काशीबाई बाजीराव बल्लाळ पेशवे

काशीबाई या स्वभावाने धार्मिक, प्रेमळ, शांत, पतिनिष्ठ व मनमिळावू होता असे उल्लेख सापडतात. बाजीरावांसोबत अनेक मोहिमांमध्ये त्या असल्याचे उल्लेखही आढळतात. १७३५ सालच्या माळवा मोहिमेत सुद्धा त्या बाजीराव यांच्यासोबत होत्या.

काशीबाई बाजीराव बल्लाळ पेशवे

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची धुरा ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांच्याकडे आली त्यावेळी त्यांना लाभलेल्या कर्तृत्ववान पेशव्यांपैकी एक म्हणजे बाजीराव बल्लाळ उर्फ थोरले बाजीराव पेशवे. बाजीराव पेशव्यांचे चरित्र तर आपल्याला माहित आहेच मात्र त्यांची अर्धांगिनी म्हणून लाभलेल्या काशीबाई यांच्याबद्दल जाणून घेण्याचा या लेखातून प्रयत्न करू.

काशीबाई यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चास या गावी १९ ऑक्टोबर १७०३ साली झाला. चास या गावास चासकमान या नावानेही ओळखले जाते. त्यांचे वडील महादजी कृष्ण चासकर जोशी हे त्याकाळातील एक प्रख्यात सावकार होते. पेशव्यांचे सावकार व पोतदार म्हणून या घराण्याने पारंपरिक रित्या कार्य केले होते. चासकर जोशी कुटुंबांचा एक गढी वजा भव्य वाडा आजही चास या गावी पाहावयास मिळतो व या ठिकाणी महादजी चासकर यांचे वंशज राहतात. महादजी चासकर जोशी व बाळाजी विश्वनाथ यांचा परिचय बाळाजी विश्वनाथ हे ज्यावेळी दौलताबादचे सरसुभेदार होते त्यावेळी झाला होता.

आर्थिकदृष्ट्या सधन अशा परिवारात जन्म झाल्याने काशीबाई यांचे बालपणही चांगल्या रीतीने गेले. काशीबाई यांचे माहेरचे नाव लाडूबाई होते व लग्न झाल्यावर त्यांचे काशीबाई असे नामांतर झाले मात्र माहेरी त्यांना ताई या नावाचेच सर्वजण हाक मारत.

बाजीराव व काशीबाई यांचा विवाह १७११ साली झाला यावेळी बाजीराव यांचे वय ११ वर्षे असावे. लग्नसमयी काशीबाई यांचे वय सात ते आठ वर्षांचे असावे. काशीबाई यांना बाजीराव पेशव्यांपासून एकूण चार मुले झाली ज्यांची नावे बाळाजी बाजीराव, रामचंद्र राव, रघुनाथ राव आणि जनार्दन राव अशी होती. 

काशीबाई या स्वभावाने धार्मिक, प्रेमळ, शांत, पतिनिष्ठ व मनमिळावू होता असे उल्लेख सापडतात. राजकारणात आपल्या सासूबाई राधाबाई यांच्यासारख्या त्या तरबेज नसल्या तरी  बाजीरावांसोबत अनेक मोहिमांमध्ये सोबत गेल्याचे उल्लेखही आढळतात. १७३५ सालच्या माळवा मोहिमेत सुद्धा त्या बाजीरावांसोबत होत्या.

बाजीराव व मस्तानी यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले त्यावेळीही काशीबाईंनी बाजीरावांना फार विरोध केल्याचे संदर्भ मिळत नाहीत. या उलट आपण सतत आजारी असतो अशावेळी पतीस आधार म्हणून कोणीतरी हवे हे समजून काशीबाई यांनी मस्तानीस खूप चांगल्या पद्धतीने वागवले. मस्तानी सुद्धा काशीबाईंना चांगला सन्मान देत असे.

असे असले तरी काशीबाई यांची शरीरप्रकृती फार सुदृढ नव्हती. त्यांना संधिवात व इतर त्रास होते त्यामुळे त्या बऱ्याचदा आजारीच असत. संधिवातामुळे त्यांना चालण्याचा त्रास होत असे. काशीबाईंच्या पायावर उपचार करण्यासाठी निजामाच्या राज्यातील वैद्य भरमण्णा याला बोलावण्याचा सल्ला निजामाकडील वकिलाने दिला होता.

बाजीराव रावेरखेडी येथे होते त्यावेळी काशीबाई या सुद्धा पुत्र जनार्दन सहित त्यांच्या सोबत होत्या. यावेळी जनार्दन रावांची मुंज नुकतीच पुण्यास झाली होती मात्र या मुंजीस बाजीराव नव्हते. मुंजीनंतर काशीबाई व जनार्दन राव बाजीराव यांच्याकडे रावरखेड येथे गेले. ज्वराने बाजीराव यांचे निधन रावरखेडीस झाले त्यानंतर ३ जून १७४० रोजी त्या सैन्यासहित पुण्यास परत आल्या.

बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपला उर्वरित काळ देवधर्मात व्यतीत केला. १७४२ साली त्यांनी रामेश्वर यात्रा केली व १७४६ मध्ये त्यांनी काशी यात्रा केली. याच काळात त्यांनी आपले माहेर म्हणजे चासकमान या गावाच्या संवर्धनासाठी दानधर्म केला. गावातून भीमा नदी जाते त्या ठिकाणी घाट बांधणे व गावाच्या नदीकाठी सोमेश्वर महादेवाचे मंदिर बांधणे इत्यादी धार्मिक कार्ये त्यांनी केली. 

उतारवयात त्यांच्या संधिवाताच्या त्रासाने अधिक प्रमाणात डोके वर काढल्याने त्यांना या आजारातून सुटका मिळावी या साठी त्यांचे पुत्र बाळाजी बाजीराव यांनी पुण्याच्या पर्वतीस नवस बोलला होता. १७५८ च्या नोव्हेंबर महिन्यात काशीबाई यांचे निधन झाले. आजच्या काळात काशीबाई या आपल्याला कथा, कादंबऱ्या, चित्रपट व मालिका यांतूनच अधिक पाहावयास मिळत असल्या तरी त्यांचे खरे चरित्र हे फार अल्प स्वरूपात उपलब्ध असूनही एक पतिनिष्ठ व धार्मिक स्त्री म्हणून त्यांचे चरित्र आजही प्रेरणादायी आहे.