नारायणराव पेशव्यांची हत्या - इतिहासातील दुर्दैवी घटना

दादासाहेब यांच्या खोलीत गेल्यावर नारायणराव म्हणाले की गारद्यांनी वाड्यात मोठी धामधूम करून रक्तपात केला आहे म्हणून मी तुम्हापाशी आलो आहे कारण हा कट तुमचा आहे. तुम्ही गारद्यांना थांबवा. तुम्हाला राज्य करायचे असेल तर मला कैद करून खुशाल राज्य करा.

नारायणराव पेशव्यांची हत्या - इतिहासातील दुर्दैवी घटना

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

पेशवाईच्या इतिहासातील एक काळीकुट्ट घटना म्हणजे नारायणराव पेशवे यांची हत्या. इतिहासात ज्याचा उल्लेख काळ्या अक्षरांत लिहिला गेला अशा या घटनेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

नारायणराव पेशवे हे नानासाहेब पेशवे यांचे तृतीय पुत्र. नानासाहेब यांचे ज्येष्ठ पुत्र विश्वासराव हे पानिपतच्या लढाईत मृत्यू पावले त्यानंतर नानासाहेब शोक करून मृत्यू पावले. नानासाहेबानंतर त्यांचे द्वितीय पुत्र थोरले माधवराव पेशवे यांनी पंतप्रधानपदाची धुरा समर्थपणे पार पाडली मात्र त्यांचा अकाली मृत्यू झाल्यावर ही सूत्रे अल्पवयीन अशा नारायणराव यांच्याकडे आली. 

माधवराव पेशवे यांचे तेरावे झाल्यावर रघुनाथराव, सखाराम बापू, बजाबा पुरंदरे, नाना फडणीस, हरिपंत फडके असे सर्व कारभारी नारायणराव यांना घेऊन पेशवाईची वस्त्रे मिळवण्यास सातारा दरबारात गेली व महाराजांकडून नारायणराव यांना पेशवाईची वस्त्रे मिळवून दिली. यावेळी नारायणराव हे लहान असल्याने ते कायम आपल्या सल्ल्याने वागतील अशी अपेक्षा रघुनाथराव यांची होती मात्र त्यांची अवस्था माधवराव यांच्या काळात होती तशीच राहिली यामुळे ते नाराज झाले.

रघुनाथराव यांचे नानासाहेब हे थोरले बंधू व त्यांच्या निधनानंतर ज्येष्ठतेनुसार रघुनाथराव हे स्वतःस पेशवाईचे हक्कदार मनात होते मात्र पेशवाई मिळाली माधवरावांना. माधवराव यांच्यानंतर तरी आपणास संधी मिळेल असे त्यांना वाटले मात्र यावेळीही अल्पवयीन अशा नारायणरावांना पेशवाई मिळाली. यामुळे अटकेपार झेंडा लावणारे रघुनाथराव नाराज झाले नसते तर नवलच होते.

नारायणराव यांच्या कारकिर्दीतही आपली उपेक्षा होत आहे असे वाटून राघोबादादांनी कडक उपोषण सुरु केले हे पाहून नारायणरावांनी त्यांची भेट घेतली व आपण राग सोडून राज्यकारभारात लक्ष घालावे, आपण एकचित्त होऊन राज्य चालवू अशी विनंती केली मात्र रघुनाथरावांना स्वतःकडे सर्व सूत्रे हवी होती. अशातच एक दिवस नारायणराव आपली मातोश्री गोपिकाबाई यांना गंगापुरास भेटायला गेले तेव्हा रघुनाथरावांनी नारायणराव यांच्याविरोधात बंड उभारले. ही गोष्ट नारायणरावांना कळल्यावर त्यांनी त्वरित पुण्यात येऊन बंडाचा मोड करवून घेतला व फितुरांना कैदेत टाकले.

यानंतरही नारायणराव यांनी रघुनाथराव यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला मात्र रघुनाथराव आपला हट्ट सोडावयास तयार नव्हते. शेवटी नारायणरावांच्या विश्वासातील कारभाऱ्यांनी रघुनाथराव यांच्या पक्षातील मंडळी कारभारातून दूर केली व रघुनाथराव यांच्यावरील नजरकैद आणखी कडक केली यामुळे रघुनाथरावांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले.

असे सहा महिने सरले. नारायणराव हेच आपल्या मार्गातील प्रमुख दावेदार आहेत त्यामुळे त्यांना बाजूला हटवले तरच आपल्याला पेशवेपद मिळू शकते अशी पक्की खात्री रघुनाथराव यांची झाली होती त्यामुळे दादासाहेब यांनी कैदेतूनच आपल्या लोकांमार्फत गारदी लोकांसोबत संगनमत केले व नऊ लाख रुपये गारद्यांना देऊ असा निरोप पाठवला यामध्ये त्यांचा विचार असा होता की नारायणरावांना कैदेत टाकावे. रघुनाथराव यांच्या या कारस्थानांत अनेक जण समाविष्ट होते मात्र गारद्यांना जे कैदेचे पत्र द्यायचे होते त्यातील मजकूर आनंदीबाई यांनी बदलला व नारायणरावांना धरावे असे जे लिहायचे होते त्या ऐवजी नारायणरावांना मारावे असा बदल त्यात केला.

