परशुराम - विष्णूचा सहावा अवतार

विष्णूच्या अवतारांपैकी सहावा अवतार म्हणजे भगवान परशुराम. प्रभू रामचंद्रांपुर्वी परशुरामाचा अवतार पृथ्वीतलावर झाला.

परशुराम - विष्णूचा सहावा अवतार

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू व महेश ही तीन प्रमुख दैवते अनुक्रमे सृष्टीचे निर्माण, रक्षण व संहार इत्यादींची कारक मानली गेली आहेत. विष्णूकडे सृष्टीच्या रक्षणाची जबाबदारी असल्याने त्याने अनेकदा पृथ्वीतलावर अवतार घेऊन सृष्टी रक्षणाचे कार्य केले. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कल्की अशी अवतारांची यादी. 

विष्णूच्या अवतारांपैकी सहावा अवतार म्हणजे भगवान परशुराम. प्रभू रामचंद्रांपुर्वी परशुरामाचा अवतार पृथ्वीतलावर झाला. त्याकाळी ऋचिक नावाचे एक ब्राम्हण ऋषी होते व त्यांची बायको होती विश्वामित्राची बहीण सत्यवती. विश्वामित्र हे क्षत्रिय वर्णाचे होते. त्यामुळे ऋचिक हे ब्राह्मण तर सत्यवती ही क्षत्रिय. त्यांना झालेला पुत्र म्हणजेच जमदग्नी. जमदग्नीचा विवाह सुद्धा रेणुका नामक क्षत्रिय कन्येशी झाला होता.

जमदग्निंना रेणुकापासून एकूण पाच पुत्र झाले व त्यापैकी सर्वात लहान होता राम. रामाचा याचा जन्म वैशाख शुद्ध तृतीयेस झाला. जमदग्नी हा आपल्या कोपिष्ट स्वभावाची प्रसिद्ध होता आणि रामाचा स्वभावही आपल्या वडिलांसारखाच होता. मुंज झाल्यावर राम शाळीग्राम पर्वतावर गेला व तेथे त्याने भगवान शंकरास प्रसन्न करून धनुर्वेद, शस्त्रास्त्र विद्या व मंत्रविद्या इत्यादी शिकून घेतल्या. शंकराने प्रसन्न होऊन त्यास परशु नावाचे एक अस्त्र दिले म्हणून त्यास परशुराम असे नाव प्राप्त झाले.

परशुराम हा मातृ पितृ भक्त असून आज्ञापालक होता. एक दिवस रेणुका नर्मदा नदीवर स्नानास गेल्या असता वार्तिकवत राजाचे रूप पाहून तिचे मन किंचित विचलित झाले यामुळे जमदग्नी अतिशय संतप्त झाले व त्यांनी आपल्या मुलांना रेणुकेचे शीर कापण्याची आज्ञा केली मात्र धाकट्या परशुरामानेच ही आज्ञा अमलात आणली. मात्र आईचे शीर कापल्यावर परशुरामाने आपल्या पित्याकडे आपल्या आईस पुन्हा जीवनदान द्या असा वर मागितला व जमदग्नीनेही रेणुकेस पुन्हा जिवंत केले अशी परशुरामाच्या मातृ पितृ भक्तीची कथा सांगितली जाते.

नर्मदा नदीच्या तीरावर महिष्मती नावाचे एक राज्य होते. सध्या त्या नागरास महेश्वर या नावाने ओळखतात. त्या राज्याचा राजा होता कार्तिवीर्य अर्जुन. कार्तिवीर्य हा दत्तभक्त असून दत्ताने त्यास एक हजार हात दिले होते त्यामुळे त्यास सहस्त्रार्जुन असेही म्हटले जायचे. सहस्रार्जुनाने एकदा रावणाचाही पराभव करून त्यास बंदी बनवले होते एवढा तो शूर होता.

एक दिवस त्याच्या मुलांनी जमदग्नी यांच्या आश्रमात खूप धुमाकूळ घालून त्यांची कामधेनू गाय हरण केली. परशुरामास हे समजताच त्याने सहस्रार्जुनावर चाल करून कामधेनू परत आणली मात्र सहस्रार्जुनाने पुन्हा एकदा हल्ला करून जमदग्निंनाच ठार मारले. परशुराम आश्रमास गेला तेव्हा त्याची आई रेणुका हिने २१ वेळा उर बडवून आपल्या पती निधनाची बातमी परशुरामास दिली त्यामुळे त्याने २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय करेन अशी प्रतिज्ञा केली. यानंतर परशुराम आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घेण्याकरिता सहस्रार्जुनाच्या राज्यात शिरला व युद्धांती सहस्रार्जुनाचे सर्व हात कापून शेवटी त्याचा वध केला.

हे कार्य झाल्यावर परशुराम महेंद्र पर्वतावर निघून गेला मात्र विश्वामित्राचा नातू परावासुने परशुरामाची क्षत्रियांना घाबरून पलायन केलेस अशी निर्भत्सना केली त्यामुळे चिडून जाऊन त्याने पुन्हा एकदा काश्मीर, दरद, कुंती, क्षुर्द्रक, मालव, वंग, अंग, कलिंग, विदेह, ताम्रलिप्त, राक्षोवाह, वीतिहोत्र, त्रिगर्त, मर्तिकाव्रत व शिबी इत्यादी क्षत्रिय राज्यांचा समाचार घेतला व यज्ञ करून पृथ्वी कश्यपास दान केली.

क्षत्रियच नसल्याने कश्यपास पृथ्वीचे ओझे सांभाळणे कठीण झाले त्यामुळे त्यांनी रानावनातील क्षत्रियांस पुन्हा आमंत्रण देऊन पृथ्वीचे रक्षण करण्यास बोलावले व परशुरामास पृथ्वी सोडून जाण्याची विनंती केली त्यामुळे परशुराम महेंद्र पर्वतावर निघून गेला. आयोध्यापती राम यांनी स्वयंवरात परशुरामाचे धनुष्य तोडले तेव्हा ते ऐकून परशुराम स्वतः महेंद्र पर्वतावरून अयोध्येस आले व त्यांनी रामाचे धनुर्वेद कौशल्य पहिले व आपल्या अवताराचे कार्य समाप्त झाले असे समजून जाऊन ते पुन्हा महेंद्र पर्वतावर जाऊन विद्यादानाचे कार्य करू लागले. 

परशुराम अवतार चिरंजीवी असल्याने त्याने पुढील काळात कर्ण आणि कृष्ण व बलरामांनाही विद्या प्रदान केली असे उल्लेख मिळतात. त्यांनी कोकणपट्टीत शुर्पारकस जाऊन कोकणात समुद्र हटवून वसाहत स्थापन केली. गुजरातपासून ते केरळपर्यंत असलेल्या कोकण पट्टीतील अनेक जण परशुरामाने स्थापन केलेल्या वसाहतीचे आपण वंशज आहोत असे आजही मानतात व परशुराम जयंती दिनी परशुरामाची मनोभावे पूजा अर्चा करतात. कोकणातील चिपळूण जवळ लोटे परशुराम येथे परशुरामाचे अतिशय भव्य असे देवस्थान आहे.