शिवाजी महाराजांची कौटुंबिक माहिती

शिवचरित्राचा अभ्यास करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सुद्धा जाणून घेणे गरजेचे ठरते त्यामुळे त्यामुळे शिवरायांच्या पत्नी तसेच कन्या यांची नावे काय होती हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

शिवाजी महाराजांची कौटुंबिक माहिती
शिवाजी महाराजांची कौटुंबिक माहिती

शिवचरित्राचा अभ्यास करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सुद्धा जाणून घेणे गरजेचे ठरते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता शहाजी महाराज व मातोश्री जिजाबाई यांच्याविषयी तसेच पुत्र संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्याविषयी आपणास माहिती असतेच मात्र शिवरायांच्या अष्टराज्ञा व कन्या यांची नावे व त्यांच्याविषयी अधिक माहिती समजून घेणे सुद्धा आवश्यक आहे.

शिवाजी महाराजांचे आयुष्यमान अवघे ५० वर्षे होते आणि त्यांची राजकीय कारकीर्द ही वयाच्या १६ व्या वर्षांपासून सुरु झाली म्हणजे फक्त ३४ वर्षाच्या कालावधीत महाराजांनी क्षणाचीही उसंत न घेता असंख्य शत्रूंचा पराभव करून जनतेचे स्वराज्य निर्माण केले अशावेळी राजांना कौटुंबिक जीवनात रमायला वेळ तरी कितीसा असणार मात्र विवाहाने केवळ पती पत्नी नव्हे तर घराणी सुद्धा जोडली जातात त्यामुळे शिवरायांच्या पत्नी तसेच कन्या यांची नावे काय होती हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

सईबाई - सईबाई या निंबाळकर घराण्यातील होत्या. साईबाईंशी महाराजांचा विवाह १७ एप्रिल १६४० साली पुण्यास झाला असा उल्लेख शिवदिग्विजय बखरीत येतो. सईबाई या फलटण येथील मुधोजी निंबाळकर यांच्या कन्या असून छत्रपती संभाजी महाराजांच्या माता होत. संभाजी महाराज्यांव्यतिरिक्त साईबाईंना तीन कन्यारत्नेही होती ज्यांची नावे सखुबाई, राणूबाई व अंबिकाबाई अशी होती. सईबाईंचे १६५९ साली राजगडावर निधन झाले. सखुबाई यांचे लग्न फलटणचे महादजी निंबाळकर यांच्याशी झाले होते. राणूबाई या जाधव घराण्यात दिल्या होत्या व अंबिका बाई यांचे लग्न हरजी राजे महाडिक तारळेकर यांच्याशी झाले होते.

सगुणाबाई - सगुणाबाई या शिर्के घराण्यातील होत्या. शिवाजी महाराजांच्या पहिल्या लग्नानंतर आदिलशाहच्या इच्छे नुसार शहाजी महाराजांनी वधू वरांस विजापूर येथे नेले त्यावेळी आदिलशाह शहाजी महाराजांना म्हणाला की तुम्ही आम्ही नसता उभयतांचे लग्न केले त्यामुळे दुसरे लग्न येथेच करावयाचे असा हट्ट धरला तेव्हा शिवाजी महाराजांचा द्वितीय विवाह १६४१ मध्ये विजापूर येथे झाल्याचा उल्लेख शिवदिग्विजय बखरीत येतो. सगुणाबाईंना राजकुंवरबाई उर्फ नानीबाई हे कन्यारत्न होते व त्यांचा विवाह गणोजी राजे शिर्के यांच्याशी झाला होता.

सोयराबाई - सोयराबाई या मोहिते घराण्यातील होत्या. सोयराबाई या संभाजी मोहिते यांच्या कन्या व सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी. सोयराबाई या छत्रपती राजाराम महाराज यांच्या माता. याशिवाय सोयराबाईंना दिपाबाई उर्फ बाळीबाई हे कन्यारत्न सुद्धा होते. दिपाबाई यांचा विवाह विसाजी विश्वासराव यांच्यासोबत झाला होता.

पुतळाबाई - पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या. पुतळाबाईंसोबत महाराजांचा विवाह १६५३ साली झाला असा उल्लेख शेडगावकर बखरीत आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाल्यावर पुतळाबाई या सती गेल्या होत्या. 

काशीबाई - काशीबाई या सिंदखेडच्या जाधवराव घराण्यातील असून त्यांच्या वडिलांचे नाव संताजी जाधवराव होते.  वैशाख शुद्ध पंचमीस जाधवरावांशी सोयरीक केली असा उल्लेख या विवाहसंबधाने जेधे शकवलीत येतो. काशीबाईंचा मृत्यू १६७४ साली झाला.

सकवारबाई - सकवारबाई या गायकवाड घराण्यातील असून नांदोजी राव गायकवाड यांच्या कन्या व कृष्णाजीराव गायकवाड यांच्या भगिनी होत्या. माघ शुद्ध पक्षी गायेकवाडासी सोयरीक केली. सकवारबाईंशी लग्न जाले असा उल्लेख जेधे शकवलीत येतो. सकवारबाईंना कमलाबाई नावाचे कन्यारत्न होते. कमलाबाईंचे लग्न जानोजी पालकर यांच्याशी झाले होते.

लक्ष्मीबाई - लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या. लक्ष्मीबाईंसोबत महाराजांचे लग्न जावळीच्या गुप्त मोहिमेवर असताना झाले होते.

गुणवंताबाई - गुणवंताबाई या चिखलीच्या इंगळे घराण्यातील असून शिवाजीराव इंगळे यांच्या कन्या होत्या. वैशाख शुद्ध द्वादशीस इंगळीयांसी सोयरीक केली असा उल्लेख जेधे शकवलीत मिळतो.