वाठार निंबाळकर
ऐतिहासिक कालखंडात सातारा प्रांतातील फलटण संस्थानच्या नाईक निंबाळकर घराण्याचा मूळ पुरुष निंबराज पवार हे अस्सल रजपुतकुलांपैकी एक घराणे आहे.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
दि.१/८/२०२१ रोजी कुशाजीराव नाईक निंबाळकर यांच्या वाठार निंबाळकर या गावाला चंद्रशेखर शेळके यांच्या सोबत जाण्याचा योग आला. सकाळी नऊ वाजता भोरहून चारचाकीतून आमचा प्रवास सुरू झाला. शिरवळ येथे चहापान करून आम्ही पुढे प्रवासाला निघालो. पावसाळ्यातील वीर जलाशयाचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवित लोणंदला गेलो. लोणंद ते फलटण रस्त्याने जाताना निंभोरे गावाच्या पुढे वडजल गाव लागले. याच गावातून उजवीकडून वाठार निंबाळकरकडे जाणाऱ्या रस्त्याने वाठार निंबाळकर येथे सकाळी अकरा सव्वा अकराच्या सुमारास पोहोचलो. भोरपासून सुमारे ७६ किलोमीटर प्रवास झाल्यामुळे काहीसा कंटाळा आला होता पण कुशाजीराव नाईक निंबाळकरांनी बांधलेली उत्तराभिमुख वेस व भव्य प्रवेश कमान पाहून एक चैतन्य आले. तिची भव्यता पाहून नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास डोळ्यासमोर चलचित्रांच्या स्वरूपात उभा राहिला.
ऐतिहासिक कालखंडात सातारा प्रांतातील फलटण संस्थानच्या नाईक निंबाळकर घराण्याचा मूळ पुरुष निंबराज पवार हे अस्सल रजपुतकुलांपैकी एक घराणे आहे. निंबराज हे उत्तरहिदुस्थानांतील प्रख्यात असलेल्या धारानगरीतील पवार आडनावाचे मान्यवर व्यक्तीमत्व होते. उत्तर हिंदुस्थानात यवन सत्ता प्रबळ झाल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात असलेल्या निंबराजने धारानगरीचा ( धार संस्थान ) त्याग करून काही वर्षे दक्षिण हिंदुस्थानातील जंगलात वास्तव्य केले. तेथे असताना त्यांना " तुमच्या घराण्याला उज्वल भविष्य "असल्याचे दैवी संकेत मिळाले व ते दक्षिण हिंदुस्थानात कायमचे स्थायिक झाले. सातारा प्रांतातील फलटणच्या पूर्वेस असलेल्या एका ठिकाणी काही लोक जमवून एक नवीन गावच निर्माण केले, त्यास "निंबळक" ही संज्ञा मिळाली. काही दिवसांतच निंबराज यांस याच गावातील एका निंबवृक्षाखाली एक स्वंयभू देवीची मूर्ती असल्याचा दृष्टान्त होऊन त्याप्रमाणे ती मूर्ती मिळाली. त्या देवीच्या मूर्तीला निंबजाई हे नाव देऊन त्याच ठिकाणी एक दगडी बांधकामातील सुंदर मंदिर निर्माण करण्यात आले. निंबजाई हे नाईक निंबाळकरांचे कुलदैवत मानले जाते. या शिवाय टाकळवाडी येथील देवी, राजाळे येथील जानाईदेवी व जावळी मधील जावळ सिद्धनाथ ही देखील त्याची कुलदैवते मानली जातात. निंबराज पवार यांनी स्वकर्तृत्वाने बरेच द्रव्य संपादिले होते. असे हे नाईक निंबाळकर घराण्याचे मूळ पुरुष इ.स.१२९१ मधे मृत्यू पावले. त्यांच्यानंतर त्यांच्या वंशात १) धारराव, २) निंबराज दुसरे, ३) वणंग भूपाळ, ४) वणंग पाळ, ५) वणंगोजीराव, ६) मालोजीराव, ७) बाजी साहेब, ८) पोवार नाईक ९) बाजी दुसरा १०) मुधोजी नाईक ११) बाजी धारराव व मालोजी दुसरे असे कर्तबगार पुरुष या घराण्यात होऊन गेले.
