वैराटगड किल्ला
पुणे सातारा हमरस्त्याने भुईंज - पाचवड या गावापासून जाताना उजव्या बाजूला असलेला वैराटगड नेहमीच प्रवाशांचे लक्ष वेधून घेत असतो.
हमरस्त्याने त्याची दिसणारी भव्य उंची पाहून काहीशी मनात शंका येते की, आपल्याला गडमाथा गाठणे शक्य होईल का ? दि.२६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ७:३० भोर मधून आमचे नेहमीचेच भटकंती करणारे मित्र आनंद गोसावी, कैलासराव जाधव, सुरेशराव कंक व मी हे चारचाकीने निघालो.
भोर - शिरवळ - खंडाळा या मार्गाने पाचवड येथे पोहोचलो. तेथे चहा घेऊन पाचवड - वाई मार्गाने प्रवास करीत व्याजवाडी या गावी पोहोचलो. याच गावापासून जवळच असलेल्या घेरेवाडी येथे साधारणतः सकाळचे ८:३० वाजता पोहोचलो. तेथूनच वैराटगडची चढण सुरू होते. घेरेवाडीतील शेवटच्या घराच्या समोर एक चारचाकी उभी होती. तिच्या पाठीमागील काचेवर राणादा हे नाव लिहलेले होते. तेथे त्या नावाबाबत विचारणा केल्यावर एका भगिनीने आपल्या तीन वर्षे वयाच्या मुलाला बोलावले व सांगितले, 'हाच राणादा, ह्याचे पाळण्यातील नाव राजवीर असून आम्ही सर्वजण राणादा या नावाने संबोधत असतो. चिमुकला राणादा नवीन लोकांना पाहून आईकडे गेला. अशा एका चिमुकल्या गोड हस-या मुलाचा निरोप घेऊन गडवाटेला लागलो.
वाईच्या नैऋत्येस फक्त १० कि.मी.अंतरावरील ३३४० फूट उंचीच्या किल्ल्याच्या गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी मानसिक व शारीरिक क्षमतेची कसोटी नक्कीच लागते. खडी चढण, तीही अतिशय निसरडी अशी आहे. सुमारे दोन तासांचा अवधी लागातो. वाटेत कैलासरावांचा गडमाथ्यावर पोहचण्याचा संघर्ष पाहून आपलीही चढण चढण्याची क्षमता आपोआपच वाढते. ही वाट किल्ल्याच्या उत्तरेची असून सुमारे मध्यावर गेल्यावर पूर्वेकडे जाते. दमछाक करीत आपण काळ्या कातळाची नैसर्गिक तटबंदींतील पश्चिमाभिमुख दरवाजाच्या पायऱ्यात पोहोचतो.समोर दोन्ही बाजूस असलेल्या बुरूजांचे अवशेष दिसतात, तर डाव्या हातास थोड्या उतारावरील लक्ष्मीमाता मंदिराचे लोखंडी छत लक्ष वेधून घेतात. नकळत आपण तिचे दर्शनासाठी पोहोचतो तर जाताना उजव्या बुरूजाच्या बरोबर खाली खडकात असलेली पुरातन लहान गुहा दिसून येते. मग मुख्य व एकमेव असलेल्या दरवाजाच्या खडकात खोदलेल्या वळणावळणाच्या पायऱ्या चढून वर येतो. दरवाजाची कमान व दोन्हीही दगडी स्तंभ काळाच्या ओघात नष्ट झाल्याचे पाहून मन दुखावते, मात्र दरवाजाचा दगडी उंबरठा पाहून थोडे हायसे वाटते. उंबरठ्याच्या डाव्याबाजूस अडगळ खोचण्याची दगडातील खाच पाहून तत्कालीन व्यवस्थेची जाणीव होते. शेजारीच दोन्हीबाजूस असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या देवड्या अर्धवट अवस्थेत आहेत.
