पृथ्वीवरील स्वर्ग - अपरांत अर्थात कोकण
सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्यातील अरुंद पट्टीला कोकण या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्र राज्याचा एक भाग असलेला आणि भारताच्या पश्चिम किनार्यावर उत्तरेकडील झाई खाडीपासून दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंत ७२० कि.मी. चा समुद्र किनारा लाभलेल्या कोकणावर निसर्गाने सृष्टीसौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केली आहे.

आज मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, रत्नागिरी, रायगड किंवा सिंधुदूर्गचा कोकणात समावेश होत असला तरी चिनी प्रवासी युआन च्यांग याच्या वर्णनावरुन वनवासी, बेळगाव, धारवाड इत्यादी घाटापलीकडील प्रदेशाचा कोकणात समावेश होता असे दिसते. मध्ययुगात कोकणचे तीन भाग मानले गेले होते. तापीपासून वसईपर्यंतच 'बर्बर', बाणकोटपर्यंत विराट, देवगडपर्यंत किरात,. पूर्वी हा सारा प्रदेश अपरान्त म्हणून ओळखला जायचा. अपरान्तचे नाव कोकण कसे झाले याबाबत मतभिन्नता आहे. कोकण ही परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते. परशुरामाची माता कुंकणा यावरुन कोकण हे नाव पडले असावे असा मतप्रवाह आहे. कोणकोण म्हणजे डोंगरमाथा! यावरुनही कोकण हा शब्द आला असावा.
डॉ.कृष्णास्वामी अय्यंगार यांच्या मते कोकण हा शब्द तामिळ भाषेतून निर्माण झाला आहे. कोकण हे रुप कोळ व काणम या दोन शब्दांच्या संयोगातून झाले असावे. सातव्या शतकातील प्रपंच हृदय या ग्रंथात कुपक, केरळ, मूषक, आळूक, पशुकोकण, परकोकण ही नावे आहेत. ही सप्तकोकणे केरळपर्यंत पसरलेली आहेत. परदेशी प्रवासी टॉलेमी याने गुजरात व उत्तर कोकण याच लारिका व दक्षिण कोकणास आरिका म्हटले आहे. काही प्राचीन ग्रंथात कुंकण, कुकण असेही उल्लेख आहेत. परशुरामाने जिंकलेली भूमी ब्राह्मणांना दान दिल्यानंतर आपणास रहावयास जागा उरली नाही हे पाहून परशुरामाने समुद्र शंभर योजने मागे हटवून अपरान्ताची भुमी निर्माण केली असे ग्रंथ सांगतात तर कोकण हा प्रांत ज्वालामुखीच्या उत्पातात समुद्रतळापासून वर उडविला गेलेला प्रदेश आहे असे भूगर्भ शास्त्रज्ञांचे मत आहे. रायगडचा इतिहास बघताना कोकणाची ओळख आवश्यक ठरते.
प्राचीन ग्रंथांमध्ये इ.स.पुर्व चौथ्या शतकापासुन कोकणचा उल्लेख सापडतो. महाभारत, विष्णुपुराण, बृहसंहिता आदि ग्रंथ तसेच चालुक्याचे शिलालेख व अन्यत्रही कोकणचे संदर्भ आढळ्तात. पेरिप्लस, प्लिनी, टॉलेमी, स्टेबी अखिरुनी इत्यादी प्राचीन ग्रंथकारांच्या ग्रंथातही कोकणचा उल्लेख सापडतो. कोकणातील उपलब्ध शिलालेख आणि ताम्रपटात या भागात (साष्टी- मुंबईच्या दक्षिणेकडील भाग) बौध्दांचे वर्चस्व असल्याचे संदर्भ सापडतात. रायगड, ठाण्यात काही बौध्दकालिन लेण्या आजही पहावयास मिळतात. इ.स्.पुर्व दुसर्या व तिसर्या शतकात मौर्याचा या भागावर अंमल असावा. पुराणात 'आंध्रभृत्य' म्हणून ज्यांचा उल्लेख आह त्या सातवाहनाचे येथे पहिल्या शतकात राज्य होते, चौथ्या व पाचव्या शतकात कलचुरी राजे, सहाव्या शतकात पुन्हा मौर्य, सातव्या शतकात चालुक्य, शिलाहार, देवगिरीचे महादेव यादव या घराण्यांचे कोकणावर राज्य होते.