मालोजीरावांची कारकीर्द इ.स.१५६० ते १५७० पर्यंत होती. मालोजीरावांच्या धर्मपत्निचे नाव रूपाबाई असे होते व तिजपासून म्हाकोजी व अरजोजी असे दोन पुत्र आणि दीपाबाई नामक एक कन्या होती. ह्या दीपाबाईचा विवाह वेरुळच्या मालोजीराजे भोसले यांच्याशी झाला होता व तिच्या पोटी स्वराज्यसंस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांच्या वडिलांचा म्हणजेच शाहजी महाराजांचा जन्म झाला होता. मालोजीराव नाईक निंबाळकरांच्या मृत्यूनंतर त्यांची दोन्ही मुले म्हणजेच म्हाकोजी व अरजोजी हे विभक्त होऊन राहू लागले तेव्हा त्यांच्या मातोश्री रूपाबाईने आपल्या दोन्ही मुलांना आपल्या जाहगिरीचे वाटप स्वतः करून दिले. मालोजीरावांचे जेष्ठ पुत्र म्हाकोजीराव हे वाठारकर नाईक निंबाळकर घराण्याचे मूळ पुरुष तर फलटणची जहागीर अरजोजीराव यांच्या वाट्याला आली.
म्हाकोजीराव हे काहीसे वेडसर असल्याने व महादजी नाईक निंबाळकर हे छत्रपति शिवाजी महाराजांचे जावई असल्याने त्यांच्या प्रभावामुळे म्हाकोजींना मूळ जहागीरीचा व मिळकतीचा निम्मा हिस्सा पूर्णपणे उपभोगता आला नाही. ते फक्त वाठार गावचे इनामी वतन, शे-या, देशमुखी, पाटीलकी इत्यादीं उत्पन्नाचा उपभोग घेत राहिले.
त्यानंतर वाठारकर नाईक निंबाळकरांच्या पाच पिढ्यापर्यंतची विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही मात्र वाठारकर व फलटणकर यांच्यात नेहमीच भाऊबंदकी चालू असल्याचे संकेत मिळतात व यातहि वाठारकर नेहमीच दुय्यम ठरले आहेत. पाच पिढ्यानंतर मात्र कुशाजी बिन संताजी नाईक निंबाळकर हा कर्तृत्ववान पुरुष निघाला, अर्थात तो कालखंडही पेशवाईचा होता. संताजींच्या पाच मुलांची नावे अनुक्रमे मोरोजी, द्वारकोजी, सिदोजी, रामजी व कुशाजी अशी होती. यापैकी मोरोजी व द्वारकोजी हे नकल तर बाकी तीनहि मुलांचा वंशविस्तार झाला. सिदोजीराव निंबाळकर हे शिंदे सरकाराच्या सेवेत राहून इतिहासात मोठमोठे पराक्रम करीत सरलष्कर हुद्यापर्यंत पोहोचले होते. तसेच रामजी देखील परमुलूखांस आपले नशीब काढण्यासाठी गेले. कुशाजी हे संताजीचे एकमेव पुत्र मात्र वाठारास राहिले. सिदोजीराव जरी शिंदे सरकारच्या सेवेत होते तरी वाठारच्या उत्पनात हिस्सा असल्याने नव्या व जुन्या वाठार गावच्या मध्यभागी भव्य मोठा वाडा बांधला होता. कुशाजीने आपल्या कर्तृत्वाने मोठ्या प्रमाणात धन संचय केला असल्याचे दिसून येते. कुशाजीरावांच्या धनसंचयाबाबत अनेक आख्यायिका असून विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही. कुशाजीने इतरांना कर्जाऊ पैसे दिलेल्या रकमांच्या तपशीलामुळे त्यांची संपत्ती किति असावी याचा खालील उदाहरणाहून आपणांस अंदाज करता येईल.
