छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यकृती

बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख, सातसतक अशा या रचना होत. तेव्हा संभाजी महाराजांनी रचलेल्या साहित्यकृतींबद्दल जाणून घेऊ.

छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यकृती
छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यकृती

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर इतिहासात आपल्या असामान्य कर्तृत्वाने नाव कोरणारे नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वारसा त्यांनी जपलाच मात्र आपल्या कारकिर्दीत स्वतःची एक वेगळी ओळखही निर्माण केली. 

संभाजी महाराजांची राजकीय कारकीर्द एकूण नऊ वर्षांची असली तरीही अगदी लहान वयात त्यांच्यावर राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ आली.

वयाच्या ८ व्या वर्षी पुरंदरच्या तहानंतर संभाजी महाराजांना मुघलांकडून पंचहजारी मनसबदारी मिळाली होती. आग्रा येथे शिवाजी महाराज गेले असता त्याच्या सोबत स्वराज्याचे भविष्य अर्थात संभाजी महाराजही होतेच.

खरं तर ही खूप मोठी जोखीम होती मात्र शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने जाणते राजे असल्याने संभाजी महाराज लहान असले तरीही त्यांची त्या वयातील प्रगल्भता पाहून त्यांना आपल्या सोबत आग्रा येथे नेले.

आग्रा येथे औरंगजेबाकडून शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना नजरकैद करण्यात आले व त्यांच्यावर कडा पहारा बसवण्यात आला. मात्र चातुर्याने शिवाजी महाराजांनी लहानग्या संभाजी राजांसहित आपली तेथून सुटका करून घेतली.

सुटकेच्या प्रयत्ना दरम्यान फक्त ८ वर्षांचे असूनही संभाजी महाराजांनी प्रगल्भता दाखवली म्हणूनच हे शक्य झाले कारण सुटकेचे प्रयत्न कुणालाही समजणे धोक्याचे होते अशावेळी आपण आपल्या वडिलांसहित कैदेत आहोत व सुटकेसाठी वडील प्रयत्न करत आहेत ही समज निश्चितच त्यांच्यात होती म्हणूनच या भयकंर प्रसंगातून निभावता आले.

अगदी सुटका झाल्यावरही संभाजी महाराज काही काळ त्याच परिसरात महाराजांच्या विश्वासू लोकांसोबत मथुरा येथे राहिले व शिवाजी महाराज स्वराज्यात दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी शत्रूला चकवा देत ते सुद्धा स्वराज्यात दाखल झाले. 

लहानपणापासून बिकट परिस्थितीचा सामना करण्याची सवय संभाजी महाराजांना होती मात्र याशिवाय त्यांच्याकडे असलेल्या अनेक गुणांपैकी एक गुण म्हणजे ते एक लेखक व कवी सुद्धा होते.

त्यांनी एक नव्हे तर चार साहित्य रचना केल्या ज्या संस्कृत व ब्रजभाषेत होत्या.

बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख, सातसतक अशा या रचना होत. संभाजी महाराजांनी साहित्यरचना करताना आपले टोपणनाव नृपशंभू हे ठेवले होते. नृप म्हणजे राजा व शंभू म्हणजे संभाजी. तेव्हा संभाजी महाराजांनी रचलेल्या साहित्यकृतींबद्दल जाणून घेऊ.

बुधभुषण

संभाजी महाराजांचा बुधभुषण हा ग्रंथ संस्कृत भाषेत असून या ग्रंथाची फक्त तीनच प्रकरणे मिळाली आहेत. अनेक अभ्यासकांच्या मते बुधभूषण ग्रंथाची इतरही प्रकरणे असावीत. बुधभूषण ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात एकूण १६४ श्लोक आहेत. यामध्ये गणेश, शिव, गुरु आणि पार्वती प्रार्थना असून नंतर संभाजी महाराजांच्या वंशाचे वर्णन आहे. पुढील श्लोकांत भोसले घराण्याची कुलदेवता भवानी मातेची स्तुती आहे. 

बुधभूषणाच्या दुसऱ्या अध्यायात राजनीती शास्त्राची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या अध्यायात एकूण ६३२ श्लोक आहेत. तिसऱ्या अध्यायाचे नाव मिश्रप्रकरण असे असून त्यात ५७ छंद आहेत. यामध्ये राजाने पाळावयाचे धर्म व तत्व यांची माहिती दिली आहे. हा ग्रंथ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजी महाराजांनी लिहिला.

नायिकाभेद

संभाजी महाराजांची दुसरी साहित्य रचना म्हणजे नायिकाभेद. हा ग्रंथ ब्रजभाषेत लिहिला गेला आहे. नायिकाभेद या ग्रंथाचे श्लोक अखंड सापडले नसल्याने हा ग्रंथ पूर्ण स्वरूपात मिळत नाही. हा ग्रंथ संभाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर लिहिला असावा कारण या ग्रंथात ते स्वतःचा उल्लेख नृपशंभू असे करतात.

नखशिख

संभाजी महाराजांची तिसरी साहित्य रचना म्हणजे नखशिख. हा ग्रंथ काशीच्या नागरी प्रचारणी सभेत उपलब्ध आहे. नखशिख मध्ये एकूण १३६ छंद असून ब्रजभाषेतील कवित्त, सवैया, दोहा आणि छप्पेय अशा विविध छंदांचा वापर करून हा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला आहे.  

सातसतक

संभाजी महाराजांची चौथी साहित्य रचना म्हणजे सातसतक. हा ग्रंथ सुद्धा काशीच्या नागरी प्रचारणी सभेत प्रथम मिळाला. ग्रंथात एकूण १०० छंद असून सुरुवातीचे ७ छंद प्रास्ताविक स्वरूपात आहेत. 

स्वधर्मे निधन श्रेय पराधर्मो भयावह या पंक्तीचे पालन करून हसत हसत मृत्यूस स्वीकारणारे संभाजी राजांचे मन बाहेरून कठोर मात्र आतून किती कोमल होते हे त्यांनी निर्माण केलेल्या साहित्य रचना वाचुन समजून येते.