निमगावची ऐतिहासिक गढी
भिमानदीच्या निळ्याभोर पाण्याच्या प्रवाहाला खेटूनच ही निमगावची ऐतिहासिक गढी आहे.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
कोरोना संसर्ग प्रमाण कमी झाल्याने व नुकतीच या आजारावर लस आल्याच्या वृत्ताने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. दि.१६ जानेवारी २०२१ ला सकाळी ८ वाजता मी पुण्याहून (कात्रज) येथून चाकणला निवासी असणारे आमचे लेखक मित्र श्री.मनोहर मोहरे यांच्याकडे निघालो. भेटीचे नियोजन व इतर चर्चा अगोदरच झाली होती. कात्रज मधेच एका दिवसाचा ७० रुपयेचा बसचा पास घेतला. सकाळी ९ वा.भोसरी येथे पोहोचलो तर राजगुरुनगरला जाणारी बस त्वरित मिळाली. आंबेठाण चौकात ९:४५ ला पोहोचलो. मग मोहरे सरांना मी तेथे उतरल्याचे चलभाषवरून कळविले व ते लगेचच दुचाकी घेऊन आले. मग आमचा दुचाकीचा प्रवास सुरू झाला. भिमानदी पार करून निमगाव येथे पोहोचलो. राजगुरुनगर पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावाचे प्रवेशद्वारासमोर असलेल्या उपहारगृहात गरमा गरम चहा घेतला व प्रवासाचा काहीसा आलेला थकवा घालविला. मग गावातील ऐतिहासिक गढी/ वाडा पाहण्यास निघालो. पूर्वीच्याकाळी संपूर्ण गावाला तटबंदी असावी हे पुरातन गाव प्रवेशद्वाराहून निश्चित होते. शिरुर, राजगुरुनगर या तालुक्यातील बहुतेक गावांना तटबंदी असल्याचे अवशेष आजही दिसून येतात. निमगाव हे सर्वदूर परिचित आहे ते येथे असलेल्या श्री खंडोबा देवस्थानासाठी पण ही ऐतिहासिक गढी सामान्यजनांपर्यत पोहोचली नाही किंवा काय? हा प्रश्नच आहे.
भिमानदीच्या निळ्याभोर पाण्याच्या प्रवाहाला खेटूनच ही ऐतिहासिक वास्तू आहे. नदीच्या तीरावर दुतर्फा विविध वृक्षांची मांदयाळी असून हिरवाईने नटलेल्या भागातील घडिव दगडी बांधकामातील वाड्याची तटबंदी पाहताच मनाला अतिशय आनंद होतो. राजगुरुनगर हा तालुका प्रामुख्याने अनेक ऐतिहासिक वाडे व प्राचीन मंदिरांसाठी ओळखला जातो. वाफगांवचा होळकर भुईकोट, श्रीमंत सरदार दमाजी गायकवाड वाडा दावडी, चंद्रचूड वाडा कन्हेरसर व निमगाव इत्यादी महत्त्वाची ठिकाणे या तालुक्यात येतात तर ब्रिटिशांच्या विरूध्द आपले बलिदान देणारे भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यापैकी राजगुरु हे तालुक्याच्या गावचे मूळ निवासी. भक्कम तटबंदी, चारही बाजूस असलेले बुरूज व उत्तराभिमुख तीस फूट उंचीच्या भव्य मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे राहिल्यावर नकळत मन इतिहासात जाते. छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून सुराज्य निर्माण केले ते सर्वसामान्य मावळ्यांच्या व सह्याद्रीच्या सहकार्याने. 