रामा राघोबा राणे - परमवीर चक्र मिळवणारे पहिले मराठी

परमवीर चक्र मिळवणारे पहिले मराठी मानकरी म्हणून सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांचे नाव अभिमानाने घेतले जाते.

रामा राघोबा राणे - परमवीर चक्र मिळवणारे पहिले मराठी

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

रामा राघोबा राणे यांचा जन्म कारवार जिल्ह्यातील चानिआ या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. गावी सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या बॉम्बे इंजिनियर ग्रुप मध्ये शिपाई म्हणून भरती झाले. 

दुसऱ्या महायुद्धात रामा राघोबा राणे यांनी आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली ज्यामुळे त्यांना नाईक, हवालदार, जमादार अशा बढत्या मिळत गेल्या. दुसरे महायुद्ध संपल्यावर त्यांना कमिशन देण्यात आले व त्यांची अधिकारी पदी वर्णी लागली.

भारतास स्वातंत्र्य मिळाल्यास थोडेच दिवस लोटले होते, अचानक पाकिस्तानने पठाण टोळीवाल्यांच्या साहाय्याने काश्मीरवर आक्रमण केले. श्रीनगर या राजधानीच्या शहराच्या चोहो दिशांनी आक्रमकांच्या फौजा येऊ लागल्या त्यामुळे काश्मीरच्या राजाने आपले संस्थान भारतात विलीन करून भारत सरकारची मदत मागितली.

यानंतर भारताने विमानांद्वारे सैनिकांच्या तुकड्या काश्मीर येथे धाडल्या व शत्रूला सीमेवर अडवून ठेवले, काही दिवसांनी सैनिकांच्या आणखी तुकड्या काश्मीर येथे दाखल झाल्याने भारतीय लष्कराने पाकिस्तानी फौजा व टोळीवाले यांच्यावर घाव घालण्यास सुरुवात केली.

प्रतिहल्ला करताना भारतीय फौजा नौशेरा ते राजोरी अशी आगेकूच करीत होत्या. भारत व पाकिस्तान सीमेवरील हा प्रदेश अतिशय डोंगराळ असून संपूर्ण मार्ग हा घाटांतून जाणारा होता. या घाटाच्या पलीकडे उघड्या मैदानात असलेल्या पाकिस्तानी व टोळीवाल्यांच्या फौजांपर्यंत पोहोचून रणगाड्यांच्या साहाय्याने त्यांचा निःपात करण्याचा विचार भारतीय अधिकाऱ्यांनी केला.

भारतीय सैन्य जर घाट ओलांडून अलीकडे आले तर त्यांच्या रणगाड्यांसमोर आपली धडगत लागणार नाही त्यामुळे काही करून त्यांचा येथे येण्याच्या मार्ग कठीण करून टाकावा असा विचार पाकिस्तानने केला आणि त्यांनी या मार्गात अनेक ठिकाणी सुरुंग पेरले व झाडे तोडून ती मार्गात टाकली तसेच उतारांवर उखळी तोफा आणि मशीनगन्स लावल्या. 

या अडथळ्यांमुळे भारतीय रणगाड्यांना मार्ग ओलांडणे कठीण झाले त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर अडथळविरहित करणे गरजेचे होते. रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी मग बॉंबे इंजिनिअर ग्रुपच्या पथकाकडे सोपवण्यात आली आणि या पथकाचे नेतुत्व हे सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांच्याकडे होते.

रामा राघोबा राणे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक मग रणगाड्यांच्या पुढे जाऊन रस्त्यामधील अडथळे काढण्याचे अतिशय कठीण असे कार्य करू लागले. मागे असलेल्या रणगाड्यांमधील पहिल्याच रणगाड्यात आणखी एक मराठी अधिकारी मेजर जठार होते. राणे यांच्या पथकाने काम सुरु केल्याचे समाजताच पाकिस्तानी फौजांनी रस्त्यावर उखळी तोफांचा मारा सुरु केला. 

एका बाजूला रस्त्यात लावलेले घातक सुरुंग काढणे व दुसऱ्या बाजूस शत्रूच्या उखळी तोफा व मशीनगन्सचा सामना करणे अशा प्रसंगात संपूर्ण पथक सापडले होते. सुरुंग काढताना त्याचाही स्फोट होण्याची भीती ही होतीच.

अशावेळी सुरुंग निकामी व्हावेच मात्र कुठलीही प्राणहानी न करता या साठी उपाययोजना करणे आवश्यक होते. खरं तर १९४७ सालापूर्वी भारत व पाकिस्तान हे दोन देश वेगळे नव्हतेच, होता तो केवळ भारतच. त्यामुळे यावेळी सुद्धा भारत व पाकिस्तान दोघेही वापरत असलेले युद्ध साहित्य हे एकाच बनावटीचे होते त्यामुळे राम राघोबा राणे यांनी पाकिस्तानी सुरुंगांच्या खुब्या लवकरच जाणून घेतल्या. 

सुरुंग काढण्याचे काम सावकाश व सावधगिरीने करावे लागते त्यामुळे ते काम करता यावे यासाठी काही सैनिकांना त्यांनी घाटाच्या उतारावरून समोरील शत्रूच्या गोळीबारास प्रत्युत्तर देऊन सुरुंग निकामी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या साठी तैनात केले.

यावेळी शत्रूच्या फौजांनी सुरुंग निकामी करण्याच्या कामात अडथळा येण्यासाठी चारही बाजुंनी गोळ्या व उखळी तोफांचा मारा सुरु केला मात्र या हल्ल्याने विचलित न होता राणे एक एक सुरुंग शांतपणे निकामी करत पुढे पुढे जात होते व त्यांच्या मागोमाग भारतीय रणगाडे मार्गक्रमण करीत होते. हळू हळू राणे यांनी मार्गातील सर्व भूसुरुंग निकामी केले व यानंतर मार्गात शत्रूने टाकलेली झाडे काढणे हे काम बाकी होते.

राणे व त्यांच्या जवानांनी या झाडांना दोर आणि साखळदंड बांधून ती बाजूस हटवली आणि काही अजस्त्र झाडांना स्फोटके बांधून ती उडवून दिली. राणे यांचे मार्ग मोकळा करण्याचे कार्य सुरु असताना त्यांच्या मागे असलेले जठार आपल्या रणगाड्यातून दूरवर टपून बसलेल्या शत्रूवर तोफांचा मारा करीत होते. 

बघता बघता राणे व त्यांच्या टीमने मार्ग मोकळा केला आणि मागे असलेल्या जठार यांना इशारा केला त्याचबरोबर जठार व त्यांच्या नेतृत्वाखाली असलेले रणगाड्यांचे पथक व सैनिकांची तुकडी अतिशय वेगाने पुढे चाल करून गेल्या आणि पाहता पाहता आपल्या पराक्रमाने चिंगासचे अतिशय महत्वाचे ठाणे काबीज केले त्यामुळे पाकिस्तानी व पठाणी फौजा माघार घेऊ लागल्या व भारताचा विजय सुकर झाला.