१) श्रीमंत पेशवे सरकार - २,००,००० /-
२) श्रीमंत होळकर सरकार - १,००,००० /-
३) श्रीमंत पंतसचीव - २,१७,२८० /-
४)श्रीमंत दौलतरावमहाराज शिंदे - २,०८,००० /-
५)श्रीमंत फलटणकर - १,९०,३२९ /-
एकूण रक्कम १०,१५,६०९ /- रुपये इतकी कर्जाऊ दिली असल्याने त्यांची आर्थिक स्थिति लक्षात येते, तसेच याशिवाय श्रीमंत कोल्हापूरकर यांसहि कर्ज दिले होते. अजूनहि इतर लोकांना कुशाजीने दिलेल्या लहानमोठ्या कर्जाऊ रकमेची लांबलचक मोठी यादी होऊ शकेल. इ.स.१८०० मधे भोर संस्थानचे अधिपति श्रीमंत चिमणाजी शंकर सचीव यांस पेशव्यांचा नजराणा भरण्यास अडचण होत असल्याने त्यांनी कुशाजीकडून आर्थिक मदत घेतली व त्याच्या बदल्यात संस्थानच्या हद्दीतील शिरवळ परगण्यातील भादे गाव हे कुशाजीस इनाम करून दिले. त्या इनामाची सनद खालीलप्रमाणे -
श्री राजश्री कुशाजी बिन संताजी निंबाळकर देशमुख मौजे वाठार परगणे फलटण गोसावी यांसीः-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित चिमणाजी शंकर सचिव आशिर्वाद सु|| इहिदे मया तैन व अलफ शके १७२२ रौद्रनाम संवत्सरे दिले इनाम ऐसे जे
राजश्री पंत प्रधान यांचे सरकारांतून साल मजकुरी इकडील संस्थानावर नजरेचा ऐवज घेतला त्यास दौलत वोढगस्त साहूकारी एवेज कोठे मिळेना. ऐवजाची बेरीज भारी याची निशापाती होऊन निर्वाह होणे कठीण पडला आणी दौलतीत नाना प्रकारचे बखेडे पडून एवेजाचा कार्यभाग सिध्दीस न जाय. तेव्हा तुम्ही आगत्य धरून नजरेचा वगैरे भरणा केला. संस्थानचे महत उपयोगी पडला. सबब तुमचे चालवणे अवश्यक जाणून तुम्हावरी कृपाळू होऊन तुम्हांस मौजे भादे प|| सीरवल हा गाव जिल्हे रुजू अमल सुभाव खालीसा दरोबस्त कुलबाब कुलकानु हली पटी व पेस्तरी पटी खेरीज हकदार व कदीम इनामदार करून जल तरू तृण काष्ठ पाषाणनिधी निक्षेप सहीत आदी करून देऊन हे इनाम पत्र भोगवटीयास सादर केले असे तरी तुम्ही व तुमचे लेकराचे लेकरी वंशपरंपरेने अनुभवून सुखरूप राहणे जाणीजे छ° ७ रमजान पो| हुजूर
श्री
शंकराजी मुद्रा
नारायण