पुढे पुण्यात श्रावण मासाचा व गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडला. नारायणरावांनी कुलाब्याचे रघुजीराजे आंग्रे यांना खास निमंत्रण पाठवले होते. रघुजी आंग्रे यांची भेट घेऊन नारायणराव पर्वती येथे दर्शनास गेले असता त्यांना आपल्याविरोधात सुरु असलेल्या कटाची कुणकुण लागली. ही बातमी त्यांनी हरिपंत यांच्या कानावर घातली आणि म्हणाले हा जो कट सुरू आहे तो खरा आहे का? आणि खरा असेल तर आम्हाला एवढ्या उशिरा का समजले? त्यावेळी हरिपंत म्हणाले की जेवून आल्यावर यावर चर्चा करू. जेवण सुरु असताना सुद्धा या विषयावर चर्चा झाली मात्र शनिवारवाड्यात इतका बंदोबस्त असताना हा कट यशस्वी होणार नाही या विश्वासात नारायणराव असल्याने ते विडा खाऊन झोपावयास गेले. 

यावेळी रघुनाथराव यांचे समर्थक तुळाजी पवार यांनी गारद्यांची भेट घेतली व सांगितले की हा कट पेशव्यांच्या कानावर गेला आहे तेव्हा फारसा उशीर न करता काम उरकून घ्या नाहीतर सर्व बेत फसेल. पाहता पाहता दोन हजार हत्यारबंद  गारदी जमा झाले व शनिवारवाड्यात कापाकापी करून प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वारातून गारदी थेट वाड्याच्या तटावर गेले तेथे इच्छाराम पंत ढेरे हे समोर आले. गारद्यांना पाहून त्यांनी हा काय प्रकार चालला आहे असे विचारले मात्र गारद्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला.  इच्छाराम पंत पळत पळत गोशाळेत गेले जेणेकरून गाईच्या मागे लपल्यास गोहत्येचे पातक म्हणून तरी आपणास मारणार नाहीत असे त्यांना वाटले मात्र गारद्यांनी गाईसहित इच्छाराम पंत यांना ठार मारले.

बेफाम रक्तपात करीत गारदी दिवाणखान्यात शिरले हे पाहून तिथे असलेल्या आबाजीपंत याने कवाडे लावण्याचा प्रयत्न केला मात्र गारद्यांनी त्यास सुद्धा ठार मारले. पाहता पाहता शनिवारवाड्यावरील हल्ल्याची बातमी पुण्यात पसरली व लोक बिथरले व पळापळ होऊ लागली. शहरातील सर्व दुकाने व घरे बंद झाली.

नारायणरावांना सुद्धा शनिवारवाड्यावर हल्ला झाल्याची बातमी समजली व हे कारस्थान रघुनाथराव यांचे आहे हे माहित असल्याने ते थेट रघुनाथराव यांना भेटावयास निघाले यावेळी सोबत चापाजी टिळेकर व नारोबा फाटक हे दोघे होते. दादासाहेब यांच्या खोलीत गेल्यावर नारायणराव म्हणाले की गारद्यांनी वाड्यात मोठी धामधूम करून रक्तपात केला आहे म्हणून मी तुम्हापाशी आलो आहे कारण हा कट तुमचा आहे. तुम्ही गारद्यांना थांबवा. तुम्हाला राज्य करायचे असेल तर मला कैद करून खुशाल राज्य करा. 

नारायणराव व दादासाहेब यांच्या भेटीची खबर गारद्यांना लागली व ते आणखी बिथरले. दादासाहेबांनी नारायणराव यांचे ऐकले तर आपली खैर नाही हे समजून गारदी थेट रघुनाथराव यांच्या खोलीत शिरले. हे पाहून नारायणराव यांनी रघुनाथरावांच्या कमरेस मिठी मारली. यावेळी खरगसिंग गारदी, सुमेरसिंग गारदी व महंमद इसब हे तीन गारदी तलवार उपसून पुढे आले. यावेळी चापाजी टिळेकर गारद्यांना म्हणाला की अरे हा लहान लेकरू, यास मारू नका! एवढे म्हणून चापाजी नारायणराव यांच्या अंगावर पडले. गारद्यांनी पहिला वार चापाजी यांच्यावर करून त्यांचे दोन तुकडे केले हे पाहून नारोबा फाटक नारायणराव यांच्या अंगावर पडला तेव्हा गारद्यांनी त्याचे डोके उडवले.

आपल्या जीवावर आलेला हा भयानक प्रसंग पाहून अवघ्या १८ वर्षांच्या नारायणरावांनी शुद्ध हरपली हे पाहूनही गारद्यांना दया आली नाही व त्यांनी नारायणरावांच्या सर्वांगावर सपासप वार केले, यामुळे नारायणरावांचा कोथळा फुटून बाहेर आला. 

