ब्रिटिश पेंढारी युद्ध - एक प्रसिद्ध युद्ध

इंग्रज मराठा युद्धातील तिसऱ्या युद्धातील एक प्रसिद्ध युद्ध म्हणजे इंग्रज विरुद्ध पेंढारी युद्ध. इंग्रजीत या युद्धास पिंडारी वॉर असे म्हटले जाते. 

ब्रिटिश पेंढारी युद्ध - एक प्रसिद्ध युद्ध

इंग्रज भारतावर शासन करण्यापूर्वी समस्त भारतात मराठा साम्राज्याची सत्ता होती त्यामुळे इंग्रजांना भारतावर विजय प्राप्त करण्यासाठी मराठा साम्राज्याशी दोन हात करावे लागले. 

ब्रिटिश व मराठे यांच्यात अखेरीस जी तीन मोठी युद्धे झाली त्यांना अँग्लो मराठा वॉर अर्थात आंग्ल मराठे युद्ध असे म्हणतात व ही तीन युद्धे १७७५ ते १८१८ या काळात झाली. 

पहिले इंग्रज मराठा युद्ध १७७५ ते १७८२ सालापर्यंत चालले, दुसरे इंग्रज मराठा युद्ध हे १८०३ ते १८०५ एवढे चालले तर तिसरे युद्ध हे १८१७ ते १८१८ असे सुरु होते. 

अशा या इंग्रज मराठा युद्धकाळातील तिसऱ्या युद्धात घडलेले एक प्रसिद्ध युद्ध म्हणजे इंग्रज विरुद्ध पेंढारी युद्ध. इंग्रजीत या युद्धास पिंडारी वॉर असे म्हटले जाते. 

पिंढारी हा एक लढाऊ लोकांचा समूह असून त्यांचा उदय मराठेशाहीच्या उत्तर काळात झाला होता व त्यांचे मुख्य केंद्र हे मध्य भारत होते. पेंढारी लोक हे स्वतंत्रपणे युद्ध करण्यासाठी प्रसिद्ध होते व त्यांच्या अनेक टोळ्या होत्या आणि या टोळ्यांमध्ये हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोकांचा प्रचंड भरणा होता.

पेंढाऱ्यांच्या उदयास कारणीभूत ठरलेले कारण म्हणजे एकोणिसाव्या शतकात मोगल व मराठे या प्रबळ सत्ता कमकुवत होऊन अनेक संस्थानिकांनी ब्रिटिशांच्या कवायती फौजा ठेऊन स्वतःकडील लष्कराची संख्या कमी केली त्यामुळे अनेक सैनिक बेरोजगार झाले मात्र इंग्रजांच्या वाढत्या प्राबल्यापुढे संस्थानिक हतबल असल्याने त्यांनी स्वतःच या सैन्यास स्वतंत्र लढण्याची प्रेरणा देऊन आम्हास वेळप्रसंगी गुप्त मदत करा असे सांगितले.

पेंढारी हे स्वतंत्रपणे आपले कार्य करीत असले तरी वेळप्रसंगी हे एखाद्या राजाच्या सैन्यात मोहिमेसाठी समाविष्ट होत असत. 

पेंढाऱ्यांचे अनेक समूह असले तरी जे प्रसिद्ध समूह होते त्यांचे प्रमुख आमिरखान, करीमखान, छट्टू, वसील महंमद आदी होते. पेंढाऱ्यांचे नाव ब्रिटिश काळात बदनाम झाले असले तरी त्यांचे कार्य सुद्धा एका जहाल स्वातंत्र्यसैनिकांसारखेच होते आणि इंग्रजांनी जिंकलेल्या आणि त्यांना मदत करणाऱ्या राज्यांत जाऊन हल्ला, जाळपोळ, लुटालूट करणे हे पेंढाऱ्यांचे काम असे. 

१८१७ साली मराठा साम्राज्याच्या अंकित अशा संस्थानिकांकडून पेंढाऱ्यांना पाठबळ मिळून पेंढाऱ्यांनी ब्रिटिशांवर हल्ले सुरु केल्याने ब्रिटिशांनी त्यांच्याविरोधात मोठी आघाडी उभारली आणि ब्रिटिशांना मदत करणाऱ्या राज्यांची आणि त्यांच्या सैन्याची मदत घेऊन त्यांनी पेंढाऱ्यांवर तुफान हल्ला केला.

ब्रिटिश आणि त्यांच्या मित्र राज्यांपुढे पेंढाऱ्यांचे बळ कमी पडू लागले आणि पेंढाऱ्यांची पीछेहाट होऊ लागली. एक पेंढारी प्रमुख छूट्टू पराभवानंतर अरण्यात पलायन करत असताना त्याला एका वाघाने गाठून ठार मारले.

वसील महमंद याने पराभव झाल्यावर इंग्रजांच्या तावडीत सापडू नये म्हणून आत्महत्या केली आणि आमिरखान व करीमखान ब्रिटिशांना शरण गेले. ब्रिटिशांनी आमिरखान आणि करीमखान या दोघांना मोठ्या जहागिरी देऊन आपले मंडलिक केले आणि त्यांच्या सहित पेंढाऱ्यांचे अस्तित्व सुद्धा संपुष्टात आले.