कुशाजीच्या स्त्रीचें नाव मैनाबाई असे होते, तर तिचेपासून कुशाजीस नऊ पुत्र व एक मुलगी झाली. त्यांच्या मुलांची नावे १) व्यंकटराव २) धारराव ३) हैबतराव ४) आनंदराव ५)चिटकोजीराव ६)बापुजीराव ७) आपाजीराव ८) निलकंठराव ९) पिराजीराव पैकी बहुतेक श्रीमंत शिंदे सरकारच्या पदरी होते. कुशाजी द्रव्यसंपन्न झाल्यावर आपल्या पूर्वजांच्या वैभवाची स्मृती जागृत झाली व म्हाकोजीच्या वेडसरपणामुळे घराण्यास प्राप्त झालेली हीनकळा दूर करण्यास सुरवात केली. धनसंपन्न झाल्यावर त्यांनी पेशवे सरकार, पंतसचीव व मातबर सरदारांना अनुकूल करून त्यांचा आश्रय संपादिला. कुशाजीच्या वारसदारांनी पुढेहि वैभवाची चढती कमान केल्याचे आढळून येते म्हणजेच इ.स.१८२२ मधे कुशाजीचा नातू जोत्याजीराव (आपाजीराव पुत्र) याने दिवाळीस वाठारकर निंबाळकर घराण्याचा शिलकेचा आढावा घेतला होता, त्यात २,४८,६१,५५,४७२ ( दोन अब्ज अठ्ठेचाळीस कोटी एकसष्ट लाख पंचावन हजार चारशे बहात्तर रुपये व दोन आणे ) शिल्लक असल्याचे नमुद केले आहे. मूळच्या वाठार गावाशेजारीच कुशाजींनी नवीन वाठार निर्माण केले. छत्रपति शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य छत्रपति शाहू महाराजांच्या कालखंडात मराठा साम्राज्य म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ भट पेशवे यांच्यानंतर पेशवेपदी पहिले बाजीराव बाळाजी हे छत्रपतिंनी नियुक्त केले तोपर्यंत ते सासवड येथे राहत होते. गावे व शहरे यांना भव्य व सुंदर इमारतीशिवाय प्रतिष्ठा नाही अशी समाज मनाची ठाम धारणा होती.
इ.स.१७२९ मधे पहिले बाजीराव पेशव्यांनी पुण्यात शनिवारवाड्याचे बांधकाम सुरू करून महाराष्ट्रातील अतिशय टोलेजंग व देखणी वास्तू उभी केली. महाराष्ट्रातील सामान्य रयत शिवकाळापासून औत सोडून राऊत झाली होती ती पेशवाईत मुलुखगिरी करून धनसंपन्न होऊ लागली. आर्थिक संपन्नता आल्याने वाडे, मजबूत घरे, देखणी देवालये व नद्यांना प्रेक्षणीय घाट बांधले गेले की, त्यामुळे अखिल महाराष्ट्र नव्याने बांधून निघाला असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. हे जे चैतन्य व उत्साह समाजात निर्माण झाला त्याला सरदार व सावकार हे अपवाद कसे असतील? आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुशाजीराव नाईक निंबाळकर हे होय. त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी भुईकोट किल्ल्यासम दक्षिणोत्तर असलेला व मुख्य प्रवेशद्वार उत्तरेला असलेला टोलेजंग वाडा बांधला.
