कुडे मांदाड लेणी

कुड्याची लेणी महोबा डोंगरावर आहेत. डोंगराच्या पश्चिम उतारावर समुद्रसपाटीपासून पन्नास ते सत्तर मीटर उंचीवर ती सव्वीस बौद्ध लेणी आहेत. तिथे पाण्याच्या अकरा टाक्याही आहेत.

कुडे मांदाड लेणी

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

कुड्याची लेणी तळा गावापासून अकरा किलोमीटरवर आहेत. रायगड जिल्ह्यात चौल, पाले, महाड, ठाणाळे इथे अशाच प्रकारची लेणी सापडली आहेत. त्यामुळे हा भाग एकेकाळी बौद्धधर्म व धर्मप्रचारकांच्या प्रभावाखाली होता हे उघड आहे. मागल्या शतकापर्यंत जलवाहतूक हे दळणवळणाचे मुख्य साधन होते आणि लेणी गजबजलेल्या व्यापारी मार्गावर होती.

कुड्याजवळ मांदाड ही खाडी येते. टॉलेमीने (इ. स. १५०) तिचा उल्लेख मंदागार तर पेरिप्लसने मंदागोर असा केला आहे. पण, ती एक गजबजलेली व्यापारपेठ होती व त्या बंदरावरून दूरदूरपर्यंत व्यापार चालत असे. व्यापार व बौद्धलेणी एकमेकांना पूरक व पोषक असत. मांदाड गाव स्थानिक राजाचे प्रशासकीय केंद्र होते. सातवाहनांचा काळ कोकणासाठी भरभराटीचा काळ होता. तांदूळ, मीठ, गरम मसाल्याचे पदार्थ, तांब्यापितळेची भांडी व सुकी मासळी, तिथून ग्रीस-रोमपर्यंत जात असे आणि तिकडून अत्तरे, वाद्ये, उंची दागिने या बंदराला लागत. कुडा लेणी व रोहा परिसर त्याला साक्ष आहे.

कुड्याची लेणी महोबा डोंगरावर आहेत. डोंगराच्या पश्चिम उतारावर समुद्रसपाटीपासून पन्नास ते सत्तर मीटर उंचीवर ती सव्वीस बौद्ध लेणी आहेत. तिथे पाण्याच्या अकरा टाक्याही आहेत. अनेक लहान कुंडे आहेत. त्यातील शिलालेखांवर तुलनेने अधिक प्रगत अक्षरे दिसतात. त्यामुळे त्यांचा निर्मितिकाल परिसरातील पाले, महाड, चौल या लेण्यांनंतरचा, म्हणजे पहिल्या ते तिसऱ्या शतकातील असावा. पूर्वी बौद्ध भिक्षु आपल्या कार्यासाठी व्यापारी मार्गावर अशी लेणी तयार करून घेत. त्यासाठी भरपूर द्रव्यही खर्च करत.

भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडून खुष्कीच्या मार्गाने आलेल्या या कलाकारांच्या कायम वसाहती सुरुवातीला कुठेही दिसत नाहीत. कालांतराने त्यांना जोरदार मागणी आल्यामुळे परिस्थिती पालटली. ते द्रव्यसंपन्न झाले. एका जागी वसाहत करून स्थिरस्थावर तर झालेच, पण काहींनी स्वतः बांधलेल्या लेण्यांचे दानही केले. कुड्याच्या एका संपूर्ण लेण्याचे दान कराडच्या एका लोहवाणीयाने दिल्याचा उल्लेख शिलालेखात आहे.

लेण्यांचा शोध १८४८ मध्ये लागला, पण ती उपेक्षित राहिली आहेत. लेणी नैर्ऋत्य-पश्चिमाभिमुख असून दोनशे मीटर क्षेत्रावर पसरलेली आहेत. लेणी दोन स्तरांत खोदलेली आहेत. खालच्या रांगेत १ ते १५, तर वरच्या रांगेत १६ ते २६ क्रमांकाच्या लेण्या आहेत. वरून मागचा महोबा डोंगर व राजापरी खाडी यांचे मनोहारी दर्शन होते. पूर्वेस तळा व उत्तरेस घोसाळा किल्ला दिसतो. लेण्यांमध्ये महत्त्वाचे कोरीव वास्तुशिल्प आहे. तिथे बरीच वास्तुशिल्पीय मूलतत्त्वे विकसित पावलेली दिसतात. शिलालेख आपल्या पुरालिपीतून बोलत असतात, पण शेकडो वर्षांच्या ऊनपावसाने ते झिजून गेले आहेत.

लेणी क्रमांक सहा वगळता इतर सर्व लेणी शिल्पदृष्ट्या साधी आणि एकासारखी एक आहेत. समूहात पाच चैत्यगृहे व एकवीस विहार आहेत. त्यात साधारणपणे समोर व्हरांडा, त्यातून प्रवेशद्वार, मागच्या भिंतीत विहारासाठी प्रवेशद्वार व खिडकी किंवा भिक्षुकांना झोपण्यासाठी खोदीव ओटे असलेले कक्ष आहेत. बहुतांश प्रवेशद्वारांना लाकडी चौकटींसाठी खाचा आहेत. त्यामुळे लेण्यांना दरवाजे असावेत असे वाटते. बहुतांश लेण्यांत शिलालेख आहेत. एकूण एकतीस शिलालेख आहेत. एक भग्न अवस्थेतील हत्ती दिसतो, पण त्यावर वर्ष व तिथीचा उल्लेख नाही.

- श्रीनिवास गडकरी