पाहता पाहता गारद्यांच्या हल्ल्याची बातमी शहरात पसरली व आपाजीराव पाटणकर, खंडोजी जगताप, आनंदराव रास्ते, गणपतराव, त्रिंबकराव, अप्पा बळवंत, गोविंदराव गायकवाड, भवानराव प्रतिनिधी, मालोजी घोरपडे, मोरोबा फडणवीस, हरिपंत फडके, आनंदराव जिवाजी, राघोजी आंग्रे, नाना फडणीस, बाळाजीपंत दामले, पानसे असे सर्व सरदार वाड्याच्या बाहेर जमून गारद्यांवर हल्ला करण्याची तयारी करू लागले.

यावेळी बापूंनी सर्वांची समजूत काढली की खुद्द पेशवे व त्यांचे कुटुंबीय वाड्यात फसले आहेत त्यामुळे आपण जरी गारद्यांना मारू शकणार असलो तरी गारद्यांनी आतील लोकांच्या जीवाचे काही बरे वाईट केले तर काय करणार? वाड्यातील बातमी बाहेर समजणे कठीण जात होते. 

वाड्यात गारद्यांनी लुटालुट माजवली, ही लुटालूट चालू असताना रघुनाथराव गारद्यांच्या सोबत सदरेवर आले व विडा घेऊन सदरेवर विराजमान झाले. यावेळी नारोजी नाईक हे रघुनाथरावांची निर्भत्सना करताना म्हणाले की, चांगले केले, पेशव्यांच्या वंशात येऊन मोठी कीर्ती मिळवलीत, काय लौकिक केलात. हे ऐकून संतप्त झालेल्या रघुनाथरावांनी गारद्यांना इशारा केला व गारद्यांची तलवार नारोजी नाईक यांच्या शिरावर कोसळली.

यानंतर रघुनाथराव यांनी चोपदारास हा निरोप देऊन बाहेर पाठवले की बाहेर जी मंडळी चावडीवर जमा झाली आहेत त्यापैकी मालोजी घोरपडे व बजाबा पुरंदरे या दोघांना वाड्यात घेऊन ये. चोपदार बाहेर आला व त्याने हा निरोप सांगितलं तेव्हा इतर मंडळी म्हणाली की तुम्ही दोघे आत जाऊन काय प्रकार घडला आहे तो पाहून येणे. 

मालोजी घोरपडे व बजाबा पुरंदरे वाड्यात आले व रघुनाथराव यांना भेटले तेव्हा रघुनाथरावांनी नारायणरावांच्या हत्याकांडाची माहिती त्यांना दिली त्यावेळी मालोजी घोरपडे हे सुद्धा रघुनाथराव यांच्यावर संतप्त झाले मात्र 'घडून गेलेल्या गोष्टी पुन्हा दुरुस्त करता येत नाहीत' असे रघुनाथरावांनी त्यांना सांगून शहरात माझ्या नावाची द्वाही फिरवून बंदोबस्त करण्यास सांगितले.

मालोजी व बजाबा यांनी बाहेर येऊन वाड्यात घडलेल्या दुर्घटनेबद्दल सर्वांना सांगितले तेव्हा सर्वच स्तब्ध झाले. यानंतर भवानराव प्रतिनिधी आत जाऊन रघुनाथराव यांना भेटले व रागाने म्हणाले 'तुम्ही मोठा लौकिक केला, गारदी म्हणजे हिशेब काय? इतके गारद्यांस मी एकटा पुरून उरेन! असो गारद्यांच्या हिशेब आम्ही ठेवत नाही' हे ऐकताच सर्व गारदी चपापले. यानंतर भवानराव यांनी बाहेर येऊन सर्व माहिती बाहेरील मंडळींना सांगितली, राज्याच्या पंतप्रधानांचे हे निर्घृण पद्धतीने झालेले हत्याकांड सर्वांनाच धक्का देणारे होते त्यामुळे सर्वांचीच अवसाने गाळून पडली होती त्यामुळे सर्व मंडळी, फौज व मानकरी यांनी तात्पुरती माघार घेतली.

या प्रकाराने शनिवारवाडा नारायणराव पेशवे, इच्छाराम पंत ढेरे, आबाजीपंत, नारोबा फाटक, चापाजी टिळेकर, नारोजी नाईक व इतर अनेक लोकांच्या रक्ताने माखला गेला, गारद्यांनी यावेळी मुक्या गाईंना सुद्धा सोडले नव्हते. वाड्यात मोठी रडारड झाली. पार्वतीबाई, सगुणाबाई आणि गंगाबाई यांनी मोठा आकांत केला. 

कालांतराने जरी रघुनाथराव यांच्या हाती पेशवाईची वस्त्रे आली असली तरी नारायणरावांच्या हत्येचे पातक त्यांच्या शिरावर असल्याने त्यांचे पेशवेपद औटघटकेचे ठरले व पेशवाईचा दुर्दैवी शेवट रघुनाथराव यांचे पुत्र बाजीराव दुसरे यांच्या कारकिर्दीत झाला.