यावाड्याच्या अंतर्गत भागात आपल्या नऊ मुलांच्या कुटुंबाची स्वतंत्र राहण्याची कल्पक योजना केली होती. वाड्याचे अंतर्गत क्षेत्रफळ अतिशय विशाल असून सभोवती सुमारे ५० फूट उंचीची व १२ -१५ फूट रूंदीची संरक्षक तटबंदी आहे. या वाड्याच्या तटबंदीत सुमारे ७५ फूट परिघाचे ९ बुरूज आहेत. बुरूजाचा खालचा भाग हा काळ्या पाषाणाचा असून वरील ५|६ फूटातील बांधकाम भाजक्या विटा व चुन्याच्या बांधकामातील आहे. आक्रमक शत्रूला लांबून व जवळून टिपण्यासाठी बुरूजावर रंदे बांधलेले आहेत. मुख्य प्रवेशद्वाराचे घडीव दगडी बांधकाम चुण्याच्या मिश्रणात केले असून ते पाहताना आपल्या लक्षात देखील येत नाही. मुख्य दरवाजाचे आतील बाजूला पाच खणी तीन मजली इमारत बांधलेली होती, तिच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील दिवाणखाने प्रेक्षणीय होते. विशेषतः दुसऱ्या मजल्यावरील दिवाणखान्यात महिरपी कमानी कोरलेल्या होत्या, तर छतावर हस्तिदंती चिपा बसविल्याने छताचे सौंदर्य अधिकच खुलुन दिसायचे. हे छत पाहताना रंगीबेरंगी फुलांचा गालिचा असल्याचा नक्कीच भास होत होता. ह्या वाड्याच्या बांधकामातील सागवानी लाकडे शिरवळ येथून आणण्यात आली होती. हा वाडा कुशाजीने आपल्या नऊ मुलांसाठी बांधला असल्याने यास समाईक वाडा हे संबोधन मिळाले. ह्यात जामदारखाना असून त्याकरिता तळघराची व्यवस्था होती. वाड्यातील मुख्य दरवाजावरील नगारखान्यात प्रत्येक तासाला घंटा वाजविण्यात येत असे. वाड्याचा दरवाजा वेशीचे दारासमोर एखाद्या किल्ल्याला ज्याप्रमाणे पुढे भिंत बांधून, त्याच्या शेजारून रस्ता ठेवलेला होता. मुख्य दरवाजाच्या देवडीवर पाहारा देण्यासाठी अरब शिपायांची नियुक्ती असायची व या शिपायांना तेथे राहण्याची सोय देखील केलेली होती. या वाड्याच्या बाहेरील चोहोबाजूने सुमारे ३०० फूटाचे आवार आत ठेवून दुसरा कोट बांधला आहे. त्यास दोन मुख्य दरवाजांना वेशी म्हणण्याचा प्रघात होता. हे दोन्ही दरवाजे सुमारे ५०|६० फूट उंचीचे व भक्कम सागवाणी लाकडाचे होते. जरी खवळलेला हत्तीने जोराची धडक दिली तरी दरवाजा उघडू शकणार नाही असे होते. या वाड्याचे बांधकाम इ.स.१७९६ ते १८०५ पर्यंत सुरू होते तर यासाठी सुमारे एक कोट रुपये इतका खर्च झाल्याचा अंदाज आहे. ह्या वाड्याखेरीज नऊ मुलांसाठी स्वतंत्र नऊ वाडे देखील बांधण्यात आले होते.
कुशाजींचा तिसरा मुलगा हैबतराव यांचा वाडा थोरले वेशीनजीक असून त्यात कै. व्यंकटरावाची पत्नि हरीबाईसाहेब यांनी आपले खासगत प्रभु श्रीरामाची स्थापना करून मंदिर ,सभामंडप व एक नवीन विहीर देखील बांधली. हे मंदिर उत्तर वेशीतून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला पूर्वाभिमुखी असून चौहोबाजूने भव्य पडझड झालेली तटबंदी आहे. मध्यभागी सुरेख श्रीराम मंदिर आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला म्हणजेच उत्तरेस पूर्व - पश्चिम घडीव दगडी बांधकामातील सुंदर पायविहिर आहे. श्रीराम मंदिराचा सभामंडप नक्षीदार सागवानी खांबावर आच्छादलेला असून दोन खांबा दरम्यान कलाकुसर केलेल्या कमानीची रचना तत्कालीन उच्च अभिरुची जाणीव करुन देते. गर्भगृह तीनचार फूट उंचीवर असून भूपृष्ठाच्या दगडी फरसबंदीच्या मध्यवर्ती ठिकाणी दोन शिलालेख आहेत. श्रीरामसीता यांचे मनोभावे दर्शन घेऊन परत फिरताना एक जाणीव होती ती म्हणजे श्रीराम मंदिर परिसर हा भक्तांच्या वावराविना राहिला आहे. सभामंडपाच्या बाहेरील बाजूला वरच्या भागात तत्कालीन चित्रकला केलेली भक्तांचे मन मोहित करतात. आज देखील त्या अप्रतिम चित्रांनी मन सुखावते तर दोनशे वर्षापूर्वी काय वैभव असेल ?
