पेण - गणपती बाप्पांचे गाव

गणपती म्हटले की पेण व पेण म्हटले की गणपती हे कधीही न बदलणारे समिकरण झाले आहे. गणपती मुर्त्यांच्या व्यावसायाचे माहेरघर असलेले रायगड जिल्हातील पेण शहरात या व्यावसायात दरवर्षी करोडोंची उलाढाल होते व ७०% टक्क्यांहून अधिक कुटूंबांनी गणेश मुर्त्यांची निर्मिती हा व्यावसाय कायमस्वरुपी स्विकारला आहे. तर अशा या पेण शहराची महती काही नवीन असून कोकणातील एक प्रसिद्ध व्यापारी पेठ म्हणुन हे गाव प्राचिन काळापासून प्रख्यात आहे.

पेण - गणपती बाप्पांचे गाव
पेण

भोगावती नदीच्या तिरावरील हे शहर पुरातन काळापासून अरबी समुद्र व कोकणमार्गे देशावर जाणार्‍या प्रमुख मार्गावरील व्यापारी उलाढालीचे शहर म्हणुन ज्ञात होते. कोकणातील मुंबई, चौल, वसई, ठाणे, सोपारा ही प्रमुख बंदरे सोड्ली तर दुसर्‍या फळीतल्या प्रमुख बंदरांमध्ये पेणचा समावेश होत असे, या परिसरातले अंतोरे या स्थळासही प्राचिन व्यापारी इतिहास असून पुर्वी येथे ४० टनापर्यंत जहाजे येत असत. 

पेण या नावामागेही इतिहास आहे, पेण हे पेणे या शब्दाचा अपभ्रंश आहे, 'पेणे' या शब्दाचा अर्थ व्यापारी मार्गावरील विश्रांतीचे स्थळ. प्राचिन काळी आजच्यासारखी वेगाने धावणारी वाहने नव्हती तेव्हा व्यापार तथा दळणवळण हे पायी, घोडे, गाढव, उंट इत्यादी प्राण्यांचा वापर करुनच होत असे व अशा प्रवासाला अनेक दिवस लागत असत, अशावेळी रात्र झाली की डेरा टाकण्याची काही स्थळे कोकणात होती त्यातले प्रमुख स्थळ म्हणजे पेण. असे डेरे टाकताना प्राथमिक गरजा तसेच अन्न व पाणी यांची सोय प्रामुख्याने पाहिली जात असे व पेण या गावात या सर्वच सुवीधा अस्तित्वात असल्यामुळे पेण ला या प्रवाशांची पसंती होती. पेण येथे प्रामुख्याने मिठ, तांदुळ, भाज्या इत्यादींची प्रामुख्याने उलाढाल होत असे कारण पेणच्या पश्चिम भागास लागून असलेले खारेपाट हे मिठ व तांदुळ यांचे कोठार मानले जाते.

पेण शहरासही जुना असा वैभवशाली इतिहास आहे, मौर्य, सातवाहन, त्रैकुटक, राष्ट्रकुट, शिलाहार, यादव, मराठे, मुघल, आदिलशहा, निजामशहा, ब्रिटीश अशा अनेक सत्तांनी पेणवर राज्य केले. पेणजवळील हमरापुर हे पुर्वी हेरंबपुर या नावाने प्रसिद्ध असून चालुक्य काळात येथे एक स्थानिक सत्ता अस्तित्वात होती असे म्हटले जाते तसेच पेणजवळी सांक्षी हा किल्ला मध्ययुगिन सरदार राणा संक याच्या अखत्यारित असल्याने किल्ल्यास सांक्षी हे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. मुघलकाळात शास्ताखानाने पेणवर मोहीम काढून हा परिसर ताब्यात घेतला होता व सैन्याची तुकडी ठेवली होती. पेण कल्याण सुभ्यात असताना शिवाजि महाराजांनि कल्याणचा खजिना पेण येथील गागोदे खिंडीत लुटला होता. सदाशिवराव पेशवे यांच्या पत्नी पेणच्या कोल्हटकरांपैकी होत्या.

