बाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस

ज्यावेळी बाळाजी विश्वनाथ कोकणातून देशावर जाण्यास निघाले त्यावेळी त्यांच्यासोबत रामाजी महादेव, हरी महादेव आणि बाळाजी महादेव हे भानू कुटूंबातील तीन भाऊ होते व हे सर्व भाऊ बाळाजी विश्वनाथ यांच्यासह शेवटपर्यंत होते.

बाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस
बाळाजी महादेव भानू

छत्रपती शिवाजी महाराजांनी जी अष्टप्रधान व्यवस्था निर्माण केली त्यापैकी प्रमुख पद म्हणजे मुख्य प्रधान. या पदास पेशवा असे फारशी भाषेतील नाव आहे जे आजही या पदाचा उल्लेख करताना वापरले जाते. शिवरायांनी निर्माण केलेली अष्टप्रधान व्यवस्था ही पुढील अनेक वर्षे सुरु होती व या व्यवस्थेत कालपरत्वे विविध मातब्बरांनी वेगवेगळ्या पदांची जबाबदारी सांभाळली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू व छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आणि स्वराज्याच्या सातारा गादीचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत जे पेशवे झाले त्यामध्ये बाळाजी विश्वनाथ भट हे नाव प्रख्यात आहे. सध्याच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील बाळाजी विश्वनाथ यांचे घराणे पूर्वी हबशांच्या सेवेत होते कारण या परिसरात अनेक वर्षे सिद्दींची सत्ता होती. 

हबशांनी काही कारणास्तव भट घराण्यातील पुरुषांना ठार मारण्याचे सत्र आरंभले आणि जीव रक्षिण्याकरिता बाळाजी विश्वनाथ यांना देशावर यावे लागले व येथून त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावून १७१३ साली पेशवेपदाची जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे १७२० सालापर्यंत त्यांनी ही जबाबदारी उत्तम रित्या पार पाडली.

ज्यावेळी बाळाजी विश्वनाथ कोकणातून देशावर जाण्यास निघाले त्यावेळी त्यांच्यासोबत रामाजी महादेव, हरी महादेव आणि बाळाजी महादेव हे भानू कुटूंबातील तीन भाऊ होते व हे सर्व बाळाजी विश्वनाथ यांच्यासह शेवटपर्यंत होते. या तीन भावांपैकी बाळाजी महादेव भानू यांनी एका प्रसंगी स्वराज्य कार्यात आपले प्राण अर्पण केले त्याची माहिती आपण या लेखातून घेऊ.

बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे पेशवेपदाची जबाबदारी असताना दिल्लीत काही घडामोडी घडत होत्या. त्या काळात दिल्लीत फारुकसेयर नावाचा मोगल बादशाह गादीवर होता मात्र या वेळी राज्याची सूत्रे अब्दुल्ला आणि हुसेन या दोन सय्यद बंधूंकडे होती. बादशहाची स्थापनाच या सय्यद बंधूनी केल्याने या दोघांचे वर्चस्व त्यावेळी दिल्लीत मोठे होते आणि स्वतः बादशाहालाही यांच्या इच्छेशिवाय एकही गोष्ट करणे अशक्य झाले होते. हळूहळू बादशहास या दोन सय्यद बंधूंचे वर्चस्व नकोशे झाले आणि त्याने या दोन बंधूना वेगळे पाडण्यासाठी हुसेन अल्ली सय्यद ची दक्षिण सुभ्यात रवानगी केली आणि यानंतर त्याने दोघांच्या नाशाचे गुप्त प्रयत्न सुरु केले.

हुसेन अली दक्षिणेत असताना त्याला बादशहाच्या कटाची माहिती मिळाली आणि संतप्त होऊन त्याने थेट दिल्लीवर चाल करून बादशहाचा पराभव करण्याचा निश्चय केला व याकामी त्याने मराठ्यांची मदत घेण्याचे ठरवले व या कार्याच्या बदल्यात मराठ्यांना चौथाई, सरदेशमुखी व इतर काही सनदा बादशहापासून मिळवून देण्याचे आश्वासन देऊन शाहू महाराजांकडे मदत मागितली. शाहू महाराजांनी हुसेनच्या मदतीस बाळाजी विश्वनाथ व खंडेराव दाभाडे यांना पाठवले आणि यानंतर सर्वांनी ससैन्य दिल्लीवर चाल केली आणि बादशहाचा पराभव केला.

