छत्रपती संभाजी महाराजांचे गोव्यावरील आक्रमण
गोव्याचा टाव्होरा नावाचा मुख्य गव्हर्नर कसाबसा आपला जीव वाचवून खाडी ओलांडून पळाला आणि पराभवामुळे लज्जित होऊन एका चर्चमध्ये लपून राहिला. फोंड्यावर विजय मिळवून संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचे सर्वात प्रमुख ठिकाण असलेल्या गोव्याकडे मोर्चा वळवला.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
छत्रपती संभाजी महाराज सिंहासनाधिष्टित झाल्यावर त्यांनी प्रथम पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी व पोर्तुगीज यांच्यासारख्या समुद्री सत्तांचा परामर्श घेण्याचे कार्य हाती घेतले. याचे महत्वाचे कारण म्हणजे या सत्ता स्वराज्याच्या शेजारी सत्ता असून पश्चिम किनारपट्टीवर त्यांचा उपद्रव होत असे. महत्वाचे म्हणजे धार्मिक जुलूम करण्यातही या दोन सत्ता आघाडीवर होत्या.
पोर्तुगीजांनी धार्मिक छळाच्या बाबतीत क्रूरतेच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या होत्या. याशिवाय सिद्दी व पोर्तुगीज या चिवट सत्ता असून वारा येईल तशी पाठ फिरवणाऱ्या होत्या आणि वेळ मिळताच स्वराज्यात कुरापती सुद्धा करत. त्याकाळात स्वराज्याच्या तुल्यबळ अशी फक्त मोगल सत्ताच होती आणि सिद्दी आणि पोर्तुगीज दोघेही मोगलांना छुपी मदत करत.
शिवाजी महाराजांच्या अखेरच्या काळात त्यांनी सिद्दी व पोर्तुगीज या समुद्री सत्तांविरोधात मोहीम उघडली होती मात्र १६८० साली त्यांचे निधन झाल्याने ही मोहीम पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी हाती घेतली. छत्रपती संभाजी महाराजांनी सर्वप्रथम सुरत ते कारवार पर्यंतचा समुद्र किनारा पूर्णपणे स्वराज्यात आणण्याचा निश्चय केला व तेथे आपला अंमल बसवण्यास सुरुवात केली.
मराठ्यांचे परवाने घेतल्या शिवाय समुद्रात परकीय जहाजांचे फिरकणे संभाजी महाराजांनी बंद केले. याच काळात औरंगजेबाचा पुत्र शाहजादा अकबर संभाजी महाराजांकडे आश्रयास आला व पुढे त्याने मक्केस जाण्यासाठी संभाजी महाराजांकडे दहा जहाजांची मागणी केली. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना जहाजे देण्यास सांगितले त्यावेळी मोगलांच्या भीतीने पोर्तुगीजांनी जहाजे देण्यास नकार दिला.
याशिवाय १६८२ मध्ये औरंगजेबाने रणमस्तखानास स्वराज्यावर पाठवले असता त्याने कल्याण येथे हल्ला केला त्यावेळी संभाजी महाराजांनी त्यास चारही बाजुंनी घेरून त्यांची रसद मोडली मात्र पोर्तुगीजांनी छुप्या रीतीने रणमस्तखानास शिबंदी पुरवली याशिवाय अंजनदीव बेटावर संभाजी महाराजांचा किल्ला बांधण्याचा बेत असताना पोर्तुगीजांनी आरमार पाठवून तेथील तटबंदी मोडून बेटावर कब्जा केला. अशा अनेक घटनांनी संभाजी महाराजांचा पोर्तुगीजांवर रोष उत्पन्न होऊन त्यांनी पोर्तुगीजांची खोड कायमची मोडून टाकण्याचा निश्चय केला.
सर्वप्रथम संभाजी महाराजांनी चौल येथे वेढा दिला व वसईपासून दमण पर्यंत पोर्तुगीज अंमल असलेला मुलुख जाळून टाकला. त्यामुळे गोव्यातील पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या ताब्यातील फोंड्यावर हल्ला केला. सतत चार दिवस तोफा चालवून पोर्तुगीजांनी किल्ल्यास छोटे खिंडार पाडले आणि किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र आतील मराठ्यांनी पोर्तुगीजांची कापाकापी सुरु केली. फोंड्याबद्दल समजताच संभाजी महाराज वेगाने फोंडा येथे गेले आणि किल्ल्यातील सैन्य आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये पोर्तुगीज सैन्य सापडून अनेक पोर्तुगीजांची कत्तल उडाली.
