विश्वासराव नानाजी दिघे - स्वराज्याचे गुप्तहेर

विश्वासराव नानाजी दिघे यांचे पूर्वज गोपाळप्रभू हे रायगड जिल्ह्यातील पाली येथील देशमुख होते. पालीला मुस्लिम राज्यकाळात अमीनाबाद असे नाव होते. देशमुखी करत असताना वतनावरील कलहातून सशस्त्र वाद होऊन गोपाळ प्रभू मारले गेले.

विश्वासराव नानाजी दिघे - स्वराज्याचे गुप्तहेर

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

छत्रपती शिवाजी महाराजांना जी बिरुदे प्राप्त आहेत त्यामध्ये अष्टावधान जागृत हे एक बिरुद आहे. अष्टावधान जागृत अथवा अष्टावधानी म्हणजे आठही दिशांवर ज्यांचे लक्ष आहे ते. स्वकीय व परकीय शत्रूंपासून स्वराज्य सुरक्षित राहावे यासाठी शिवरायांनी एक मजबूत गुप्तहेर खाते निर्माण केले होते व या खात्यात तज्ज्ञ व त्यांच्या हेरांचे एक मोठे जाळे होते.

शिवरायांच्या हेरखात्यातील प्रमुख म्हणून बहिर्जी नाईक हे आपल्या सर्वाना परिचित आहेतच मात्र या खात्यात अजून काही व्यक्ती होत्या ज्यांनी उत्तम कामगिरी केली होती. शिवरायांच्या हेरखात्यातील असेच एक नाव म्हणजे विश्वासराव नानाजी दिघे देशपांडे. ऐतिहासिक साधनांत यांचा उल्लेख विश्वासराव नानाजी मुसेखोरेकर किंवा विश्वासराव नानाप्रभू या नावानेही येतो. मुळात विश्वासराव ही एक पदवी असून त्यांचे मूळ नाव नानाजी दिघे असावे. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील दिघे घराण्यात विश्वासराव दिघेंचा जन्म झाला होता. दिघे घराण्याच्या अनेक शाखा असून त्यांच्या मुख्य देवता म्हणजे रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील तिसे येथील केदार जननी ही देवी, जेजुरीचा खंडेराव आणि आणि एकविरा ही आहेत.

विश्वासराव नानाजी दिघे यांचे पूर्वज गोपाळप्रभू हे रायगड जिल्ह्यातील पाली येथील देशमुख होते. पालीला मुस्लिम राज्यकाळात अमीनाबाद असे नाव होते. देशमुखी करत असताना वतनावरील कलहातून सशस्त्र वाद होऊन गोपाळ प्रभू मारले गेले. गोपाळ प्रभूंना मिठप्रभू आणि जोगदप्रभू हे पुत्र होते. यातील मिठप्रभू हे पुणे जिल्ह्यातील मुसे खोरे येथे स्थायिक झाले तर जोगदप्रभू रायगड जिल्ह्यातील उंबरडी तर्फ निजामपूर येथे स्थायिक झाले.

मिठप्रभू हे मोसे खोऱ्यात आल्यावर त्यांना आपल्या कर्तबगारीवर खोऱ्यातील ८४ गावांचे देशपांडे व कुलकर्णपणाचे वतन प्राप्त झाले. मिठप्रभू यांच्यानंतर सहा पिढ्या गुजरल्यावर याच मोसेखोरेकर दिघे घराण्यात नानाजी यांचा जन्म १६१५ च्या सुमारास झाला.  

मोसेखोऱ्यातील पिढीजात देशपांडेपणाचे वतन आपल्या वडिलांकडून नानाजी यांच्याकडे आले व त्यांच्याकडे मावळे आणि कोकणे मिळून पाचशे लोकांचे पथक आले.  शिवाजी महाराजांनी बारा मावळातील देशमुख व देशपांडे आपल्या पक्षात ज्यावेळी आणले त्यावेळी मोसेखोऱ्याचे देशपांडे या नात्याने नानाजी दिघे सुद्धा स्वराज्यकार्यात सामील झाले.  

पिढीजात वतनावर पाणी सोडून स्वराज्याच्या कार्यात सामील झाल्यावर मावळच्या सर्व देशमुख व देशपांडयांना महाराजांनी उत्तम जबाबदाऱ्या दिला व ही सर्व माणसे स्वराज्य कार्यात अगदी सुरुवातीपासून महाराजांसोबत असल्याने त्यांची अत्यंत विश्वासू अशी होती त्यामुळे कुठल्याही जोखिमेचे काम करावयाचे असेल तर महाराज या सर्वांनाच जबाबदारी देत असत. तोरणा किल्ला ज्यावेळी महाराजांनी घेतला होता त्यावेळी सोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये विश्वासराव नानाजी दिघे हे सुद्धा होते.

विश्वासराव नानाजी दिघे हे पूर्वी आदिलशाहीत देशपांडेपण व कुलकर्णीपद सांभाळत असताना त्यांना त्या आदिलशाही भाषा आणि पेहराव यांची उत्तम ओळख होती त्यामुळे शिवरायांनी त्यांना हेरखात्याचे कामही दिले होते.

१६५९ साली अफजलखान ज्यावेळी स्वराज्यावरील मोहिमेस आला त्यावेळी त्यावेळी त्याचा तळ प्रथम वाई येथे पडला होता. अफजलखानाच्या प्रत्येक हालचालींची माहिती काढण्याचे अत्यंत जोखमीचे काम शिवरायांनी विश्वासराव नानाजी दिघे यांना सोपवले. नानाजी दिघे आपल्या सरंजामासहित वाईच्या परिसरात दाखल झाले आणि फकिराचा वेष घेऊन रात्रीच्या वेळी खानाच्या छावणीत भिक्षा मागण्यास जाऊ लागले. 

भिक्षा मागताना खानाच्या लष्कराची माहिती, त्याचे बेत हे सर्व दिघे यांनी जाणून घेतले. दिघे हे छावणीत भिक्षा मागण्यास जात त्यावेळी तेथील लोकांची करमणूकही करत त्यामुळे हा भिक्षुक नसून शिवरायांचा हेर आहे असा संशयही खानाच्या लोकांना येत नसे. अफजलखानाने आपला तळ वाई येथून पार येथे वळवला तरीही दिघे यांचे कार्य सुरूच होते. अशा प्रकारे दिघे यांनी खानाच्या गोटातील इत्यंभूत माहिती शिवरायांना दिल्याने अफजलखानाविरोधात तयारी करणे बहुतांशी सुकर झाले.

विश्वासराव नानाजी दिघे हे शाईस्तेखानाचा सरदार कारतलबखान याच्या उंबरखिंडीच्या मोहिमेवेळी सुद्धा शिवरायांसोबत असल्याचा उल्लेख सापडतो. अशाप्रकारे स्वराज्यासाठी अमूल्य असे योगदान देऊन विश्वासराव नानाजी दिघे यांचे १६७० साली निधन झाले. महाराजांना दिघे यांच्या निधनाची बातमी समजल्यावर त्यांनी शोक व्यक्त केला आणि दिघे यांनी स्वराज्यासाठी केलेल्या कार्याची पावती म्हणून त्यांचे पुत्र रामजी यांना भेटीस बोलावून त्यांचे सांत्वन केले आणि मोसेखोऱ्यातील दहा गावांचे कुलकर्णीपदाचे हक्क त्यांना दिले आणि वडिलांच्या पदावर त्यांची नेमणूक केली.