खोकरीचे घुमट - सिद्दी राज्यकर्त्यांची दफनभूमी

खोकरी गावात शिरल्यावर इस्लामी वास्तुशास्त्राचा प्रभाव असलेल्या तीन भव्य वास्तू आपल्या नजरेत भरतात. प्रथमच पाहणाऱ्यास या वास्तू म्हणजे एखादे धर्मस्थळ आहे का असे वाटू शकते मात्र या तीन वास्तू जंजिरा राज्याच्या तीन तत्कालीन शासकांच्या कबरी आहेत.

खोकरीचे घुमट - सिद्दी राज्यकर्त्यांची दफनभूमी
खोकरीचे घुमट

आयुष्यात कितीही यश प्राप्त केले तरी मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे. मृत्यूपासून जगातील कुणीही सुटलेला नाही. असे असले तरी आपला मृत्यू झाल्यावर आपले नाव व आठवण कायम राहावी यासाठी प्रत्येक मनुष्य प्रयत्न करीत असतो. राज्यकर्त्यांमध्ये तर ही भावना जुन्या काळापासून चालत आली आहे. काही जण त्यांच्या कार्यामुळे आठवणीत राहतात तर काही जण त्यांच्या कर्तृत्वामुळे. हे कर्तृत्व चांगले की वाईट ही बाब येथे दुय्यम राहते कारण माणूस हा जसा चांगल्या कामासाठी आठवणीत राहतो तसाच वाईट कामासाठी सुद्धा व प्रत्येकाच्या विचारसरणीनुसार कार्य चांगले की वाईट याची परिभाषा बदलत असते.

अनेक राज्यकर्त्यांनी आपला मृत्यू झाल्यानंतर आपले प्रशस्त स्मारक व्हावे व त्यारूपातून आपला इतिहास पुढील पिढयांना कळावा या अपेक्षेने मृत्यूनंतर आपल्या स्मारकाची व्यवस्था करून ठेवली. काहींची स्मारके बहुतांशी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वंशजांनी निर्माण केली मात्र काही स्मारके अशीही होती की ती राज्यकर्त्यांनी आपला मृत्यू होण्यापूर्वीच बांधून घेतली जेणेकरून मृत्यूनंतर आपण तर स्मारक पाहायला नसणार त्यामुळे आधीच तजवीज करून ठेवलेली बरी असा हेतू त्यामागे होता.

रायगड जिल्ह्याच्या मुरुड जंजिरा तालुक्यातील खोकरी येथील सिद्दी राज्यकर्त्यांच्या कबरी सुद्धा मरणापूर्वी बांधण्यात आलेल्या स्मारकांचे उत्कृष्ट उदाहरणे आहेत. खोकरी हे गाव मुरुड या तालुक्याच्या शहराच्या दक्षिणेस ६.४ किलोमीटर अंतरावर आहे व जंजिरा किल्ला आणि राजपुरीच्या पूर्वेस विरुद्ध दिशेस आहे. खोकरी गावं तसे छोटेसेच मात्र निसर्गरम्य असून नारळ सुपारीच्या विपुल बागा परिसरात आढळतात. 

खोकरी गावात शिरल्यावर इस्लामी वास्तुशास्त्राचा प्रभाव असलेल्या तीन भव्य वास्तू आपल्या नजरेत भरतात. प्रथमच पाहणाऱ्यास या वास्तू म्हणजे एखादे धर्मस्थळ आहे का असे वाटू शकते मात्र या तीन वास्तू जंजिरा राज्याच्या तीन तत्कालीन शासकांच्या कबरी आहेत.

आणि विशेष म्हणजे या कबरी त्या शासकांनी आपल्या मृत्यूपूर्वीच तयार करून ठेवल्या होत्या. या तीन स्मारकांपैकी एक स्मारक भव्य असून इतर दोन स्मारके लहान आहेत मात्र असा अंदाज लावणे चुकीचे ठरेल की दोन लहान स्मारके दुय्यम दर्जाची आहेत उलट ही दोन स्मारके सुद्धा मुख्य राज्यकर्त्यांचीच आहेत व यांच्या बांधणीचा कालावधी मोठ्या स्मारकापुर्वीचा आहे.

