घोणे काष्ठशिल्प संग्रहालय कोलाड

लाकडाच्या ओंडक्यांपासून निर्माण केलेली व अतिशय सजीव वाटावीत अशी काष्ठशिल्प निर्माण करणारे कलाकार म्हणून श्री. रमेश घोणे हे प्रख्यात आहेत. कल्पकता व जिद्द असेल तर माणूस काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून घोणे काष्ठशिल्प संग्रहालयाकडे पाहता येईल.

घोणे काष्ठशिल्प संग्रहालय कोलाड

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

महाराष्ट्र ही कलावंतांची भूमी आहे. या भूमीत विविध क्षेत्रात कीर्ती मिळवलेले अनेक कलाकार आहेत. असेच एक कलाकार म्हणजे रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील रमेश घोणे. लाकडाच्या ओंडक्यांपासून निर्माण केलेली व अतिशय सजीव वाटावीत अशी काष्ठशिल्प निर्माण करणारे कलाकार म्हणून रमेश घोणे हे प्रख्यात आहेत.

रमेश घोणे यांना खरं तर इंजिनिअर व्हायचे होते पण परिस्थितीमुळे त्यांना ते जमले नाही मात्र ते कुढत बसले नाहीत. आपणास काय करता येऊ शकते याचा त्यांनी शोध घेतला. निर्जीव लाकडामध्ये आपण सजीवता निर्माण करू शकतो याची जाणीव त्यांना झाली आणि या लाकडांतच त्यांना आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजला.

काष्ठशिल्पांचे एक कायमस्वरूपी संग्रहालयच त्यांनी कोलाड येथे भरवण्याचा निश्चय केला. पुण्याच्या राजा केळकर संग्रहालयापासून त्यांनी संग्रहालयाची प्रेरणा घेतली. आज या संग्रहालयात शेकडो प्रकारची काष्ठशिल्पे आहेत. सिंह, वाघ, हरीण यांच्यासारखे प्राणी आहेत. चिमणी ते गरुड व कावळा ते घार असे विविध प्रकारचे पक्षी आहेत.

लाकडी दिवे, भांडी, मशाली एवढेच नव्हे तर शिवाजी महाराज, ख्रिस्त, देवता यांचे हुबेहूब मुखवटे आहेत. नऊवारी साडीतील स्त्रीपासून आधुनिक नारीची विविध रूपे काष्ठशिल्पांच्या माध्यमातून येथे त्यांनी साकारलेली आहेत.

पाच ते साडेपाच फुटी उंचीच्या ओंडक्यास आकार देऊन आणि त्याला वडाच्या पारंब्या गुंडाळून रूढी परंपरेच्या बंधनात अडकलेली भारतीय स्त्री आणि दशमुखी रावण ही या संग्रहालयातील वैशिट्यपूर्ण शिल्पे आहेत. साग, किंजळ, धामण, आंबा, हैद, शिवन अशा २८ प्रकारच्या लाकडांचा उपयोग करून ही काष्ठशिल्पे अतिशय परिश्रमपूर्वक तयार करण्यात आली आहेत.

५० हजार रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंतची काष्ठशिल्पे घोणे यांच्या संग्रहालयात विक्रीसाठी सुद्धा ठेवण्यात आली आहेत. काष्ठशिल्पांचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यास केंद्रांची स्थापना करणे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये संग्रहालयाची नोंद व्हावी या दृष्टीने संग्रहालयाचा विस्तार करणे आणि काष्ठशिल्प निर्मिती व निसर्ग संवर्धन या क्षेत्रात संग्रहालयाची नोंद जगातील प्रमुख संग्रहालयांत व्हावी यासाठी रमेश घोणे यांचे प्रयत्न चालू आहेत.

कल्पकता व जिद्द असेल तर माणूस काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून घोणे काष्ठशिल्प संग्रहालयाकडे पाहता येईल. नॅचरल हिस्टरी म्युझियम च्या धर्तीवरील या निसर्गशिल्प प्रदर्शनाची ख्याती जगभर पसरली असून भारतातून व जगभरातील अनेक देशांतून अनेक पर्यटक संग्रहालयास भेट देत असतात.

घोणे काष्ठशिल्प संग्रहालय मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड येथे आहे. रायगड जिल्ह्यास भेट देणाऱ्या पर्यटकांनी घोणे यांचे हे काष्ठशिल्प संग्रहालय आवर्जून पाहावे.  कारण रमेश घोणे यांनी गेली ३०-३५ वर्षे प्रचंड मेहनत घेऊन निर्जीव लाकडांपासून निर्माण केलेली काष्ठशिल्पे वाचून कळणार नाहीत तर पाहूनच त्यांच्या सौंदर्याचा खऱ्या अर्थी अनुभव घेता येईल.