'औत धरणारे, राऊत झाले' हे छत्रपतींच्या प्रेरणेमुळे हा गौरवशाली इतिहास आहे. छत्रपतींच्यानंतर स्वराज्याचे एका साम्राज्यात रूपांतर करण्यात अठराव्या शतकात मराठी माणसाने दिलेले योगदान इतिहास पुरूषाने पाहिले आहे. अठरावे शतक हे अनेक घराण्याच्या पराक्रमांचे, शौर्याचे व कर्तृत्वाचे आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात सुभेदार मल्हारराव होळकरांचे कर्तृत्व बहरास आले. याच दरम्यानच्या काळात कन्हेरसर व निमगाव येथील चंद्रचूड हे घराणे नावलौकिक मिळवून होते. सुभेदारांच्या उर्जित काळात यशवंतराव चंद्रचूड यांचे बाजी व गंगाधर हे पुत्र स्वकर्तृत्वाने प्रसिद्धीस आले होते. गंगाधर यांनी सुभेदार होळकर यांच्याकडून फडणिशी मिळविली होती. ह्या गंगाधररावांनी हा निमगावाचा वाडा बांधला असावा मात्र निश्चितपणे कोणत्या वर्षी बांधला हे ज्ञात होत नाही.( गंगाधर चंद्रचूड यांच्या ऐतिहासिक आढावा कन्हेरसर वाड्याच्या भेटी वेळी घेऊ)
वाड्याच्या प्रवेशद्वारावर अणकुचीदार गजखिळे असून एक दिंडी दरवाजा देखील आहे. हे पाहताना पुण्यातील शनिवारवाडा किंवा सासवडचा पुरंदरेवाडा पाहत असल्याचा संभ्रम होतो. दरवाजाच्या बरोबर वर अतिशय रेखीव नगारखाना आहे. दिंडी दरवाजातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूस असलेल्या रेखीव देवड्या आहेत, तर उजव्या बाजूच्या ढेलजातून नगारखान्यात जाण्याचा जिना असावा. निसर्ग बहरतो तो मानवी वर्दळ नसलेल्या शांत, निवांत ठिकाणी आणि येथे हेच झाले आहे. सुमारे पाचसहा एकर क्षेत्रफळ असलेला हा आयताकृति वाडा नैसर्गिक वृक्षाच्या सहवासाने भरून गेला आहे, त्यामुळे आतील भागातील अवशेष दिसून येत नाहीत. मग पुन्हा बाहेर यायचे मुख्य दरवाजाच्या बाहेरील डाव्या बाजूस पूर्वाभिमुखी प्राचीन दोन शिवपिंडी असणारे हेमाडपंति मंदिरात भक्तीभावाने दर्शन घ्यायचे. वाड्याची तटबंदी व बुरूज पाहताना तत्कालीन स्थपति यांनी किती अप्रतिम शैलीत बांधकाम केले आहे याची जाणीव होते कारण दोन घडीव दगडांच्या सांध्यात गवताची काडी देखील जाणार नाही इतके एकरूप केले आहेत. सुमारे तीनशे वर्षाचा कालखंडानंतर तटबंदीत कुठेही वड - पिंपळ किंवा लहान गवत वाढले नाही मात्र पश्चिमेकडील दक्षिणोत्तर तटबंदी क्षतिग्रस्त झालेली आहे. पूर्वेकडील तटबंदीत पूर्वाभिमुख लहान दिंडी दरवाजा व दक्षिणेकडील पूर्वपश्चिमेस तटबंदी मध्यम आकाराचे परसदिंडी दरवाजा आहे. या दरवाजातून भिमानदी पात्रापर्यंत दगडी पायऱ्या होत्या. वाड्याच्या चारही कोपऱ्यात असलेल्या बुरूजातून तटबंदीच्या तटावर जाण्यासाठी अतंर्गत दगडी जिने आहेत. याच जिन्यातून वर जाताना आत प्रकाश यावा व बाहेरील बाजूला लक्ष देता यावे यासाठी लहान सुरेख दगडी गवाक्ष असलेले दिसून येतात.वाडा व भिमानदी प्रवाहाच्या दरम्यान असलेल्या भूभागावर श्री विष्णू मंदिर व श्री गरूड मंदिर हे अप्रतिम स्थापत्यशैलीचा नमुना असलेली मंदिरे आहेत. स्थानिक नागरिकांशी संवाद साधल्यावर या वाड्यात सूर्यमहल व चंद्रमहल अशा दोन नक्षीदार वास्तू होत्या ही माहिती मिळते तर चंद्रचूड वाड्याची सद्यस्थितित मालकी अन्य व्यक्तीकडे असल्याचे समजते. महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू व इतिहास पुरूष काहीसे उपेक्षितच असल्याची भावना घेऊन मी व मोहरे सर श्रीमंत सरदार दमाजी गायकवाड यांची गढी असलेल्या दावडीकडे निघालो. आता लवकरच भेटू ऐतिहासिक दावडी गडी मधे!
- सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])