त्यानंतर समायिक वाड्याच्या डाव्या बाजूस असलेल्या पडझड झालेल्या एका वाड्याचे दर्शन होते तर कुशाजींच्या समायिक वाड्याची पश्चिमेकडील मधल्या बुरूजांच्या तळाशी असलेली लहान दुसरा एकमेव चोर रस्ता असल्याचे दिसून आले. हा रस्ता संकटकाळात बाहेर पडण्यासाठी किंवा नोकरांच्या ये जा करण्यासाठी असावा. आता आम्ही मुख्य वाड्याच्या पूर्वेकडील तटबंदीकडे गेलो असताना समोरच्या बाजूला दोन नामशेष झाल्याचे अवशेष पाहत होतो तेव्हा तेथील स्थानिक असलेले श्री रोकडे नावाचे गृहस्थ भेटले. ते मला घेऊन नाईक निंबाळकर यांच्या एका वाड्यात घेऊन गेले. हा अतिशय सुंदर वाडा समायिक वाड्याच्या पूर्वेस उत्तराभिमुख आहे. आजूबाजूचा परिसरात सुंदर बागकाम केलेले आहे. ह्या वाड्याचे मालक श्री.जितेंद्रराव कृष्णराव नाईक निंबाळकर यांची भेट रोकडे यांनी करुन दिली. त्यांनी सांगितले की ते कुशाजींच्या पाचव्या मुलाचा वंशविस्तार आहे. म्हणजे श्री. जितेंद्रराव हे कुशाजींच्या चिटकोजीराव यांचे वारसदार होते. त्यांचा वाडा अतिशय प्रशस्त व सुंदर असून त्यांनी मेहनतीने आपला गौरवशाली वारसा सांभाळून ठेवल्याचे पाहून समाधान वाटते. श्री. जितेंद्रराव व कुटुंबियांनी कुशाजीराव यांच्या वाड्याचे अंतर्गत व बाहेरील बाजूने संवर्धन काम मोठ्या प्रमाणात सुरू केल्याचे दिसून आले. नैऋत्य व ईशान्य दिशेला असलेल्या दोन्ही बुरूजांचे नुतनीकरण करून पुरातन वैभव सांभाळण्याचे अतिशय खर्चाचे काम केले आहे. तसेच तटबंदीवर कोणतेही झुडुप किंवा गवत ठेवलेले नाही. याच वाड्याच्या उजव्या बाजूस पूर्वाभिमुख दोन शेजारी शेजारी समाधिस्थळ असून या दोन्ही मधे देखील उत्तरेस पन्हळी असलेल्या शिवपिंडी आहे. येथे चुन्याच्या घाण्याचे भले मोठे दगडी चाक असून या सर्व वाड्यांच्या निर्मितीत याचे मोठे योगदान असणार हे सांगण्यासाठी जोतिष्याची नक्कीच गरज नाही. कुशाजी संताजी नाईक निंबाळकर यांचे वृध्दापकाळाने इ.स.१८०४ -५ दरम्यान निधन झाले. ते आणि त्यांची पत्नि मैनाबाई स्मृती प्रित्यर्थ वाठार येथे छत्र्या उभारलेल्या होत्या, त्या ह्याच असाव्यात असे वाटते.
तेथील समाधिंचे दर्शन घेऊन पुढे निघालो तर पाठीमागे दोनतीन काहीसे क्षतिग्रस्त वाडे आपले तत्कालीन वैभव सांभाळताना दिसले परंतु ऊन, वारा व पाऊस यांचाशी संघर्ष करताना हतबल असल्याचे दिसले. मुख्य वाड्याचे पाठीमागे देखणे पूर्वाभिमुखी श्री विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. याच मंदिराच्या पाठीमागे काही अंतरावर तत्कालीन कुशाजींच्या एका मुलाचा पूर्वाभिमुखी सहा भव्य बुरूजांचा देखणा वाडा असून निवासी वापर नसल्यामुळे परिसरात झाडे झुडुपे वाढली आहेत. मुख्य प्रवेशद्वाराचे बाजूचे दोन्ही बुरूज व यांच्या दरम्यान दुमजली असलेले प्रवेशद्वार मन मोहित करते.नाईक निंबाळकरांच्या कलासक्त जीवनशैलीचा परिचय करून देण्यास हे पुरेसे आहे.
