पुण्याच्या तुळशीबागेची माहिती व इतिहास

पुण्यात पूर्वी विपुल बागा होत्या हे आपल्याला ठाऊक आहेच मात्र एखाद्या वनस्पतीवरून नाव मिळालेल्या ज्या दोन प्रख्यात बागा पुण्यात होत्या त्यांची नावे बेलबाग आणि तुळशीबाग अशी होती आणि तुळशीबाग ही खरोखर तुळशीची विपुल झाडे असलेली अदमासे एक एकरात विस्तार असलेली एक बाग होती.

पुण्याच्या तुळशीबागेची माहिती व इतिहास

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यातील महिलांचे अत्यंत आवडते स्थळ म्हणजे तुळशीबाग. कपडे, दागिने, भांडी, केशभूषा, रंगभूषा, पूजासाहित्य, घरगुती साहित्य इत्यादी स्त्रियांस उपयोगी अशा सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने वर्षाचे बाराही महिने तुळशीबागेत ग्राहकांची गजबज असते व सणासुदीच्या काळात तर हा परिसर गर्दीने प्रचंड फुलून गेलेला असतो.

तुळशीबागेतील राममंदिर सुद्धा पुण्यातील प्रसिद्ध मंदिरापैकी एक असून अनेक भाविक दररोज श्रीरामाचे दर्शन घेण्यास तुळशीबागेतील या मंदिरात येत असतात.

अशा या प्रसिद्ध तुळशीबागेचा इतिहासही तेवढाच रोचक व वेधक असा आहे व तो तुळशीबागेस एकदा तरी भेट दिलेल्या प्रत्येकास ठाऊक असला पाहिजे कारण सहसा तुळशीबाग हा शब्द प्रथमच ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर येथे ती तुळशीची विपुल झाडे असणारी बाग मात्र प्रत्यक्ष भेट दिल्यावर येथे वेगळेच दृश्य दिसून येते त्यामुळे या परिसरास तुळशीबाग हे नाव का व कसे पडले हे सर्वप्रथम जाणून घेऊ.

पुण्यात पूर्वी विपुल बागा होत्या हे आपल्याला ठाऊक आहेच मात्र एखाद्या वनस्पतीवरून नाव मिळालेल्या ज्या दोन प्रख्यात बागा पुण्यात होत्या त्यांची नावे बेलबाग आणि तुळशीबाग अशी होती आणि तुळशीबाग ही खरोखर तुळशीची विपुल झाडे असलेली अदमासे एक एकरात विस्तार असलेली एक बाग होती. अठराव्या शतकात या बागेची मालकी खासगीवाले या घराण्याकडे होती. हे घराणे पुण्यातील एक प्रतिष्ठित घराणे मानले जात असे व पेशवे दरबारी सुद्धा त्यांचे मोठे प्रस्थ होते.

तुळशीबाग ही खासगीवाले यांच्या काळात फक्त एक बाग असली तरी पुढील काळात तिला जो संस्थानाचा दर्जा ज्यांच्या काळात मिळाला त्या पुणे प्रांताचे सुभेदारपद भूषविलेल्या नारो अप्पाजी यांच्या कारकिर्दीची माहिती घेऊ. नारो अप्पाजी यांचे पूर्ण नाव नारायण अप्पाजी खिरे असे असून त्यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील पाडळी हे होते व त्यांच्या घराण्याकडे या गावाच्या कुलकर्णपदाचे इनाम होते. नारायण हे अप्पाजी यांचे सर्वत्र लहान व लाडके पुत्र मात्र जन्मताच अत्यंत स्वाभिमानी स्वभाव असल्याने त्यांचे पुढे कसे होणार याची चिंता कायम त्यांच्या आई वडिलांना असायची. एके दिवशी नारायणाला आई कुठल्यातरी कारणावरून बोलली तो राग पकडून त्यांनी 'आता मी माझ्या स्वबळावरच काही तरी करून दाखवणार' अशी प्रतिज्ञा करून आपले घर सोडले आणि पुण्यास निघून आले. यावेळी त्यांचे वय फक्त दहा वर्षे होते.

