रामशास्त्री प्रभुणे - एक निस्पृह न्यायाधीश

रामशात्री यांचे मूळ गावं सातारा जवळील माहुली हे असून त्यांचा जन्म देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुळात झाला होता.

रामशास्त्री प्रभुणे - एक निस्पृह न्यायाधीश
रामशास्त्री प्रभुणे

पेशव्यांच्या दरबारी असून खुद्द रघुनाथराव पेशव्यांनाच देहांत प्रायश्चित सुनावणारे न्यायाधीश म्हणून रामशास्त्री प्रभुणे प्रख्यात आहेत. रामशात्री यांचे मूळ गावं सातारा जवळील माहुली हे असून त्यांचा जन्म देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुळात झाला होता.

कौटूंबिक परिस्थती बिकट असल्याने रामशास्त्री यांनी सातारा येथील एका सावकाराकडे चाकरी पत्करली व तेथे त्यांनी शागीर्द म्हणून काम पाहणे सुरु केले व लहानपणीच जबाबदाऱ्या येऊन पडल्याने त्यांचे शिक्षणही फारसे झाले नव्हते मात्र वयाच्या विसाव्या वर्षी कुठल्यातरी कारणावरून सावकाराने रामशास्त्रींच्या शिक्षणाबद्दल त्यांना खडे बोल सुनावल्याने त्यांनी शिकण्याचे मनावर घेतले.

सावकारासही या मुलास खरोखर शिक्षण घेण्याची इच्छा आहे असे वाटून सावकाराने रामशास्त्रींना शिक्षण घेण्यास थेट काशी येथे पाठवले. काशी येथे बाळंभट पायगुडे नामक एक विख्यात शिक्षक होते त्यांच्याकडे रामशास्त्री यांनी शिकण्यास सुरुवात केली.

त्याकाळी अशिक्षित असल्याने अनेकदा हिणवले जात असल्याने बाळंभट यांचे जावई अनंतभट हे सुद्धा बाळंभट यांच्याच शाळेत शिक्षण घेत होते व एकत्र शिकत असल्याने रामशास्त्री आणि अनंतभट यांची चांगली मैत्री जुळून आली.

कालांतराने रामशास्त्री यांनी काशी येथे राहून धर्मशास्त्रात शिक्षण प्राप्त केले तर अनंतभट यांनी वेदांतात कौशल्य प्राप्त केले. कालांतराने रामशास्त्री पुण्यास आले आणि १७५१ साली त्यांनी पेशवे दरबारातील धर्मखात्यात नोकरी सुरु केली मात्र धर्मशास्त्राचे उत्तम ज्ञान असल्याने त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जाऊन १७५९ साली त्यांना मुख्य न्यायाधीश हे पद प्राप्त झाले.

थोरले माधवराव पेशवे हे रामशास्त्री यांच्या गुणांनी अत्यंत प्रसन्न असून धर्म व न्यायशास्त्रात ते प्रत्येक बाबींत रामशास्त्री यांचा सल्ला घेत व रामशास्त्री सुद्धा आपले कार्य निःस्पृह पणे करीत.

थोरले माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे लहान बंधू नारायणराव पेशवेपदी असताना रघुनाथराव यांच्या मार्फत जे कारस्थान रचले गेले त्यामध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला आणि रघुनाथराव यांनी पेशवे पद मिळवले. माणूस कितीही उच्च पदावर असला तरी सर्वांना समान न्याय हे तत्व असले तरी आजकाल हे तत्व फक्त कागदोपत्री असून त्याची अंमलबजावणी होणे म्हणजे दुर्लभ कार्य झाले आहे आणि त्याकाळी सुद्धा गुन्हेगार खुद्द रघुनाथराव असल्याने रघुनाथराव यांच्यासोबत काय न्याय करावा असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

रामशास्त्री यांना सुद्धा झालेल्या घटनेचा प्रचंड संताप असल्याने नारायणरावांच्या खुनात मुख्य गुन्हेगार असलेल्या माणसास न्यायशास्त्रानुसार कडक शिक्षा मिळणेच गरजेचे आहे असे वाटत होते मात्र त्याकाळी सुद्धा ही शिक्षा प्रत्यक्ष अमलात येणे शक्य नाही हे सुद्धा माहित होते.

नारायणराव पेशवे खुनाचा खटला सुरु होता त्यावेळी रघुनाथराव यांच्या पक्षातर्फे झाल्या घटनेचे प्रायश्चित विचारण्यात आले यावेळी रामशास्त्री यांनी स्पष्ट शब्दांत निकाल दिला की या गुन्ह्याचे एकच प्रायश्चित व ते म्हणजे देहांत प्रायश्चित.

आपण निकाल दिला असला तरी त्याचे पालन सत्ताधारी करतील याची शाश्वती नसल्याने या निकालाचा अवमान होऊ नये म्हणून रामशास्त्री यांनी निकाल देऊन लगेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि नोकरी सोडून ते पुन्हा आपल्या गावास म्हणजे माहुलीस निघून गेले. रघुनाथराव यांचे पेशवेपद औटघटकेचे ठरले आणि सवाई माधवराव पेशवेपदी बसल्यावर रामशास्त्री यांना पुन्हा एकदा आपल्या पदाचा स्वीकार करण्यासाठी पाचारण करण्यात आले.

रामशात्री प्रभुणे यांचा फक्त हाच एक निकाल नव्हे तर इतरही काही निकाल त्यांच्या निस्पृहपणा आणि निःपक्षपातीणाची साक्ष देतात. त्याकाळी पुनर्विवाह करणे फारसे शक्य नसे मात्र परशुराम पटवर्धन यांच्या कन्येचा पुनर्विवाह करण्यास रामशात्री यांनीच कायदेशीर संमती दिली होती असे जुने इतिहास संशोधक सांगतात याशिवाय त्याकाळी जे ग्रामण्यांचे खटले चालत त्यामध्ये रामशात्री यांनी प्रभू समाजाच्या निकाल दिला होता.

१७८९ साली म्हणजे वयाच्या ६९ व्या वर्षी रामशास्त्री यांचे निधन झाले. आजही न्यायदानावर मत मांडताना रामशास्त्री यांचे उदाहरण त्यांच्या न्यायदानातील निस्पृहपणाबद्दल अनेकदा दिले जाते.