कुशाजींनी जमिनी बागाइत होण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये प्रत्येक विहिरीसाठी खर्च करून साधारणतः साठ विहिरी निर्माण केल्या होत्या, त्यापैकी बहुतेक विहिरींवर एकाच वेळी ४ ते ६ मोटा चालायच्या. वाठारकर निंबाळकरांच्या पदरी हत्ती, उंट, पालख्या, मेणे व अनेक देखणे घोडे होते. सिबंदी स्वारासाठी घोडे व मोठी पागा होती. कुशाजींच्या नऊ मुलांचा संक्षिप्त इतिहास -
१) व्यकंटराव कुशाजी नाईक निंबाळकर
हे त्यांचे जेष्ठ पुत्र शिंदे सरकारच्या पदरी होते व त्यांची कर्तबगारी कुशाजींच्या हयातीतच सुरू झाली होती. महादजी शिंदे सरकार यांचे त्यांच्याशी अतिशय जवळच संबंध असल्यामुळे वाठारच्या जहागीरत आलेल्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच महत्त्वाची सहकार्य असायचे. व्यंकटराव शुर लढवय्ये असल्याने शिंदे सरकारच्या मोहिमेत अग्रणी असत. गहुदरच्या लढाईत लढताना त्यांना इ.स.१७८१ मधे वीरमरण आले. शिंदे सरकारच्या कामास व्यंकटराव कामी आल्याने महादजी शिंदे यांचा दत्तकपुत्र असलेल्या दौलतरावांनी त्यांचा मुलगा खंडेराव नाईक निंबाळकरांना भुसावळ हे वार्षिक दोन हजार रुपये उत्पन्न असलेले व खानदेशातील महालाची जहागीरी इ.स.१७९८ साली पहिल्यांदा दिली. कुशाजीचा नातू म्हणजे व्यंकटरावाचा जेष्ठ मुलगा खंडेराव यांच्या कालखंडात वाठार येथे नाणी पाडण्याची टंकसाळ होती ती बंद करण्याचा आदेश सरकारकडून इ.स.१८३० मधे आल्यामुळे टंकसाळ बंद करावी लागली.
२) धारराव कुशाजी - हे देखील शिंदे सरकारच्या पदरी मोठ्या हुध्द्यावर होते. ते इ.स.१८०१ मधे निधन पावले.
३) हैबतराव कुशाजी - हे देखील शिंदे सरकारच्या पदरी होते. काही काळ लष्करी पेशा करून ते नंतर वाठार येथे मोकादमी करीत होते. त्यांचा मृत्यू इ.स.१८०९ मधे वाठार मुक्कामी झाला.
