दाट झाडीतले धाऊलवल्ली

राजापूर तालुक्यातले अगदी नेमके कोंदणात बसवलेले गाव आहे धाऊलवल्ली. दोन डोंगरांच्या मधे, नदीच्या बाजूने वसलेले अतिशय शांत असे हे गाव.

दाट झाडीतले धाऊलवल्ली

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

कोकणात वर्षभरात कधीही, कुठेही गेले तरी हिरव्या रंगामुळे आपले डोळे निवतात. त्यातून असे पावसाळ्याच्या मधेच गेल्यावर तर काय निसर्गाची अफाट उधळण अनुभवता येते. राजापूर तालुक्यातले अगदी नेमके कोंदणात बसवलेले गाव आहे धाऊलवल्ली. दोन डोंगरांच्या मधे, नदीच्या बाजूने वसलेले अतिशय शांत असे हे गाव. आंबे, माड, पोफळी आणि असंख्य फुलांनी सजलेले हे गाव. निवांत गाव आणि गावात वसलेली जुनी देवळे-रावळे. त्यातलंच एक प्राचीन शिवालय ‘विश्वेश्वर’ महादेव.

गावाच्या किंचित एका बाजूला असलेले हे शिवालय. इथे जायला फारच सुरेख अशी पाखाडी उतरून जावे लागते. या पाखाडीच्या आजूबाजूला उंचच उंच वृक्ष आहेत. पाखाडी नदीपर्यंत उतरते, पण मधेच देवळात जायला चिरेबंदी वाट आहे. विश्वेश्वराचे देऊळ फारच जुने. जवळजवळ २५० शे वर्षे होऊन गेलेली. आवार सगळा चिऱ्याच्या दगडांनी व्याप्त. देवळासमोर ५-६ दीपमाळा. त्याही खास कोकणातल्या, चिऱ्याच्या बनवलेल्या. इकडे काही कुटुंबे आपली एक दीपमाळ देवळात उभारतात. त्रिपुरी पौर्णिमेला त्या कुटुंबाकडून ती दीपमाळ दिवे लावून सजवली जाते. कोकणात याला ‘टिपर पाजळणे’ असं म्हणतात. दीपमालेच्या समोर आता जीर्णोद्धार झालेले देऊळ. आतून फरशा बसवलेल्या असल्या तरी सभामंडपाचे खांब अजूनही पूर्वीचेच. पण जीर्णोद्धारामुळे काहीसा चकचकीतपणा आलेला. आतल्या मंडपात देखणा नंदी. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला गणपतीचे सुंदर आणि जुने शिल्प आणि गाभाऱ्यात श्री विश्वेश्वर महादेवाची पिंड. सगळा आसमंत कमालीचा शांत. या जीर्णोद्धारातसुद्धा काही जुन्या कमानी, त्यावर असलेली गणेशपट्टी तशीच शाबूत असून ती इथेच व्यवस्थित ठेवलेली.

ह्या लाकडी खांबावर खालच्या एका बाजूला व्याल प्रतिमा कोरलेली आहे. व्याल म्हणजे एक काल्पनिक प्राणी. एका प्राण्याचे डोके आणि दुसऱ्या प्राण्याचे शरीर अशी ही रचना. इथल्या खांबावर मकरव्याल आहे. म्हणजे तोंड मगरीचे आणि उरलेले शरीर सिंहाचे. त्याच कमानीच्या दुसऱ्या खांबावर खाली गंडभेरुंड हा पण काल्पनिक पक्षी कोरलेला आहे. अतिशय दुर्मिळ अशी ही कलाकृती. ह्या पक्ष्याला एका धडाला दोन तोंडे असतात. इथे त्याच्या दोन तोंडात एकेक हत्ती दाखवला असून त्याने आपल्या पायात पण एकेक हत्ती धरलेला आहे. आपल्या सत्ता-सामर्थ्याचे प्रतिक म्हणून हा पक्षी दाखवतात. कर्नाटक राज्याचे हे राजचिन्ह आहे. ते त्यांच्या परिवहनच्या गाड्यांवरपण दिसते. खूप दुर्मिळ अशा या कलाकृती इथल्या लाकडी खांबांवर कोरलेल्या असून महत्त्वाचे म्हणजे जीर्णोद्धारातसुद्धा हे खांब जपून ठेवलेले आहेत. कमानीच्या मध्यभागी गणपती आणि त्याच्या बाजूला फुलांची नक्षी. कोकणातल्या अनेक मंदिरांतून ही लाकडावरची कलाकुसर बघायला मिळते. किंबहुना ही लाकडी कलाकुसर हे कोकणातल्या मंदिरांचे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.

