नागांवचे सिद्धिविनायक मंदिर व शिलालेख

अक्षी गाव ओलांडून मुख्य मार्गावरून सरळ नागांव मध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. या मंदिरात एक जुना मराठी शिलालेख आहे जो मंदिराच्या निर्माणाची अथवा जीर्णोद्धाराची माहिती दाखवतो.

नागांवचे सिद्धिविनायक मंदिर व शिलालेख

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील नागांव हे अरबी समुद्रास खेटून असलेले एक निसर्गरम्य गावं. या गावाचा उल्लेख जुन्या साधनांत नागग्राम अथवा नागुम असा येतो. निसर्गसौंदर्याबरोबर हे गाव ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. नागांव मधील असेच एक ऐतिहासिक व धार्मिक वारसा स्थळ म्हणजे येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर. 

अलिबागच्या दिशेने नागांव येथे येताना अक्षी हे गावं प्रथम लागते. अक्षी गाव ओलांडून मुख्य मार्गावरून सरळ नागांव मध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस सिद्धिविनायकाचे हे मंदिर आहे. तूर्तास या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी काही वर्षांपूर्वी मंदिराचे मूळ रूप अस्तित्वात होते मात्र लाकडी सभागृह अतिशय जीर्ण झाल्याने या सभागृहाचा सांगाडाच काय तो दिसत होता. मंदिराचा गाभारा मात्र पाषाणात बनवला असल्याने सुस्थितीत आहे. 

मंदिराचा सभामंडप दुमजली असून उजव्या बाजूने वर जाण्यास लाकडी जिना होता. पूर्वीच्या काळी धार्मिक कार्यक्रमांत स्त्रिया व पुरुषांच्या बसण्याची व्यवस्था वेगळी असल्याने असे दोन मजले अनेक मंदिरांना असायचे. पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराच्या सभागृहासारखीच या मंदिराच्या सभागृहाची रचना असली तरी फक्त लाकडाचे काम असल्याने लाकडाची झीज व वाळवी लागून सभागृहाची हानी झाली आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात सिद्धीविनायकाची रेखीव मूर्ती आहे. मंदिराचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे या मंदिरात एक जुना मराठी शिलालेख आहे जो मंदिराच्या निर्माणाची अथवा जीर्णोद्धाराची माहिती दाखवतो. दुर्दैवाने शिलालेख भग्न झाल्यामुळे पूर्ण वाचता येत नाही. पूर्वी या लेखाचे वाचन झाले आहे किंवा नाही याचा अंदाज येत नाही मात्र भग्न झाल्यामुळे वाचता येण्यासारखी अक्षरे असूनही शिलालेख पूर्णपणे वाचता येत नाही. 

मंदिराच्या गाभाऱ्यात शिरण्याअगोदर दरवाज्याच्या वर हा शिलालेख कोरलेला असून जी अक्षरे अस्तित्वात आहेत ती पाहता प्लवंग नाम संवत्सरात राजश्री बाळंभट यांनी स्थापना केली असल्याची नोंद दिसून येते. बाकी मजकूर नष्ट झाला आहे. आता हे राजश्री बाळंभट कोण याचा थोडासा अभ्यास केला असता थोडी आश्चर्यचकित करणारी माहिती मिळते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी गागाभटांसह, कुलोपाध्याय प्रभाकरभट व त्यांचे पुत्र बाळंभट हे उपस्थित होतेच याशिवाय गागाभटांनी ज्याचा विवाह वाराणशी येथे संपन्न केला ते बाळंभट क्रमवंत सुद्धा या सोहळ्यास उपस्थित असल्याचे उल्लेख मिळतात आणि हे बाळंभट अलिबाग तालुक्यातील नागांव येथील राहणारे होते असा सुद्धा उल्लेख मिळतो. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरातील हा शिलालेख याच बाळंभटांचा असणे शक्य आहे. जर तसे असेल तर हा लेख शिवकालीन असण्याची शक्यता अधिकच दृढ होते त्यामुळेच या शिलालेखाचे योग्य संकलन होणे गरजेचे आहे. 

सिद्धीविनायक मंदिर हे नागांव मधील अतिशय प्रसन्न असे देवस्थान असून अलिबाग मुरुड राजमार्गावरच असल्याने थोडा वेळ काढून मंदिरास भेट देण्यास काहीच हरकत नाही.