अभिजात मराठी भाषेचा जागर

अभिजात मराठी भाषेचे महत्व हे तिच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारश्याशी जोडलेले आहे. हा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेच्या जतनासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळेल, ज्यात संशोधन केंद्रे, अनुवाद प्रकल्प आणि शिष्यवृत्त्या यांचा समावेश आहे.

अभिजात मराठी भाषेचा जागर

आपल्या मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळून एक वर्ष पूर्ण  झाले व या निमित्ताने राज्यभरात व देशभरात अभिजात मराठी भाषेचा जागर सप्ताह साजरा केला जात आहे त्यानिमित्ताने  मराठी भाषेचे महत्व सर्व स्तरामध्ये पोहोचत आहे. या लेखामध्ये आपण अभिजात मराठी भाषेचा इतिहास, महत्व आणि अभिजात दर्जा मिळण्याचे फायदे जाणून घेऊ.

अभिजात भाषा म्हणजे काय?

अभिजात भाषा हा भारत सरकारद्वारे भारतीय भाषांना दिला जाणारा एक विशेष दर्जा आहे, जो प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ भाषांना दिला जातो. या दर्जासाठी भाषेचा इतिहास किमान १५०० ते २००० वर्षांचा असावा, भाषेचा साहित्यिक वारसा समृद्ध असावा आणि ती स्वतंत्र भाषा म्हणून विकसित झाली असावी. भारतात तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या भाषांना आधीच हा दर्जा मिळाला आहे, आणि मागील वर्षी मराठीसह बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत यांना सुद्धा अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे. अभिजात दर्जा मिळाल्याने भाषेच्या संशोधन, जतन आणि शिक्षणाला प्रोत्साहन मिळते.

मराठी भाषेचा प्राचीन इतिहास

मराठी भाषेचा इतिहास हा महाराष्ट्री प्राकृतपासून सुरू होतो. आधुनिक मराठी भाषा ही १३०० वर्षांपूर्वी महाराष्ट्री प्राकृतपासून उद्भवली असल्याचे मानले जाते. प्राचीन काळातील शिलालेख आणि हस्तलिखिते यातून मराठीचा उगम दिसून येतो. उदाहरणार्थ, श्रवणबेळगोळ येथील चामुंडराये कारवियले तसेच अक्षी येथील शिलाहारकालीन शिलालेख.

मराठी साहित्याचा आरंभ हाल सातवाहनाची गाथा सप्तशती पासून झाला आणि तिचा आधुनिक विकास  मुकुंदराज यांच्या 'विवेकसिंधू' तसेच सारंगधर यांच्या 'कालिकापुराण' या ग्रंथांपासून झाला, जे मराठीतील पहिले ज्ञात ग्रंथ आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वरांची 'ज्ञानेश्वरी' आणि चक्रधर स्वामींचे 'लीळाचरित्र' हे ग्रंथ मराठी भाषेची समृद्धी दाखवतात. मराठी भाषा उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेपासून दक्षिणेकडे विकसित झाली आणि तिचा उगम आर्य भाषांशी जोडला जातो.

मराठीला अभिजात दर्जा कधी आणि कसा मिळाला?

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची मागणी पूर्वी पासून सुरू होती. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली २०१३ मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली, या समितीने मराठी भाषेचा प्राचीन इतिहास आणि साहित्यिक वारसा यांचा अभ्यास केला. अखेर, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यामुळे मराठी ही भारतातील सातवी अभिजात भाषा बनली आहे. हा दर्जा मिळवण्यासाठी मराठी भाषेचा १५०० ते २००० वर्षांचा इतिहास आणि तिचे स्वतंत्र विकास हे मुख्य निकष पूर्ण झाले.

अभिजात मराठी भाषेचे महत्व आणि फायदे

अभिजात मराठी भाषेचे महत्व हे तिच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारश्याशी जोडलेले आहे. हा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेच्या जतनासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळेल, ज्यात संशोधन केंद्रे, अनुवाद प्रकल्प आणि शिष्यवृत्त्या यांचा समावेश आहे. मराठी साहित्य, इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास वाढेल, आणि तरुण पिढीला आपल्या भाषेचा अभिमान वाटेल.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

  • शैक्षणिक विकास: अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी विशेष प्रशिक्षण आणि संशोधन सुविधा.
  • सांस्कृतिक जतन: प्राचीन हस्तलिखिते आणि ग्रंथांचे प्रशिक्षण.
  • आर्थिक लाभ: साहित्य, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन.

अभिजात मराठीचा अभिमान बाळगू

मराठीस मिळालेला अभिजात मराठी भाषा हा केवळ एक दर्जा नाही, तर मराठी भाषेच्या प्राचीन आणि समृद्ध वारश्याची ओळख आहे. ज्ञानेश्वरीपासून ते आधुनिक साहित्यापर्यंत मराठीने जगासाठी दिलेल्या योगदानामुळे हा दर्जा सार्थ ठरतो. अभिजात मराठी भाषेच्या जागर सप्ताहाच्या निमित्ताने मराठीचा वारसा जगभरात पोहचवून मराठी भाषेचा जयजयकार जगभरात नेण्याचा संकल्प करूयात.