श्री क्षेत्र अकलापूरचे स्वयंभू दत्त मंदिर

नवसाला पावणारा दत्त अशी ह्या देवस्थानची महती आहे. जुन्नर, संगमनेर, पारनेर, अकोले, आंबेगाव, राहता, राहुरी आणि पुणे-नाशिक-नगर जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.

श्री क्षेत्र अकलापूरचे स्वयंभू दत्त मंदिर
श्री क्षेत्र अकलापूरचे स्वयंभू दत्त मंदिर

ऐतिहासिक आणि अध्यात्मिक पार्शवभूमी असणारे श्री क्षेत्र अकलापूर (पूर्वाश्रमीचे अलकापूर) हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असणारे स्वयंभू एकमुखी दत्तात्रयांचे जागृत देवस्थान आहे. जुन्नर पासून ५५ किमी, आळेफाटा पासून १५ किमी, संगमनेर पासून ४० किमी अंतरावर अकलापूर हे गाव आहे. मुळा आणि कास नदीच्या संगम तीरावरून काही अंतरावर हे गाव वसले आहे. ह्या देवस्थानास सुमारे १२०० वर्षांपासूनचा इतिहास आहे. नवसाला पावणारा दत्त अशी ह्या देवस्थानची महती आहे. जुन्नर, संगमनेर, पारनेर, अकोले, आंबेगाव, राहता, राहुरी आणि पुणे-नाशिक-नगर जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.

शेकडो वर्षांपूर्वी एका भक्ताच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला कि गावच्या उत्तरेला एका टेकडीतुन (अनुसया टेकडी) मला बाहेर काढ. गावकऱ्यांनी मिळून श्री दत्तात्रेयांची स्वयंभू मूर्ती उत्खनन करून बाहेर काढली आणि तिची षोडशोपचार पूजा करून प्राणप्रतिष्ठा केली.

संत कोंडाजी बाबा हे दत्त महाराजांचे निस्सीम भक्त होते श्री दत्तात्रेयांच्या मंदिर सभामंडपात श्री संत कोंडाजी बाबा यांची संजीवन समाधी आहे. दर गुरुवारी सकाळी ८.३०, दुपारी १२.३० व सायंकाळी ७.३० वाजता महाआरती असते व महाआरतीला हजारो भाविक उपस्थित असतात. आज हि अकलापूर गावात गुरुवार हा दिवस पवित्र मानला जातो. श्री दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा या दिवशी लाखो भाविक श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाला येतात. हजारो भाविकांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्णत्वास गेलेल्या आहेत.

११ व्या शतकात पैठणहून आळंदी च्या प्रवासात श्री संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई त्यांच्या रेड्यासमवेत अकलापूर येथे मुक्कामास होते. ह्या पवित्र स्थळाचा उल्लेख संत नामदेवांनी आपल्या ग्रंथात केला आहे. पुढे हि चारही भावंडे आळे (ता. जुन्नर) येथे जाऊन त्यांनी रेड्याला समाधी दिली. अनेक लेखकांच्या पुस्तकात अकलापूर चा उल्लेख आढळतो.

४०० वर्षांपूवी एक महान योगी श्री रंगदास स्वामी अकलापूर मध्ये शेकडो गाईंच्या कळपासह अवतरले. ते कुठून आले याची कुणालाही कल्पना नव्हती. श्री रंगदास स्वामी यांनी १२ वर्ष तपश्चर्या केली असा इतिहास आहे म्हणून अकलापूरला श्री रंगदास स्वामींची तपोभूमी म्हणूनही ओळखले जाते. येथून जवळच असणाऱ्या आणे(ता. जुन्नर) या गावी त्यांची समाधी आहे. २००३ साली अकलापूर ग्रामस्थांनी दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले आणि विश्वगौरव पुरस्कार प्राप्त, प. पू. स्वामी गगनगिरी महाराज यांच्या हस्ते सुवर्ण कलशारोहण सोहळा पार पडला.

असे हे धार्मिक, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा लाभलेल्या आणि दत्त महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र अकलापूर ला एकदा तरी अवश्य भेट द्यायलाच हवी.

- संतोष शिरोळे