रामसेज किल्ला - प्रेरणेचे प्रतीक

१६६४ साली शहाबुद्दीन खान या मोगल सरदाराने रामसेज या किल्ल्यास वेढा घातला होता मात्र तो वेढा फसला होता मात्र शहाबुद्दीन खानास किल्ल्याची माहिती असल्याने औरंगजेबाने १६८२ च्या एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा रामसेजला वेढा घालण्यास पाठवले.

रामसेज किल्ला - प्रेरणेचे प्रतीक

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात रामसेज (रामशेज) नावाचा एक दुर्ग आहे. रामसेज हा किल्ला समुद्रसपाटीपासून ३२७३ फूट उंच असला तरी पायथ्यापासून हा फार उंच किल्ला नाही व त्याचा आकार सुद्धा लहान असून हा किल्ला सपाट मैदानी प्रदेशात असलेल्या एका डोंगरावर आहे.

या किल्ल्याचे नाव रामसेज पडण्यामागचे कारण म्हणजे रामायण काळात प्रभू रामचंद्र यांनी या किल्ल्यावर काही काळ विश्राम केला होता त्यामुळे रामाची सेज अर्थात रामाचा बिछाना असा रामसेज या शब्दाचा अर्थ आहे. पायथ्याहून किल्ल्याकडे नजर टाकल्यास किल्ल्याचा माथा हा एका बिछान्यासारखाच दिसतो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब दक्षिणेत उतरला व त्याने दक्षिणेतील विविध राज्यांवर मोहिमा सुरु केल्या. स्वराज्यावरही त्याने मोहिमेस सुरुवात केली होती मात्र शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज हे सह्याद्रीच्या अभेद्य भिंतीसारखे स्वराज्याचे रक्षण करण्यास सज्ज होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब थोडा निश्चिन्त झाला असताना शिवपुत्र संभाजी महाराजांनी मोगल साम्राज्यास मोठे आव्हान निर्माण केले. संभाजी महाराजांनी थेट औरंगजेबाचा पुत्र शाहजादा अकबर यास फितूर केल्याने औरंगजेब अत्यंत संतप्त झाला व त्याने सर्व शक्ती केंद्रित केली व स्वतः दक्षिणेच्या मोहिमेवर निघाला.

सुरुवातीस मुघलांनी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर हल्ले सुरु केले. १६८० मध्ये औरंगजेबाने खान जहान बहादूर कोकताश यास सुभेदार बनवून त्यास दक्षिणेस रवाना केले. 

१६६४ साली शहाबुद्दीन खान या मोगल सरदाराने रामसेज या किल्ल्यास वेढा घातला होता मात्र तो वेढा फसला होता मात्र शहाबुद्दीन खानास किल्ल्याची माहिती असल्याने औरंगजेबाने १६८२ च्या एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा रामसेजला वेढा घालण्यास पाठवले.

रामसेज किल्ल्याकडे जाणारी जी वाट आहे तिला चोरवाट म्हणतात व किल्ल्याच्या तटाच्या आत दारुगोळ्याची ३ कोठारे आहेत. शहाबुद्दीन खानाने किल्ल्यास वेढा घातला तेव्हा त्याने सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे व दमदमे तयार करून वर चढवणे असे अनेक प्रयत्न करून पहिले मात्र रामसेजच्या हुशार, अनुभवी व कसलेल्या किल्लेदाराने मोगलांचे प्रयत्न हाणून पाडले. 

यावेळी किल्ल्यात लोखंडी तोफा नव्हता मात्र कातडे बरेच होते. मराठ्यांनी युक्ती करून चक्क लाकडी तोफा तयार केल्या व या तोफांमध्ये कातडे भरून त्या उडवल्या व या तोफांनी पोलादी तोफांपेक्षाही मुगल सैन्याची हानी केली.

शहाबुद्दीन खानाकडून काम होत नाही हे जाणून बादशाहने त्याला परत बोलवले व खानजहान बहाद्दूर कोकलताश यास किल्ल्यावर पाठवले. कोकलताशाने पुढील प्रमाणे बेत केला की किल्ल्याच्या एका बाजूला मोगल सैन्य हल्ला करणार असा पुकारा करायचा व तोफा, दारुगोळा, माणसे, सैन्य, बाजारबुणगे यांनी त्या भागात जाऊन गोंधळ उडवून द्यावा त्यामुळे किल्ल्यातील सर्व शक्ती त्या भागात केंद्रित होईल. 

याचवेळी किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला एक योग्य जागा शोधून किल्ले चढण्यात पटाईत अशा २०० लोकांनी अंधाराचा फायदा घेऊन गुपचूप वर जायचे आणि मराठ्यांवर हल्ला करायचा. 