विश्वेश्वराचे हे मंदिर शके १६६३ (सन १७४१) मध्ये गोखले, जोग व काळे या मानकऱ्यांनी बांधले. दाते, परांजपे, बापट, बोडस, वेलणकर, गोरे, काळे ही येथील घराणी. जोग यांनी येथे वासुदेवाचे देऊळ बांधले. गोखले-महाजनी हे होळी येथून या गावी आले. येथे सांबाचे देऊळ नाही असे पाहून त्यांनी देवाची स्थापना केली. याचे लिंग त्यांनी साळशी महालातून आणले. याची स्थापना होईपर्यंत हे गोखले ३ महिने निराहार उपोषण करीत बसले होते असे सांगतात. विश्वेश्वर मंदिरातील एका तुळईवर एक लेख कोरलेला आहे. “श्री शके १६५१ राक्षसनाम संवत्सरे फाल्गून शु. ८ इंदुवासरे तत्दीने देवालय श्री विश्वेश्वराचे कर्ता राजश्री पोमदेव महाजनी, प्रस्तुत जीर्णोद्धार प्रपौत्र महाजनी, नान महाजनी, अनंत महाजनी, विस महाजनी इ. शके १७६४ मधे देवळातील सभामंडप बांधण्याचे काम मोरो दामोदर गोखले यांनी केले.” असा हा लेख आहे. यावरून शके १६५१ (सन १७२९) मधे हे मंदिर बांधले असावे व त्यानंतर शके १७६२ (सन १८४२) मधे जीर्णोध्दार करून सभामंडप बांधला असे समजते. या गावाची वसाहत शके १३४३ (सन १४२१) च्या सुमारास गोखले घराण्याने केली. हे घराणे वेळणेश्वर येथून या भागात आले. असे सांगितले जाते. या गावात अजून येथे श्री असलादेवी, श्री नवलाई, श्री शिमरादेवी, श्री जाखादेवी अशी देवळे आहेत.

धाऊलवल्ली आणि देवाचे गोठणे यांच्या दरम्यान एक ओझरचा वहाळ आहे. त्या लगत धाऊलवल्लीचे हद्दीतील वाडीस मारवेल असे म्हणतात व गोठण्याचे हद्दीतील वाडीस करवलें म्हणतात. कोकणातल्या गावावर निसर्गाचा वरदहस्त असतोच, पण त्यासोबत अनेक दंतकथा, लोककथा इथल्या ठिकाणांशी निगडीत असतात. अशा कथा या स्थानांच्या सौंदर्यात अजून भर घालतात.

राजापूर वरून धाऊलवल्लीला जाताना आजूबाजूचे डोंगर, त्यावर काही ठिकाणी केलेल्या आंब्याच्या बागा, चिक्कार पाऊस पडून गेल्यामुळे हवेत आलेला ताजेपणा हे सगळे अनुभवता येते. अगदी निसर्गाच्या कोंदणात वसलेला हिरा असावा असे ही धाऊलवल्ली गाव आणि त्याचे स्थान. तितकेच रमणीय आणि तितकेच मौल्यवान. गावावर असलेला श्री विश्वेश्वराचा वरदहस्त, आणि निसर्गाची उधळण ही जागोजागी जाणवत रहाते.

- आशुतोष बापट