म्हावशी येथील मध्ययुगीन पेव

धान्य साठवून करायची पेव हे चोरापासून सुरक्षित असली तरी त्यामधे ठेवलेले धान्य किड व ओलाव्या यापासून शाबूत राहिले पाहिजे. पेव मुख्यतः फक्त पांढऱ्या शुभ्र असलेल्या मातीतच सुरक्षित होऊ शकते हे त्याकाळातील लोकांना ज्ञात होते कारण ह्या मातीत पावसाचे किंवा अन्य मार्गाने आलेले पाणी सर्वात कमी झिरपते. - सुरेश नारायण शिंदे (भोर)

म्हावशी येथील मध्ययुगीन पेव

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर म्हावशी ता.खंडाळा, जि.सातारा येथे पुरातन पेव (बळद) किंवा मंदिर आहे असे माझ्या वाचण्यात आले होते. दि.२६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी  श्री.आनंद गोसावी सर हे माझ्याकडे काही कामानिमित्ताने आले होते, तेव्हा आज दुपारी वेळ आहे का? असे विचरताच त्यांनी कारण विचारले, तेव्हा मी म्हावशी येथे जायचे आहे हे सांगितले. दुपारी ३ वाजता मी आणि सर दोघेही त्यांच्या चारचाकीतून म्हावशीला जाणेसाठी निघालो. 

भोरहून सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर म्हावशी हे खंडाळा तालुक्यातील गाव आहे तर खंडाळ्याच्या पूर्वेस सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे. खंडाळाकडून जाताना म्हावशी गावाच्या अलिकडे दक्षिणोत्तर वाहणारा ओढा आहे. ओढ्याच्या पैलतीरावर म्हावशी गावची लोकवस्ति असून ओढ्याच्या अलिकडे रस्त्यालगत डाव्या बाजूला दक्षिणाभिमुख ग्रामदैवतेचे मंदिर व शिक्षण संकुल आहे. मंदिराकडे जाताना डाव्या बाजूस झुडुपांतून पांढऱ्या मातीचे शिखरवजा असलेले दोनचार उंचवटे दृष्टीस पडतात. हेच ते म्हावशी गावचे मध्ययुगकालीन पेव ( बळद ).

मानव वस्ति करून राहू लागल्यावर आपल्या आवश्यक असलेल्या निवासस्थानात काळानुरूप सुरक्षितते पर्याय निवडले. मध्ययुगात आपल्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी समाज व्यवस्थेने भक्कम तटबंदीयुक्त वाडे निर्माण केले आहेत. तत्कालीन परिस्थितीत संपत्ती म्हणजे पशुधन, धनधान्य होते आणि लुटारू किंवा चोर याचींच लूट करायचे. वर्षभर शेतात राबुन निर्माण झालेले धान्य गेले तर वर्षभर कुटुंबाच्या उदरनिर्वाह कसा करायचा ही शेतक-यांची मोठी समस्या होती. धान्य साठवणूक करण्यासाठी त्यावेळी बांबूपासून निर्माण केलेली पाच फूटांपर्यत उंचीच्या गोलाकार कनिंग असायच्या परंतु त्यांची क्षमता व उत्पादित झालेल्या धनधान्याचा मेळ बसेलच याची खात्री नसायची. आणि घरात चोराला धान्य चोरून नेण्यासाठी सहजच उपलब्ध व्हायची शक्यता देखील होती. मग अशावेळी तत्कालीन समाजाने वाड्यातच जमीनीखाली गुप्तपणे धान्य साठविण्याची गोदामे म्हणजे पेव किंवा बळद निर्माण केले.  

धान्य साठवून करायची पेव हे चोरापासून सुरक्षित असली तरी त्यामधे ठेवलेले धान्य किड व ओलाव्या यापासून शाबूत राहिले पाहिजे. पेव मुख्यतः फक्त पांढऱ्या शुभ्र असलेल्या मातीतच सुरक्षित होऊ शकते हे त्याकाळातील लोकांना ज्ञात होते कारण ह्या मातीत पावसाचे किंवा अन्य मार्गाने आलेले पाणी सर्वात कमी झिरपते. म्हणजे पांढऱ्या मातीच्या खोल जमिनीत ओलावा नसतो. साठवणूक करायचे धान्य चांगल्याप्रकारे सूर्यप्रकाशात वाळवून घेतले जायचे. त्यानंतर जमिनीखाली फूट खोल खड्डा ( म्हणजे पेव) घेऊन आतील भागात अपेक्षित धान्यसाठा ठेवता येईल इतके मोठे गोदाम निर्माण केले जायचे. जर पेव मोठे असेल तर आतील हौद्यात चौहोबाजूने पांढऱ्या मातीच्या भेंड्यांची (थापिव वीटा) भिंत लावली जायची. आतील धान्य काढण्यासाठी एकच व्यक्ति आत सहज प्रवेश करू शकेल इतकी एक किंवा त्यापेक्षा जास्त मार्ग असायचे. ग्रामीण भागातील गावठाण हद्दीत आजहि नवीन इमारतीचे बांधकाम करताना अशी अनेक पेव लोकांना आढळून येतात. 

म्हावशी येथील अनेक थापलेल्य पांढऱ्या मातीची अनेक शिखरे असलेले पेव समुहच असावा मात्र जमिनीच्यावर शिखर असलेले अद्यापही एक पेव असल्याचे माझे वाचनात आलेले नाही तर जमिनीखाली पांढऱ्या मातीतील मंदिरहि ऐकण्यात नाही. माझ्या अंदाजानुसार हे पेव असावे मात्र शिखरासम आकारा का? हा प्रश्न पडतोच. हे पेव म्हणजे जमिनीखालील दोन तीन खोल्यांचे आहेत. पेवच्या वरील भागातून चारहि दिशेला एक व्यक्ति आत जाऊ शकेल इतक्या वाटा आहेत. जर हे पेवच असतील तर ज्या व्यक्तिने ह्याची निर्मिती केली असेल तो अतिशय श्रीमंत म्हणजेच जमीनदार असावा किंवा मग हे सामुदायिक धान्य साठवणूक करण्याचे ठिकाण असावे. या पेव समुहाशेजारी हिंगळाई देवाचे छोटेखानी नवीनच निर्माण केलेले अर्धवट मंदिर आहे. ही मूर्ती अलिकडच्या काळातील असून ती मोकळ्या पेवात ठेवली होती असे स्थानिकांच्या बोलण्यातून येते.   

म्हावशी येथील हे स्थळ पाहून आनंद वाटला परंतु ह्या पेवावर व आजूबाजूला झुडुपांचे साम्राज्य असल्याने तेथे विषारी सर्पांचा वावर दिसून आला. हे स्थळ पाहताना  शक्यतो सुरक्षित अंतरच ठेवावे ही नम्रपणे कळकळीची विनंती.

© सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])