मात्र खानजहान बहाद्दूर कोकलताश याचा हा बेत आधीच रामसेजच्या किल्लेदारापर्यंत पोहोचला असावा कारण त्यांनी अशी युक्ती केली की, जेव्हा मोगल बाजारबुणगे आणून गोंधळ करतील तेव्हा आपणही त्या बाजूस सैन्य आणून नगारे, नौबती, कर्णे या वाद्यांचा घोष करावा आणि मोगलांवर दगड व तेलाने माखलेले कपडे पेटवून टाकायचे. आणि ज्या ठिकाणाहून खानाची माणसे वर येणार आहेत तिथे काही निवडक व शस्त्र सज्ज अशा सैनिकांनी दबा धरून बसायचे. 

खानाने ठरल्याप्रमाणे सुरुवातीस दोन माणसे वर पाठवली, किल्ल्यावर मराठे दबा धरून बसले होते. त्या दोन मोगलांची डोकी दिसताच सैनिकांनी त्यांच्या डोक्यावर शस्त्राने असे वार केले की दोघांचेही डोळेच बाहेर आले व दोघेही किल्ल्यावरून खाली फेकले गेले त्यामुळे त्यांच्या मागे जी माणसे होती ती सुद्धा सोबत खाली कोसळली.

यानंतर कोकताश याचा मोतदार त्यास म्हणाला की आपण तंत्र मंत्राचा प्रयोग करून भुतांच्या साहाय्याने किल्ला जिंकू. मला तुम्ही १०० तोळे वजनाचा साप तयार करून द्या आणि हल्ल्याच्या वेळी मला आघाडीवर ठेवा, मी भुतांच्या मदतीने कोणत्याही अडचणीशिवाय किल्ल्याच्या दरवाज्यात तुम्हाला पोहोचवून देईन. खांजहाँ बहादूरने त्याच्या म्हणण्याप्रमाणे साप तयार करून दिला व हल्ला सुरु झाला तेव्हा मोतदार पुढे होता. अर्ध्या वाटेत असतानाच किल्ल्यावरून गोफणाचा एक गोळा त्याच्या छाताडावर आदळला आणि मोतदाराच्या हातून तो नाग हवेत उडाला व मोतदार खाली कोसळला.

अशा प्रकारे खानजहान बहादूर सुद्धा किल्ला घेण्यात अपयशी ठरला. पुढे या कामावर कासीमखान किरमाणी याची नेमणूक झाली. मात्र त्यालाही या कामात यश आले नाही शेवटी बादशहाने रामसेज च्या वेढ्याचे काम थांबवले. अशा रीतीने १६८२ च्या एप्रिलमध्ये रामसेजला पडलेला मोगलांचा वेढा १६८४ सालच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत रामसेजच्या अज्ञात शूर किल्लेदारामुळे व पराक्रमी मराठ्यांमुळे रेंगाळला. छत्रपती संभाजी महाराज सुद्धा रामसेज वर लक्ष ठेवून होते व तेथील सैन्याच्या मदतीस महाराज मराठ्यांच्या सैन्याच्या तुकड्या वेळोवेळी धाडत होते.

१६८४ सालच्या डिसेंबर महिन्यात मोगल सरदार इखलास खान बहादूर याने रामसेजवर पुन्हा हल्ला केला, यावेळी मोगल व मराठा सैन्यात तुंबळ युद्ध झाले. मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली मात्र या युद्धात स्वराज्याचे २०० सैन्य मारले गेले. यानंतर संभाजी महाराजांनी रामसेजच्या किल्लेदारास दुसऱ्या किल्ल्याची जबाबदारी दिली व रामसेज येथे नवा किल्लेदार नेमला.

रामसेजच्या नव्या किल्लेदारानेही पुढील २-३ वर्षे मोगलांना बिलकुल दाद दिली नाही मात्र कालांतराने मुल्हेरचा किल्लेदार नेकनाम खान याने रामसेजच्या नव्या किल्लेदारास अब्दुल करीम या जमीनदारामार्फत वश केले व त्याने संभाजी महाराजांच्या शूर सैन्याने तब्बल ५ वर्षे झुंजवत ठेवलेला रामसेज हा किल्ला फितुरी करून मोगलांच्या ताब्यात दिला.

रामसेज हा किल्ला काही फारसा दुर्गम किल्ला नव्हता व तो डोंगराळ भागात नसून सपाट मैदानात होता व किल्ल्याचा आकारही फार मोठा नव्हता अशा वेळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी केवळ आपल्या पराक्रमाने व हुशारीने हा किल्ला तब्बल ५ वर्षे मोगलांना जिंकू दिला नाही. रामसेज किल्ल्याच्या पहिल्या शूर किल्लेदाराच्या नावाबद्दल इतिहासाने मौन बाळगले आहे मात्र त्याने दाखवलेला पराक्रम इतिहास कधीही विसरू शकणार नाही.