१३४७ मध्ये नागरदेव यादवाचा गुजरातच्या सुलतानाने पराभव केला तेव्हापासून १६०० पर्यंत बहामनी, आदिलशाही, निजामशाही इत्यादी मुस्लीम सत्ताधिशांनी कोकणावर राज्य केले. सोळाव्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगीज कोकणात आले. गोवा, वसई येथे त्यांनी पाय रोवले. त्यानंतर इंग्रज, डच आले. शिवाजींच्या काळात कोकणास महत्त्व आले. त्यांनी आपली राजधानीही कोकणात रायगडावर आणली. शिवाजी महाराजांना मोघल, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्याशी चार हात करावे लागले. संभाजी महाराजांनी कोकणात दरारा निर्माण केला होता. अठराव्या शतकात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मुंबई ते सावंतवाडी प्रांतावर आपल्या प्रबळ आरमाराच्या सहाय्याने वर्चस्व निर्माण केले होते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठेशाही कमकूवत झाली. दुसर्या बाजीरावाने हा मुलूख राखण्याचा प्रयत्न केला मात्र सप्टेंबर १८१८ मध्ये कोकण प्रांत इंग्रजांच्या ताब्यात गेला.
१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर कोकणही भारतात विलीन झाले. मात्र मुरुडचा संस्थानिक सिद्दी भारतात सामील व्हायला नकार देत होता. १९४८ मध्ये मुरुड संस्थान भारतात विलीन झाले. इंग्रजांच्या काळात कोकण शांत होते मात्र विकास झाला नाही. डोंगराळ प्रदेश, नापिक व खार्या जमिनीचे अधिक प्रमाण, दळणवळणाच्या साधनांचा अभाव यामुळे निसर्गाचा वरदहस्त लाभलेले कोकण मात्र कायम दळीद्रीच राहीले. मुंबईची मात्र भरभराट झाली. स्वातंत्र्यानंतर रायगड, ठाण्यात मोठ्या प्रमाणात कारखानदारी आली. कोकण रेल्वे सुरु झाली, पर्यटनाला गती मिळाल्याने गेल्या पंधरा-वीस वर्षात पर्यटनाला काहीशी गती मिळाल्याने गेल्या पंधरा वीस वर्षांत कोकणची आर्थिक सुबत्तेच्या वाटचाल सुरु झाली. कोकणचा कलिफोर्निया झाला नसला तरी कोकणच्या विकासाचा श्रीगणेशा नक्कीच झाला.
ठाणे, बृह्नमुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे कोकणातील प्रांत, जिल्हे. या सार्या परिसरावर निसर्गाची कृपादृष्टी आहे. नारळी पोफळीच्या बागा, सुंदर आणि तेवढेच स्वच्छ समुद्रकिनारे, खाड्या, जलदुर्ग आणि किल्ले, लेण्या, गरम पाण्याचे झरे, सह्याद्रीच्या रांगा आणि दळणावळणाचे रस्ते, आखाते, पुळिण यामुळे हा सार परिसर पर्यटकांचे आकर्षण झाला आहे. पावसाळ्यात वृक्षांना येणारी टवटवी, रपरप पडणारा पाऊस आणि त्यामुळे डोंगर माथ्यावरुन दरीमध्ये कोसळणारे पाणी आणि निर्माण होणारे नयनमनोहारी धबधबे हे सारे दृश्य चित्रवत वाटते. वैतरणा, तानसा, उल्हास, सावित्री, कुंडलिका, भोगावती, गायत्री, वसिष्ठी, शास्त्री, मांडवी, जुवारी, पाताळगंगा या नद्यांनी कोकणची भूमी पावन करुन टाकली आहे. गावतळी हे देखील कोकणचे वैशिष्ट्य आहे. खोपोली, भिरा, भिवपुरी, पोफळी इत्यादी वीजघरांतून सोडलेले पाणीही उद्योगात आणले जाते. कोकणचे हवामान उष्ण व दमट आहे. येथील हवामान ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान सुखद असते. कोकणातील चाळीस टक्के भाग अरण्यमय आहे. येथील जंगलात मोठ्या प्रमाणात वनौषधी सापडतात. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीही जंगलात सापडतात.