या स्मारकांच्या आकारांपेक्षा आपण स्मारकाच्या कालावधीनुसार त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. छोट्या दोन स्मारकांपैकी पहिले स्मारक आहे सिद्दी खैरीयत याचे, हा १६६७ ते १६९६ पर्यंत जंजिऱ्याचा शासक होता व याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दी पहिल्या होत्या. एक काटक व चिवट सिद्दी राज्यकर्ता म्हणून सिद्दी खैरीयत याचे नाव घेतले जाते. मोगलानी रायगड घेतल्यावर हा किल्ला त्यांनी सिद्दी खैरीयतच्या स्वाधीन केला होता व हा रायगड किल्लयावर मरेपर्यंत होता मात्र मरणानंतर आपल्याला जंजिऱ्याजवळ दफन केले जावे अशी त्याची इच्छा असल्याने त्याने खोकरी येथे घुमट बांधून आपली व्यवस्था करून ठेवली होती. हा गेल्यावर त्याचे प्रेत शवपेटीत घालून खोकरी येथे आणण्यात आले व दफन करण्यात आले.

सिद्दी खैरीयत च्या कबरीच्या बाजूस असलेली त्याच आकाराची दुसरी कबर ही सिद्दी कासीम उर्फ याकूतखान याची आहे. हा सिद्दी खैरीयतचा छोटा भाऊ होता. सिद्दी खैरीयत आणि सिद्दी कासीम यांची लष्करी कारकीर्द समांतर काळातील असली तरी त्याच्याकडे जंजिऱ्याच्या वजीरपदाची सूत्रे सिद्दी खैरीयतच्या मृत्यूनंतर म्हणजे १६९६ साली आली. सिद्दी कासिमचा मृत्यू १७०६ साली झाला व मृत्यूनंतर त्यालाही खोकरी येथील त्यानेच स्वतःसाठी बांधून ठेवलेल्या घुमटामध्ये दफन करण्यात आले.

तिसरा व सर्वात मोठा घुमट आहे सिद्दी सुरुलखान याचा. हा सिद्दी कासीम याचा चेला कांसा किल्ल्याचा किल्लेदार म्हणून काम करीत होता. सिद्दी कासीम यास उत्तराधिकारी नसल्याने त्याने सिद्दी सुरुलखान याच्याकडे राज्याची सूत्रे दिली. १७०६ साली सिद्दी सुरुलखान वजीरपदी बसला, त्याची कारकीर्द १७३२ पर्यंत त्याच्या मृत्यूपर्यंत चालली. मरणापूर्वी त्यानेही आपल्याकरिता भव्य असा घुमट बांधून घेतला आणि त्याची आपल्या मरणानंतर नीट व्यवस्था व्हावी यासाठी सावली आणि मिठागर या दोन गावांचे उत्पन्न आणि फैमखारीचे व दांडा येथील काही वाड्यांचे उत्पन्न त्या घुमटाच्या खर्चाकरिता नेमून दिले होते. आणि अशी सनद केली की घुमटाच्या व्यवस्थेकरिता ठेविलेल्या मनुष्याच्या नेमणूका जाऊन जो पैसा शिल्लक राहील तो घुमटाच्या फैमखारीच्या दुरुस्तीसाठी लावण्यासाठी अनामत ठेवावा आणि या उत्पन्नावर माझ्या वारसांचा हक्क नसणार. ही सनद त्याने फैम नावाच्या आपल्या अधिकाऱ्यास सोपवली आणि १७३२ साली त्याचा मृत्यू झाला.

हा आहे खोकरी येथील घुमटांचा इतिहास. स्वराज्याचा एक प्रमुख शत्रू म्हणून सिद्दी वंशाची ओळख आहे. निजामशाही, मोगल, आदिलशाही या सत्तांचे गरजेनुसार मांडलिकत्व स्वीकारून आपले अस्तिव टिकवून ठेवण्यामध्ये सिद्दी यशस्वी झाले. शिवरायांनी सिद्दीचा सर्व मुलुख जिंकला होता मात्र त्यांचे केंद्रस्थान जंजिरा मात्र अजिंक्य राहिला. शाहू महाराजांच्या काळात तर सिद्दीला मराठ्यांसोबत तह करून आपले अस्तित्व वाचवावे लागले होते. इंग्रजांनी कालांतराने सिद्दीवर अप्रत्यक्षरीत्या अमल प्राप्त केला तरी जंजिरा हा किल्ला सिद्दीच्याच ताब्यात होता. १९४८ साली म्हणजे भारत ब्रिटिशांच्या ताब्यातून स्वतंत्र झाल्यानंतर एक वर्षांनी जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले. इतिहासाचा साक्षेपी अभ्यास करणाऱ्यांनी खोकरीचे हे घुमट एकदा तरी पाहावेत.