गडमाथ्यावर सर्वात प्रथम दर्शन होते ते मारुतीरायाच्या लहान मंदिराचे. मंदिर लहान असून त्यात दगडी प्रभावळीत मारुतीची प्रसन्न मूर्ती आहे, तर शेजारीच अलीकडील काळातील छत्रपति शिवाजी महाराजांचा बैठा पुतळा आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस देखील उघड्या जागेवर मारुती शिल्प असल्याचे पाहून मनात गोंधळ होतो. शक्तिदेवता मारूती दर्शनाने काहीशी उर्जा अंगात संचारते. किल्ला साधारणतः पूर्व - पश्चिम असा असून कमी क्षेत्रफळ असलेला आहे. मग पश्चिमेस असलेल्या बुरूजाकडे / माचीकडे आपण जातो. तटबंदीची पडझड झाली असली तरी तरी शत्रूच्या सैन्यावर मारा करता यावा यासाठी जागोजागी असलेल्या तटबंदीतील जंग्या पाहत आपण पश्चिम बुरूजाजवळ पोहोचतो. बुरूजावरून समोरील डोंगर व परिसर पाहण्यात एक वेगळाच आनंद येतो. हा किल्ला प्रतापगडपासून आलेल्या शंभूमहादेव डोंगररांगेवर असल्याने ह्या डोंगररांगेतील उर्वरित हिरवाईने सजलेल्या लांबच लांब डोंगर मनाला आनंद देतात. त्यानंतर पलिकडील बाजूची तटबंदी पाहत असताना बुरूजाजवळच्या तटबंदीत असलेला चोरवाट पाहाताना मनात धडकीच भरते. सह्याद्रीच्या विशालरूपातीला ही तटबंदीतील चोरवाट म्हणजे एक दिव्यच आहे. सुमारे दोनशे फूट तीव्र उतार व अरुंद बोळ असणारी चोरवाटेचा वापर करणारे मावळे म्हणजे चमत्कार आहे. वाई येथील निवासी व पुणे येथे दंतमहाविद्यालयात शिक्षण घेणारे डाॕ.सचिन सांवत हे एकटेच वाईहून वैराटगड पाहणेसाठी आले होते. घेरेवाडीतून येणाऱ्या मळलेल्या पाऊलवाटेने अर्धा किल्ला चढून आल्यावर डावीकडे जाणाऱ्या वाटेने येण्या ऐवजी उजव्या वाटेने आले. परिणामी ते पश्चिमेकडील माचीच्या जवळ असलेल्या चोरवाट ठिकाणी पोहोचले. त्यांनी त्या अवघड अशा वाटेने किल्ल्यावर येण्यास सुरूवात करून बरेच वरपर्यंत येण्यात यशस्वी झाले पण शेवटच्या टप्प्यात शक्य होत नव्हते. त्याचवेळी आम्ही तेथे असल्याने आनंद गोसावी, कैलासराव जाधव व सुरेशराव कंक यांनी सामुहिक युक्ती व शक्तीने त्यांना गडमाथ्यावर येण्यास मदत केली. अशक्य असणाऱ्या टप्प्यावर आमच्या सहका-यांनी धाडसी मेहनत करून वर घेतल्यावर डाॕ.सावंत यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. चोरवाटेचा तो थरार आमच्या व सावंतांच्या कायमच स्मरणात राहिल. चोहोबाजूने काळ्या कातळाची नैसर्गिक तटबंदी या किल्ल्यास लाभल्याने वरील भागात थोडे बांधकाम करून किल्ला सुरक्षित केल्याचे प्रामुख्याने आढळून येते. तेथून पूर्वेकडे येताना वेताळ स्थापित केल्याचे आढळून येते, तर त्याच्या शेजारीच पुरातन बांधकामाचे त्यातल्या त्यात बरे अवशेष दिसून येतात. येथे मोठा वाडा असावा असे वाटते. पुढे पूर्वेस तटबंदी पाहत येताना तटबंदीतील दोन शौचकुप असल्याचे आढळून येते. सातारा जिल्हा हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणारा जिल्हा असल्याने तटबंदीच्या लादणीतील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेली सोय अप्रतिम अशी आहे. गडमाथ्यावर अनेक इमारती असल्याचे तुरळक अवशेष आहेत. चारपाच मोठी पाण्याची तळी असून त्यातील दोनतीन मधे पाणी असते, मात्र ते पिण्यास अयोग्य आहे. पूर्वेकडील माचीवर पूर्वाभिमुखी वैराटेश्वर शंभूमहादेवाचे मंदिर असून नंतरच्या काळात मंदिरासमोर भव्य लोखंडी पत्र्याचा आधुनिक सभामंडप उभारलेला आहे. मंदिरात वैराटेश्वराची पिंडी असून शाळुंकेवर पितळी नागदेवता विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना दगडी चौकटीवर असलेल्या गणपति शिल्पाला वंदन केले जाते. समोरील बाजूस नंदी शिल्प तर बाजूला तुळशी वृंदावन आहे. याच मंदिराच्या उजव्या बाजूस भिंतीला टेकवून ठेवलेली भव्य वीरगळ आहे. १९८३ साली ही वीरगळ, मारुतीच्या दोन मूर्त्या ह्या या किल्ल्यावर मिळाल्या आहेत. ह्या मंदिराजवळच भैरवनाथाचे लहान मंदिर असून तेथे एक सतीशिळा देखील आहे. किल्ल्यावर विद्युत पुरवठा केला आहे. दर महाशिवरात्रीस परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजर असतात. वैराटेश्वर मंदिराच्या प्रारंगणात आम्ही जेवणाचे डबे सोडून एकत्र भोजनाचा आनंद घेतला. पोटपुजा झाल्यावर काही वेळ निवांत घालविला. संपूर्ण किल्ला पाहण्यास एक तासाचा अवधी पुरेसा आहे. गडमाथ्यावरुन आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. पूर्वेला असलेला चंदन वंदन, नांदगिरी तर वायव्येला कमळगड, केंजळगड, पांडवगड हे किल्ले दिसतात. तसेच जरंडेश्वर डोंगर, मांढरदेव डोंगर, मेरुलिंग डोंगरासह कृष्णा नदीचे खोरे, कण्हेर खोरे, पसरणीचा घाट यांचे विहंगम दृश्य सुखावते.
कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील दुसरा राजा भोज यांनी ११७८ ते ११९३ दरम्यानच्या कालखंडात निर्माण केलेल्या पंधरा किल्ल्यापैकी हा एक आहे. मात्र परिसरात एक दंतकथा सांगितली जाते ती अशी की, महाभारतातील राजा विराट राजाची वैराटगड ही राजधानी होती. ऐतिहासिक कालखंडात या किल्ल्यावर फार मोठा सैनिकी संघर्ष झाल्याच्या नोंदी आढळून येत नाहीत. ११ नोव्हेंबर १६७३ रोजी सातारा जिंकल्यावर छत्रपति शिवाजी महाराजांनी वाईच्या परिसरातील पांडवगड, कमळगड, केंजळगड इत्यादी किल्ले जिंकून घेतले यात नक्कीच वैराटगड असावा कारण चिटणीस व चित्रगुप्त बखरी मधे विराटगड नावाचा उल्लेख येतो. छत्रपति संभाजी महाराजांच्या हयातीत हा किल्ला स्वराज्यात होता. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ मोगल वरचड झाल्याने हा किल्ला त्याने जिंकला होता, मात्र १६९० मधे रामचंद्रपंत अमात्य व सचिव शंकराजी नारायण गांडेकर यांनी वाई प्रांतातील किल्ले परत स्वराज्यात घेतले होते त्यात वैराटगडचा देखील समावेश असावा. सातारा किल्ल्यास औरंगजेब सैन्याने वेढा दिला होता तेव्हा स्वतः औरंगजेब करंजे ह्या गावी होता. मुघल दरबारातील ९ डिसेंबर १६९९ च्या नोंदीनुसार हमीदुद्दीन बहादूर यांच्या सैन्याने सलग दोन दिवस मराठ्याच्या ताब्यातील या किल्ल्यावर लढाई करून जिंकून घेतला व त्याच्या चाव्या औरंगजेबाकडे पाठवून दिल्या. त्याने वैराटगडचे सर्जागड असे नामकरण केले तर किल्ल्यावरील संपत्तीची मोजदाद करण्यास सांगून १३ डिसेंबर १६९९ रोजी किल्लेदार म्हणून मुहम्मद इब्राहिम यास नियुक्त केले. मुहम्मद इब्राहिम हा वाईचा ठाणेदार असलेल्या नाहरखानचा मुलगा होता. किल्लेदार म्हणून नेमणूक केल्यावर औरंगजेबाने त्याची मनसब वाढविली व त्याच्या सोबत १५० सैनिक, २ बाजदार, २ पानके व २ गोलंदाज दिले.
पुढे ९ जुलै १७०४ च्या नोंदीनुसार मराठ्यांनी वैराटगडच्या किल्लेदारास कैद करून किल्ला ताब्यात घेतला तेव्हा औरंगजेबाने कराडच्या ठाणेदारासोबत म्हसवडचा ठाणेदार नागोजी माने, बुधपाचगावचा ठाणेदार पदाजी घाटगे व खटावचा ठाणेदार कृष्णराव यांना किल्ला घेण्यास पाठविले मात्र तो त्यांनी जिंकला की नाही हे माहित होत नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर वैराटगडचा सरनोबत दादजी फाटक हा नाईकजी फाटकचा दुसरा मुलगा होता. पेशवे माधवराव यांच्या काळात खंडोजी जाधवराव हा वैराटगडचा किल्लेदार होता. पेशवाईत कुडाळ प्रांताचा सर्व कारभार याच किल्ल्यावरून पाहिला जायचा. तत्कालीन पत्र व्यवहारात " अज दिवाण किले वैराटगड ...." अशी पत्राची सुरूवात केली जायची.खंडोजी जाधवराव हे सुमारे तीस वर्षापेक्षा जास्त काळ ह्या किल्ल्याचे किल्लेदार होते ही ऐतिहासिक काळातील एकमेव घटना असावी. १८१८ मधे हा किल्ला इतर किल्ल्याप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात गेला. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या वैराटगडला घेरेवाडी येथून पुन्हा एकदा वंदन करुन दुपारी अडीच वाजता भोरला सहका-यासोबत निघालो. वाटेतील प्रवासात वैराटगडचे गाडीतून दर्शन घेतले.
- सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])