मराठ्यांचा लाहोरवर विजय

मराठ्यांना फक्त आपल्या दहशतीनेच लाहोरचा विजय प्राप्त झाला व मानाजी पायगुडे यांनी २० एप्रिल १७६८ साली लाहोरच्या किल्ल्यात मराठ्यांच्या विजयाचे निशाण फडकावले.

मराठ्यांचा लाहोरवर विजय

1757 साली अहमदशाह अब्दाली याने लाहोर येथील मोगल अंमलदार आदिनाबेग याला तेथून काढून पंजाबच्या बंदोबस्तास तैमूरशहा व जहानखान यांना तेथे रुजू केले. आदिनाबेग हा मुळात स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हता त्यामुळे त्याने अब्दालीची लाहोर येथून पाठ वळताच शिखांसोबत युती करून लाहोर येथे तैमूरशहावर हल्ले सुरु केले.

ही बातमी अब्दाली यास समजताच त्याने आदिनाबेग व शिखांवर अफगाण सैन्य पाठवले. अब्दाली च्या सैन्यातील सरदार खोजे उमेदखान हा २३ हजार अफगाण सैन्य घेऊन लाहोरला गेला मात्र आदिनाबेग आणि शिखांनी अब्दालीच्या सैन्याचा दारुण पराभव केला आणि त्वरित दिल्लीत असलेल्या रघुनाथराव पेशवे यांच्याकडून मराठ्यांच्या सहकार्याची मागणी केली.

मराठ्यांनी मदत केल्यास चालीच्या प्रत्येक दिवसाचे दररोज एक लाख आणि बैठ्या मुक्कामाचे ५० हजार कबूल केले. दिल्लीत राहून रघुनाथराव आणि दिल्लीतील राज्यकर्ते पंजाबमधील घडामोडींवर लक्ष ठेवून होते. शीख व आदिनाबेग हे अब्दालीच्या सैन्याचा चांगला प्रतिकार करीत आहेत हे पाहून त्यांना मदत करायला हवी या उद्देशाने रघुनाथराव यांनी दिल्लीहून लाहोरकडे प्रयाण केले.

वाटेत आदिनाबेग याचा जावई ख्वाजा मिर्झा हा आपल्या मोगल सेनेसहित मराठ्यांना येऊन मिळाला. येथून मराठा सरदार मानाजी पायगुडे व आदिनाबेग लाहोरवर चाल करून गेले. लाहोरवर मराठ्यांचे आगमन झाले आहे याची बातमी तैमूरशहा आणि जहानखान यांना समजली व त्यांची पाचावर धारण बसली. मराठ्यांशी युद्ध कारण्याऐवजी त्यांनी थेट पलायनाचा विचार केला आणि मौल्यवान सामान आणि ऐवज घेऊन त्यांनी लाहोरमधून पळ काढला.

मराठ्यांना फक्त आपल्या दहशतीनेच लाहोरचा विजय प्राप्त झाला व मानाजी पायगुडे यांनी २० एप्रिल १७६८ साली लाहोरच्या किल्ल्यात मराठ्यांच्या विजयाचे निशाण फडकावले. अब्दालीचे सैन्य लाहोर सोडून पळाले असले तरी मराठ्यांनी त्यांचा पाठलाग सुरु केला, मानाजी पायगुडे यांनी अफगाण सैन्याचा फडशा पाडण्याचे मनात आणून त्यांचा पाठलाग सुरु केला, यावेळी मानाजी पायगुडे यांच्यासहित गंगाधर बाजी भिवराव, गोपाळराव गणेश हे सरदार होते. यावेळी अफगाण सैन्याने चिनाब ही नदी गाठली. नदीवर वजिराबाद नावाचे एक ठाणे होते व या ठिकाणी मराठ्यांचे सैन्य आपल्या मागावर आलेले पाहून अफगाण सैन्याने आपले सर्व सामान तेथे टाकून आपला जीव वाचवण्यासाठी चिनाब नदी ओलांडली व तेथून पुढे अटक मार्गे काबुलकडे पळाले.

मराठ्यांना वजिराबाद येथे पुष्कळ लूट प्राप्त झाली. मराठ्यांच्या मनात चिनाबच्या पलीकडे जाऊन अब्दालीच्या सैन्याचा फडशा पाडण्याचे बेत होते मात्र अफगाण हे होड्यांचा वापर करून नदीच्या पलीकडे गेले होते व त्यावेळी मराठ्यांकडे होड्या तयार नव्हत्या व चिनाब ही नदी खोल व तिचे पाणी प्रचंड थंड असल्याने पोहून जाणे अशक्य होते याशिवाय मराठ्यांनी या ठिकाणी तोफखाना आणला नव्हता त्यामुळे तोफखाना नसताना नदीच्या पलीकडे जाऊन युद्ध करणे शक्य नसल्याने त्यांनी नदी पार करण्याचा विचार सोडून दिला.

यानंतर रघुनाथराव हे लाहोरला आले व किल्ल्याचा ताबा घेतला. लाहोर शहराच्या बाहेर शालिमार नावाच्या बागेत बादशहाचा एक वाडा होता तेथे रघुनाथरावांचा मुक्काम झाला व मानाजी पायगुडे व मराठा सैन्याने मिळवलेल्या लाहोर विजयाच्या सत्कारार्थ आदिनाबेगने एक लाख रुपये खर्च करून तेथे मोठा दिव्यांचा उत्सव साजरा केला.

अशा प्रकारे रघुनाथराव यांच्या नेतृत्वाखाली वीर मानाजी पायगुडे व मराठा सैन्याने थेट लाहोर शहर जिंकून चिनाब नदीपर्यंत धडक मारली. चिनाब नदीने आडवले नसते तर कदाचित त्याच वेळी मराठे अटकपर्यंत पोहोचले असते मात्र कालांतराने मराठ्यांच्या विजयाचा ध्वज अटकेपार सुद्धा लागला. भारत या देशाची मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली 'अहद तंजावर तहद पेशावर' ही व्याख्या मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने सार्थ करून दाखवली.