कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे - इतिहासातील प्रसिद्ध फांकडे

कोन्हेरराव यांची कारकीर्द छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत सुरु झाली व बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी त्यांची शिलेदार म्हणून नियुक्ती केली.

कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे - इतिहासातील प्रसिद्ध फांकडे
कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे

उत्तर मराठे शाहीत एखाद्याने विशेष पराक्रम केला असता त्यास फांकडे असे बिरुद दिले जाई व हे बिरुद मिळवणाऱ्यांपैकी एक म्हणजे कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे. 

कोन्हेरराव यांची कारकीर्द छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत सुरु झाली व बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी त्यांची शिलेदार म्हणून नियुक्ती केली. १७५१ ते १७५२ या कालावधीत मोगल व मराठे यांच्यात जे युद्ध झाले त्यामध्ये कोन्हेरराव एकबोटे यांनी मोठा पराक्रम केला. याच युद्धात फ्रेंच सरदार बुसी आपल्या कवायती फौजेसह मोगलांना मिळाला होता त्याचाही समाचार कोन्हेरराव यांनी घेतला होता.

फ्रेंच सैन्याचा तोफखाना प्रबळ असूनही त्यांच्या गोळ्यांचा सामना मराठा सैन्याने केला आणि मोगल व फ्रेंच सैनिकांचा दारुण पराभव करून मोगलांची सोन्याची अंबारी कोन्हेरराव व इतर पराक्रमी मराठा सरदारांनी हस्तगत करून त्यांना शह दिला.

या युद्धानंतर पुढे झालेल्या अनेक युद्धांमध्ये कोन्हेरराव यांनी आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवल्याने त्यांना शिलेदारीचे स्वतंत्र असे पथक प्राप्त झाले. फ्रेंच सरदार बुसीने पेशव्यांचे मुख्य ठिकाण असलेल्या पुण्यावर चाल करून पेशवाईचा उपकरणा आणि देव पळवले त्यावेळी मराठा सैन्याने फ्रेंच सैन्यास मोठा प्रतिकार केला त्या युद्धात सुद्धा कोन्हेरराव यांनी चांगला पराक्रम गाजवला.

कोन्हेररावांनी या युद्धात आपल्या कौशल्याचे उत्तम प्रदर्शन दाखवल्याने त्यांना 'फांकडे' हे बिरुद प्राप्त झाले. त्यानंतर त्यांना कोन्हेर त्रिंबक फांकडे या नावाने ओळखले जाऊ लागले आणि पेशवे सरकारातून त्यांना अनेक बहुमान आणि इनामे प्राप्त झाली याशिवाय त्यांच्या घोड्याच्या पायात चांदीचा वाळा घालण्याचा मान सुद्धा त्यांना मिळाला.

हाळीहुन्नूर येथील मोहिमेत सुद्धा कोन्हेरराव यांनी सहभाग घेतला व मैदानात शौर्य गाजवले, या युद्धात एका क्षणी एका प्राणघातक हल्ल्यातून ते लीलया बचावले होते. १७५६ साली सदाशिवराव पेशवे यांनी सावनूर येथे मोहीम काढली त्यावेळी सुद्धा त्यांच्या पथकात कोन्हेरराव होते मात्र या लढाईत लढत असता फ्रेंच सेनापती बुसी याच्या तोफखान्यातील तोफेचा गोळा त्यांच्या डोक्यावर आदळला व ते धारातीर्थी पडले व इतिहास पराक्रमी अशा एका सेनानीस मुकला.

कोन्हेरराव यांच्या मृत्यूबद्दल बाळाजी बाजीराव यांनी खूप शोक व्यक्त केला व त्यांच्या वंशजांस योग्य इनामे देऊन कोन्हेरराव यांची एकनिष्ठा व पराक्रम यांची परतफेड केली. इतिहासात जे तीन प्रसिद्ध व पराक्रमी फांकडे झाले त्यापैकी कोन्हेरराव हे एक होते यावरून त्यांच्या कर्तृत्वाची कल्पना येते.