्यातील सर्वाधीक प्रख्यात राजा म्हणजे कृष्णदेवराय. कृष्णदेवरायाचा जन्म १४७१ साली झाला व त्याच्या वडिलांचे नाव इम्मडी नरसा उर्फ नरसिंह आणि आईचे नाव नागलाई असे होते.

१५०९ साली आपल्या वडिलांच्या मृत्यूपश्चात कृष्णदेवराय विजयनगरच्या सिंहासनावर स्थानापन्न झाला. फार कमी काळात कृष्णदेवरायाने आपली हुशारी, पराक्रम आणि इतर अनेक गुणांमुळे जनतेत लोकप्रियता मिळवली आणि त्यास महाराजाधिराज आणि सिंहासनाधिश्वर आदी पदव्या प्राप्त झाल्या.

पायेस नामक इतिहासकाराने कृष्णदेवरायाचे वर्णन करताना म्हटले आहे की, कृष्णदेवराय हा कर्तृत्ववान, स्वतंत्र, निरंकुश सत्ता आणि अधिकार चालवणारा, स्वतःचे महत्व व वजन कायम ठेवणारा प्रभावशाली आणि प्रतापी राजा होता.

कृष्णदेवराय हा पहाटे उठून मुद्गल, जोडी आणि दांडपट्टा यांचा सराव करीत असे व यामुळे त्याचा सर्वांगाचा व्यायाम होत असे. त्याचे शरीर आणि चर्या भव्य असल्याने सर्व जनतेवर त्याचा प्रभाव होता. कृष्णदेवराय हा मोहिमेत स्वतः सहभागी होत असे आणि आपल्या सैन्याचे अधिपत्य करत असे. तो मनाने उदार आणि कोमल अंतःकरणाचा असल्याचे उल्लेख सुद्धा आढळतात.

कृष्णदेवरायाच्या काळात विजयनगर साम्राज्याचा अमल संपूर्ण दक्षिण भारतात प्रस्थापित झाला होता. पोर्तुगीज ज्यावेळी भारतात आले त्यावेळी त्यांनी प्रथम कृष्णदेवरायाकडेच आश्रय घेतला होता. इस्माईल आदिलशाह यांच्याविरोधातील एका मोहिमेत कृष्णदेवरायाने रायचूरच्या जवळ इस्माईल आदिलशाह आणि त्याच्या सैन्याचा मोठा पराभव केला होता. यानंतर बराच काळ दक्षिणी सुलतानांची विजयनगर साम्राज्याकडे वाकडे डोळे करून पाहण्याची हिंमत झाली नाही.

कृष्णदेवराय हा आपल्या सार्वजनिक कामांसाठी आणि धर्मांसाठी सुद्धा प्रसिद्ध होता. त्याने राज्यात जमिनींची सुधारणा करून पाटबंधाऱ्यांची निर्मिती केली आणि जमिनींना आणि जनतेला पाण्याचा मोठा पुरवठा केला. १५२१ साली त्याने कोर्गल कुरवीगड्डा या ठिकाणी तुंगभद्रा नदीस मोठे धरण बांधले.

कृष्णदेवरायास तिरुमल्ल नामक एक पुत्र होता मात्र तो लहानपणीच मृत्यू पावला. याशिवराय कृष्णदेवरायास तिरुमालांबा आणि बेगला नामक दोन कन्यारत्ने होती. तिरुमालांबा हीच विवाह त्याने अरविंदु घराण्यातील रामराया यासोबत लावून दिला होता आणि बेगला हिचा विवाह रामराया याचा भाऊ तिरुमल्ल याच्यासोबत संपन्न झाला होता.

कृष्णदेवरायाचा मृत्यू १५२९ साली झाला. कृष्णदेवरायानंतर त्याचा सावत्र भाऊ अच्युतराय गादीवर बसला. कालांतराने तुलूव घराण्याकडून विजयनगरची सत्ता कृष्णदेवरायाचा जावई रामराया अरविंदू याच्या घराण्याकडे हस्तांतरित झाली. विजयनगर साम्राज्यातील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणून कृष्णदेवरायाचे नाव आजही जनमानसात लोकप्रिय आहे.