फणसाड अभयारण्य
६९.७९ चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या फणसाड अभयारण्याची स्थापना २५ फेब्रुवारी १९८६ साली झाली. आज फणसाड अभयारण्य म्हणून जो परिसर ओळखला जातो तो सारा परिसर तत्कालीन जंजिरा संस्थानाचे नवाब यांचे राखीव शिकारी जंगल होते.
रानआंबा, साग, अंजन, जांभूळ, ऐन, केंजळ, हैद, काकड, शिरस, काशिद आदी वृक्षांची दाटी आणि बिबट्या, कोल्हे, तरस, भेकर, रानडुक्कर, रानमांजर, उदमांजर आदी प्राण्यांचा वावर असलेले फणसाड अभयारण्य रायगड जिल्ह्याच्या मुरुड तालुक्यात स्थित आहे.
६९.७९ चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या फणसाड अभयारण्याची स्थापना २५ फेब्रुवारी १९८६ साली झाली. आज फणसाड अभयारण्य म्हणून जो परिसर ओळखला जातो तो सारा परिसर तत्कालीन जंजिरा संस्थानाचे नवाब यांचे राखीव शिकारी जंगल होते. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर काहीच दिवसांनी जंजिरा संस्थान भारतात विलीन करण्यात आले. परिणामतः नावाबाचे राखीव जंगलही सरकारजमा झाले.
पूर्वी या राखीव जंगलास केसोली जंगलया नावाने ओळखले जात असे . या अभयारण्यात अनेक दुर्मिळ वृक्षराजी, पक्षी, सरीसृप व प्राण्यांचा वावर आहे. दुर्मिळ समजली जाणारे शेकरु सुद्धा येथे पहावयास मिळते.
फणसाड अभयारण्यात गुम्याचा माळ, घोट्याचा माळ, चाकाचा माळ, मांडवाचा माळ इत्यादी गवताळ मैदानी प्रदेश आहेत. इथे तृणभक्षी प्राणी पाहावयास मिळतात. पाणवठ्याजवळ मराल, बगळे, करकोचे, पाणडुबे इत्यादी जलपक्षी दिसतात.
जंगली सातभाई, मैना, भारद्वाज, पोपट, पारवा, पिंपळा, घुबड, खंड्या, गावतित्तर, जंगली तित्तर आदी साठ ते सत्तर प्रकारचे रानपक्षी फणसाडमध्ये आहेत. नव्वद प्रकारच्या वृक्षवेली व गवताचे अनेक प्रकार जंगलात आहेत.
अभयारण्यात पळसगाव, धारणगाव, डुक्करगाव, कासोलीगाव. सावरगाव आदी ठिकाणी पाणवठे असले तरी हे पाणवठे उन्हाळ्यात कोरडे पडत असल्याने अभयारण्यातील प्राणी व पक्ष्यांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येते. मध्यंतरी अभयारण्याचा विस्तार करण्याचा प्रस्ताव होता मात्र त्यामुळे मुरुड तालुक्यातील अनेक गवे विस्थापित झाली असती त्यामुळे विस्तारीकरण झाले नाही.
समुद्र किनारा जवळ असलेले फणसाड हे महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य आहे. अलिबाग रेवदंडा मार्गे फणसाड येथे जाता येते. खोपोली पाली रोहा मुरुड मार्गेही फणसाड येथे जाता येते. सुपेगावमार्गे मुरुड येथे जाणारी प्रत्येक बस ही फणसाड अभयारण्यातून जाते त्यामुळे सुपेगाव येथे उतरून फणसाड येथे जाता येते.
वृक्षराजी व जीववैविध्याने परिपूर्ण अशा या टुमदार अभयारण्याचा सर्वांगीण विकास झाला तर फणसाड अभयारण्य हे जागतिक कीर्तीचे अभयारण्य म्हणून नावारूपास येईल यात संशय नाही.