यावेळी गोव्याचा टाव्होरा नावाचा मुख्य गव्हर्नर कसाबसा आपला जीव वाचवून खाडी ओलांडून पळाला आणि पराभवामुळे फजिती झाल्याने एका चर्चमध्ये लपून राहिला. फोंड्यावर विजय मिळवून संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचे सर्वात मुख्य ठिकाण असलेल्या गोवा बेटाकडे मोर्चा वळवला आणि अतिशय वेगाने गोव्यातील प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली.
पाहता पाहता संभाजी महाराजांनी साष्टी व बारदेश भाग ताब्यात घेतला त्यामुळे पोर्तुगीजांकडे फक्त रायतूर, आग्वाद आणि रेईजमाग हे तीन किल्ले आणि गोवा बेट एवढेच शिल्लक राहिले. यानंतर संभाजी महाराजांनी गोवा बेट सुद्धा स्वराज्यात घेण्याची तयारी केली.
संभाजी महाराज आता बेट घेणार या भीतीने पोर्तुगिजांचा थरकाप उडाला आणि सर्वत्र पळापळ सुरु झाली. गोव्यातील सर्व पोर्तुगीज यावेळी एकत्र आले आणि संभाजी महाराजांविरोधात लढाईत तर आपला विजय होणे शक्य नाही हे सर्वांना कळून चुकले होते त्यामुळे आता धर्माचा आसरा घेणे हेच त्यांच्या हाती होते त्यामुळे सर्व पोर्तुगीज जुन्या गोव्यातील सेंट झेवियर चर्चमध्ये जमले आणि संभाजी महाराजांच्या हल्ल्यापासून पोर्तुगीजांची सुटका करण्याची करुणा भाकली.
यावेळी यापूर्वी कधीच न घडलेला प्रसंग घडला तो म्हणजे गोव्याच्या मुख्य गव्हर्नरने सेंट झेव्हियर्सची शवपेटी उघडून तिच्यामध्ये आपला राजदंड आणि राजमुद्रा ठेवून रात्रंदिवस प्रार्थना सुरु केली.पोर्तुगीजांनी गोव्यातील सामान्य जनतेवर जे धार्मिक अत्याचार केले होते त्याचा बदला म्हणून संभाजी महाराजांनी गोव्यास परकीय जोखडापासून स्वतंत्र करण्याचा निश्चय केला होता व तो अवधी अगदी जवळ आला होता मात्र नेमक्या याच वेळी मोगलांनी स्वराज्यावर स्वारी केली त्यामुळे स्वराज्यास कुठलीही हानी न पोहोचू देणे महत्वाचे वाटून संभाजी महाराज गोव्याची मोहीम सोडून माघारी गेले आणि सर्व पोर्तुगीजांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
संभाजी महाराज माघारी निघून गेले तरी मोगलांविरुद्धची मोहीम संपवून पुन्हा एकदा ते गोवा जिंकण्यास येतील या भीतीने पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांशी तह केला ज्यामध्ये वसई व दमण या पोर्तुगीज शासित भागातील चौथाई आणि गावखंडी पोर्तुगीजांनी मराठ्यांना द्यावेत आणि मोगलांच्या सैन्यास पोर्तुगीजांनी मराठ्यांविरोधात बिलकुल मदत करू नये इत्यादी कलमे होती.
संभाजी महाराजांच्या गोवा मोहिमेनंतर पोर्तुगीजांचा हा दृढ समज झाला की सेंट झेव्हियर्स यांच्यामुळेच आपण वाचलो त्यामुळे येथून पुढे गोव्याचे जेवढे गव्हर्नर झाले त्या सर्वांना चार्ज घेण्यापूर्वी सेंट झेव्हियर्स च्या थडग्यावरून राजदंड घेण्याची प्रथा पाळावी लागली कारण तसे केल्यासच पोर्तुगीजांचे गोव्यातील राज्य सुरक्षित राहू शकते असा दृढ समज पोर्तुगिजांचा झाला व हेच संभाजी महाराजांच्या गोव्यावरील मोहिमेचे खरे यश होते.