४) आनंदराव कुशाजी - हे फार मोठे कर्तबगार पुरूष होते त्यामुळे निंबाळकर घराण्याचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. शिंदे सरकारच्या लष्करात सरंजामी सरदार होते. दौलतराव शिंदेंनी त्यांना नासिराबाद परगण्यातील मौजे नेरी व मुरारखेडी ही दोन्ही गावे इ.स.१८०९ मधे जहागीर म्हणून दिली होती. यांच्या कालखंडात नागपुर, भुसावळ, यावल, लष्कर, ग्वाल्हेर, पुणे, सातारा, ब-हाणपूर, इत्यादी ठिकाणी निंबाळकरांच्या हालचाली व घडामोडी होत होत्या. आनंदरावांच्या कारर्कीदीत सर्वात महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे फलटणकर व वाठारकर यांच्या विभक्तपणापासून 'नाईक' मानाची ही पदवी वाठारकर निंबाळकर यांची लोप झाली होती ती ह्या घराण्यातील पुरुषांच्या नावापुढे लावण्याची परवानगी पेशवे, शिंदे, होळकर, नागपूरकर व कोल्हापूरकर यांच्या दरबारातून मिळाली. म्हाकोजीराव, कुशाजीराव व व्यंकटराव यांच्या मृत्यूपर्यंत वाठारकर निंबाळकर घराण्यातील पुरुषांच्या नावापुढे 'मोकादम' 'देशमुख' व 'पाटील' हे किताब सरकारी कागदपत्रात लावले जायचे ते जाऊन 'नाईक' हा लावला जाऊ लागला. आनंदराव नाईक निंबाळकर इ.स.१८०७ मधील सोमवार श्रावण शु || १५ रोजी वाठार मुक्कामी निधन पावले.
५) चिकटोजीराव - हे देखील शिंदे सरकारच्या सेवेत होते. इ.स.१८०८ - ९ दरम्यान निधन पावले.
६) बापूजीराव - हे देखील शिंदे सरकारच्या पदरी काही काळ होते. हे कर्तबगार पुरुष होते. इ.स.१८१२ मधे वाठार येथे निधन पावले.
७) आपाजीराव, निळकंठराव व पिराजीराव देखील कर्तबगार पुरुष होते.
वाठार निंबाळकर गावातील वाडे व मंदिर परिसर पाहताना कुठेही मला एकहि वीरगळ आढळून आली नाही आणि ही बहुधा पहिलीच वेळ असावी. गेली वीस वर्षे झाली मी इतिसवाटा अनुभवत आहे पण कोणत्याही ऐतिहासिक स्थळी हा अनुभव आला नाही. कुशाजीराव नाईक निंबाळकरांचे वाडे पाहण्यात सुमारे दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. आता पुढे सालपे, कोपर्डे येथील सरदार शिंदे यांचे वाडे पाहावयास जायचे होते, त्याबद्दल पुढे नक्कीच लिहणार आहे. मी, शेळके,वाहन चालक भालेराव व मोकाशी चारचाकीत बसलो. एकदा मागे वळून वाड्यांडे पाहिले व आम्ही गावाच्या बाहेर पडलो. जेवणाची वेळ झाल्यामुळे नाईक निंबाळकर शेरीच्या अलिकडे रस्त्याच्याकडेला असलेल्या " अन्नपूर्णा हाॕटेल " नावाचा फलक पाहून थांबलो. हाॕटेलचे मालक श्री.धुमाळ यांनी आम्हाला गरमागरम व रुचकर जेवण वाढले. जेवणात पोळी, आमटी, सुकी गवार, वांग्याचे भरीत, वरण भात. सोबतीला हिरव्या मिरचीचा अस्सल गावरान झणझणीत ठेचा,काकडी व कांदा. अतिशय माफक दरात आणि रुचकर जेवण झाल्यावर आम्ही धुमाळ यांना धन्यवाद देऊन पुढील प्रवासाला निघालो.
संदर्भ -
१)वाठारकर निंबाळकर यांचे घराण्याचा इतिहास
लेखक - सरदार पांडुरंगराव नाईक निंबाळकर, ग्वाल्हेर
प्रकाशक - सरदार नीळकंठराव पांडुरंगराव नाईक निंबाळकर, संस्थान ग्वाल्हेर
पुरस्कार - दत्तो वामन पोतदार
इ.स.१९२८
पृष्ठसंख्या - ३०० मुल्य - १ रुपया ५० पैसे
२) पेशवेकालीन महाराष्ट्र
लेखक - वासुदेव कृष्ण भावे
प्रथमावृत्ती - डिसेंबर १९३५
किंमत - ३ रुपये
पृष्ठ संख्या - ५५८
- © सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])