पुण्यास आल्यावर नारायण अप्पाजी पुण्याच्या आंबील ओढ्याच्या काठी असलेल्या रामेश्वराच्या मंदिरात आसरा घेतला आणि एके दिवशी आई वडिलांची आठवण येऊन त्यांना रडू येत असताना तुळशीबागेचे मालक गोविंदराव खासगीवाले हे रामेश्वराच्या दर्शनास मंदिरात आले व त्यांनी या लहान बालकास रडताना पहिले आणि त्याची चौकशी केली. नारो अप्पाजींनी त्यांना घडून गेलेली सर्व हकीकत सांगितली. ही हकीकत ऐकून गोविंदरावांना त्यांची दया आली आणि त्यांनी नारायण अप्पाजींना आपल्या घरी नेऊन त्यांच्या राहण्याची व अन्न पाण्याची व्यवस्था केली. गोविंदरावांनी नारायणाचे लाडाने नारो असे नामकरण केले व तेच पुढे कायम राहिले.

पुण्यात राहत असताना हातास काही तरी काम हवे म्हणून नारो अप्पाजींनी प्रथम तुळशीबागेतील तुळस, बेल, दुर्वा, फुले इत्यादी रोज सकाळी जमा करून ती खासगीवाले यांना पूजेसाठी नेऊन देण्याचे काम सुरु केले.

बालवयातच नारो अप्पाजींनी दाखवलेली चुणूक पाहून गोविंदराव खुश झाले व त्यांनी नारो अप्पाजींना आपले मानसपुत्र मानून पेशव्यांचे खासगीतले हिशोब तपासायचे काम सोपवले. पुढे जमाखर्च लिहिण्यात नारो अप्पाजींनी दाखवलेली कर्तबगारी पाहून त्यांना सातारा दरबारात जमाखर्च लिहिण्याचे काम मिळाले व त्यांनी पुढे 'कामाचे मर्दाने लिहिणारा' असा लौकिक कमावला व छत्रपतींनी खुश होऊन त्यांना इंदापूर प्रांताचा मुकादम केले. १७४७ साली पेशव्यांनी छत्रपतींना विनंती केली की पुणे दरबारी जमा खर्चाचे काम करणारा नारो अप्पाजींसारखा हुशार माणूस हवा तेव्हा छत्रपतींनी पेशव्यांची विनंती मान्य करून नारो अप्पाजींना पुण्यास पाठवले. पुण्यात आल्यावर त्यांना पुणे प्रांताची दिवाणगिरी प्राप्त झाली याशिवाय पेशव्यांच्या कोठी खात्याचे कारभारीपदी त्यांना नेमण्यात आले. याच दरम्यान गोविंदराव खासगीवाले यांनी तुळशीबाग नारो अप्पाजींना भेट म्हणून दिली.

पुढे नारो अप्पाजींना पुणे प्रांताचे सरसुभेदार हे महत्वाचे पद प्राप्त केले. नारो अप्पाजी यांचे मूळ आडनाव खिरे असे असले तरी तुळशीबागेशी असलेल्या त्यांच्या ऋणानुबंधामुळे त्यांना पुढे तुळशीबागवाले या आडनावानेच ओळखले गेले. अशाप्रकारे नारो अप्पाजींनी आपल्या कर्तृत्वाने आपले स्थान निर्माण केले असले तरी अगदी सुरुवातीच्या काळात पुण्यातील रामेश्वर मंदिर व खासगीवाले यांच्या मुळेच आपला उत्कर्ष झाला याची जाणीव ठेवून त्यांनी तुळशीबागेत श्रीरामाचे मंदिर उभारले. यानंतर तुळशीबाग ही फक्त बाग न राहता धार्मिक संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले व परिसरात पूजेचे साहित्य पुरवणारी अनेक दुकाने निर्माण झाली व ही परंपरा आजही कायम राहिली आहे.

तर हा होता पुण्याच्या प्रसिद्ध तुळशीबागेचा इतिहास. ही हकीकत भारत इतिहास संशोधन मंडळाच्या १९१५ सालच्या वार्षिक इतिवृत्तात पां. न. पटवर्धन यांनी लिहिली असून ही कथा त्यांना नारो अप्पाजी यांचे वंशज नानासाहेब तुळशीबागवाले यांच्या मुलाने सांगितल्याचे नमूद केले आहे.