बादशहाचा पराभव झाल्यावर सय्यद बंधूनी बादशहाची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला मात्र बादशाह आपल्या हट्टास कायम राहिल्याने सय्यद बंधूनी त्याचे डोळे काढून त्याची हत्या केली आणि यानंतर सय्यद बंधूनी दुसरा बादशाह गादीवर बसवला, दुसरा बादशाह लवकरच वारला आणि यानंतर सय्यद बंधूनी तिसरा बादशाह गादीवर बसवला मात्र तो सुद्धा अल्पायुषी ठरला.

यानंतर १७१९ साली सय्यद बंधूनी आणखी एकास गादीवर बसवून त्याचे नाव महमदशाह असे ठेवले आणि त्याच्याकडून मराठ्यांना आधी कबूल केलेल्या सनदा मिळवून देण्याची हमी दिली.

सनदा मिळवण्यासाठी काही काळाने बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि त्यांचे सहकारी दिल्लीस गेले होते व सोबत बाळाजी महादेव भानू सुद्धा होते. मराठ्यांना मोगली मुलुखाची चौथाई देण्याचा आणि सरदेशमुखी देण्याचा विचार दरबारातील अनेकांना पटला नाही आणि दिल्ली दरबारात मराठ्यांचा घातपात करण्याचे मनसुबे रंगू लागले.

बाळाजी विश्वनाथ यांना या कटाची माहिती लागली आणि आता यातून सुटका कशी करून घ्यावी असा विचार करीत असताना बाळाजी महादेव भानू त्यांना म्हणाले की तुम्ही सय्यद बंधूंकडून सनदा घ्या आणि वेषांतर करून बाहेर पडा आणि मी तुमचा पोशाख परिधान करून पालखीतून बाहेर येतो कारण तुम्ही स्वराज्याचे पेशवे आहात तेव्हा तुमच्या प्राणाचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे.

यानंतर बाळाजी विश्वनाथ यांनी बादशहाकडून सनदा घेतल्या आणि वेषांतर करून ते बाहेर पडले आणि बाहेरील लष्करास येऊन मिळाले आणि बाळाजी भानू पेशव्यांच्या वस्त्रात आणि पालखीत बाहेर येण्यास निघाले असता घात लावून बसलेल्या दरबारी लोकांच्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ठार मारले.

अशा प्रकारे ज्या बाळाजी विश्वनाथ यांची ज्यांनी सुरुवातीपासून अखेरपर्यंत साथ दिली अशा बाळाजी भानू यांनी त्यांच्यासाठी आपले प्राणही देऊन मैत्रीस जागणे काय असते हे दाखवून दिले कारण बाळाजी विश्वनाथ हेच सर्व भानू कुटुंबाच्या उत्कर्षास कारणिभुत होते आणि ज्यावेळी बाळाजी विश्वनाथ कोकण सोडून देशावर जाण्यास निघाले आणि भानू बंधू त्यांना भेटले व आम्हालाही आपल्यासोबत घेऊन जा असे म्हणाले तेव्हा बाळाजी विश्वनाथ त्यांना म्हणाले होते की, बरे आहे चला माझ्यासोबत, मला भाकर मिळेल त्यात तुम्हांसही चतकोर मिळेल.

अशा या बाळाजी महादेव भानू यांचे नातू म्हणजे मराठेशाहीतील एक वीर मुसद्दी नाना फडणीस उर्फ बाळाजी जनार्दन भानू. भानू घराण्याने जे बलिदान दिले त्याची उतराई म्हणून भट घराण्यातील पेशव्यांनी भानू कुटुंबाचा मान राखला व यापैकी नाना फडणीस उर्फ बाळाजी जनार्दन भानू हे आपल्या कर्तबगारीने उच्चपदास पोहोचले.