पेण शहर हे प्राचिन काळापासून सर्वसंपन्न असल्याने येथे पहावयास मिळणारी ग्रामव्यवस्था प्राचिन आहे, कालांतराने पेण शहराचा प्रचंड विकास झाला असला तरी जुने पेण आजही या प्राचिन खाणाखुणा जपुन आहे. येथील डोंगर्‍या, आळ्या, तळि, भव्य वाडे व मंदीरे ही प्राचिन ग्रामव्यवस्थेची मॉडेलच आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. गावात अनेक जाती व धर्माचे लोक आजही गुण्यागोविंदाने रहातात. लोकमान्य टिळकांनी पेणला कोकणचे पुणे संबोधून गौरवोद्गार काढले होते. पेण शहराच्या मध्यवर्ती भागात प्राचिन मंदीरे आहेत यापैकी हेमाडपंथी धाटणीचे रामेश्वर हे शिवमंदीर पेणकरांचे ग्रामदैवत आहे, रामेश्वराव्यतिरिक्त येथे महाकाली, मारुती, गोमटेश्वर, राम, विश्वेश्वर, गणपती, गोटेश्वर इत्यादी अनेक जुनी मंदीरे आहेत. येथील त्वष्टा कांसार समाजाच्या महाकालि मंदीराच्या प्रांगणात असेलेले बापुजींचे एकसंध पाषाणातले शिल्प हे सहाव्या शतकातले असल्याचे इतिहासतज्ञ दत्तो वामन पोतदार यांनी म्हटले आहे, या शिल्पावरील मकर शिल्पे अतिशय रेखीव असून सध्या गणपती उत्सवात वापरात आणली जाणारी मखर ही संकल्पना अशाच मखरशिल्पावरुन घेतली असावी असे जाणवते. कासारआळीस लागुन असलेल्या या मंदीराकडून पुर्वेस गेले म्हणजे काही पायर्‍या उतरुन कासार तळे लागते, सध्याचे कासारतळे हे या पायर्‍यांपासून दुर दिसत असले तरी पुर्वी या पायर्‍या कासारतळ्याची हद्द होती मात्र पेण शहाराच्या लोकसंख्येत वाढ झाल्यावर कासार तळ्याची व्याप्ती कमी झालि असावी, असे असले तरी आजही हे भलेमोठे कासारतळे पेणकरांचे वैभव आहे, या तळ्याचा जिर्णोद्धार निजामशाही दिवाण मलिकअंबर याने केल्याचे संदर्भ आहेत.

पेण शहर येथील गणपतीसोबतच स्वादिष्ठ पोहे, पोह्यांचे पापड, मिरगुंड, कंदी पेढे इत्यादींकरिताही प्रसिद्ध असून या मालास जगभरातून मागणि आहे, गणपती सोबत या पदार्थांची निर्मिती करणारे अनेक गृहोद्योग पेण शहरात कार्यरत आहेत. पेंण शहरात गणेश मुर्ती निर्मिती देवधर यांनी सुरु केली, हा कारखाना कासार आळीस लागून असल्याने येथे असलेले कलाकार हे प्रामुख्याने त्वष्टा कासार व कुंभार समाजाचे नागरिक होते कालांतराने हा व्यवसाय वाढू लागल्यावर या समाजातल्या नागरिकांनी आधुनिकीकरणामुळे रसातळास गेलेले पारंपारिक उद्योग कमी करुन गणपतीच्या व्यावसायात शिरकाव केला व कालांतराने कुंभार आळी व कासार आळी गणपती उद्योगधंद्याचे माहेरघर झाल्या, यानंतर काही वर्षांतच या व्यवसायाची उलाढाल प्रचंड प्रमाणात वाढली व देशभरातून तथा राज्यभरातून गणेशमुर्तींना प्रचंड मागणी येऊ लागली व अशा रितीने पेण शहराच्या सर्व भागात हा व्यावसाय सुरु झाला, सध्या या व्यवसायाची उलाढाल वर्षभर चालत असून फक्त पेणच नव्हे तर पेणच्या परिसरातील हमरापुर, जोहे सारख्या गावांमध्येही गणेशमुर्त्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती चालू असते, गणपतीच्या दिवसातही पेण येथील गणेश मुर्तीकार आपल्या व्यावसायात गर्क असल्याने साखर चौथीस गणेशउत्सव फार उत्साहात साजरा करतात, कारण खर्‍या अर्थाने गणपती हा पेणकरांना पावला असल्याची श्रद्धा पेणकरांना आहे.

पेण शहराव्यतिरिक्त पेण परिसरही अतिशय निसर्गरम्य असून पाटणेश्वर, व्याघ्रेश्वर, महालमिर्‍या, सांक्षी इत्यादी पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहेत, पेण हे मुंबई गोवा महामार्गावरील तथा कोकण रेल्वेवरील प्रमुख स्थानक असल्याने शहराची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कोकणात जाणार्‍या किंवा कोकणातून मुंबईस येणार्‍या अथवा अलिबाग मार्गे पुण्यास जाणार्‍या सर्वच बसेस पेण येथे थांबत असल्याने पेणला भेट देणे सोपे आहे. तर अशा या गणपतीच्या गावास प्रत्येकाने एकदातरी भेट द्यायलाच हवी.