अंबा अंबिका लेणी समूह

अंबा अंबिका लेणी समूह हा बौद्ध आणि जैन लेण्यांचा मिळून असलेला लेणी समूह आहे, यापैकी आपण महत्वाच्या लेण्यांची आता माहिती घेऊ

अंबा अंबिका लेणी समूह
अंबा अंबिका लेणी समूह

महाराष्ट्रात सातवाहनांच्या राजवटीत लेणी निर्मिती करण्यास प्रारंभ झाला. इ.पू पहिल्या शतकात लोणावळ्या जवळ भाजे लेणे कोरले गेले. पुढे नाणेघाटाची निर्मिती झाली. कल्याण, सोपारा, चौल सारख्या बंदराशी जुन्नर बाजारपेठ जोडली गेली. पैठण, तेर, भोकरदन, उजैन अश्या मोठ्या शहराशी जुन्नर व्यापारी मार्गाने जोडले गेले.

धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी बौध्द भिक्षू या व्यापारी मार्गावरून प्रवास करू लागले. आणि मग त्याच्या निवासासाठी, पर्जन्यकाळी आसरा अश्या उदेश्याने या व्यापारी मार्गावर डोंगरात, कातळ खोदून लेण्यांची निर्मिती झाली.

एकट्या जुन्नर परिसरात दोनशेहून जास्त लेणी आहेत. स्थानिक, परकीय व्यापाऱ्यांनी यासाठी दान, सहाय्य दिल्याचे शिलालेख लेण्यावर कोरलेले आढळतात. त्यापैकी जुन्नर भागातील मानमुकुट उर्फ मानमोडी डोंगरात असणारा हा अंबा अंबिका लेणी समूह...

अंबा अंबिका लेणी समूह हा बौद्ध आणि जैन लेण्यांचा मिळून असलेला लेणी समूह आहे, यापैकी आपण महत्वाच्या लेण्यांची आता माहिती घेऊ...

● लेणे क्र २१, हा चौरस मंडप असून आत बौध्द भिक्षुच्या निवासासाठी ५ खोल्या कोरलेल्या आढळतात.

● लेणे क्र २५, या लेणीच्या आत स्तूप कोरलेला असून, समोरील बाजूस पाण्याची कुंडे आहेत.

● लेणे क्र २६, या लेणी समूह परिसरात आल्यावर, आपले लक्ष वेधून घेणारी ही लेणी. हे चैत्यगृह असून, दर्शनी भागात मध्ये दोन पूर्ण तर बाजूस दोन अर्ध्य स्तंभ कोरलेले आहेत. ओसरी नंतर चैत्याचे प्रवेशद्वार व चैत्य गवाक्ष कोरलेले आहे. गाभारा अपूर्ण असून भिंतीत व छतावर, पाणी झिरपणारा, जवळपास दोन मीटर रुंद ठिसूळ दगडाचा थर लागलेला दिसतो, त्यामुळे बहुतेक ह स्तूप अर्धवट कोरलेला आढळतो. स्तुपाचा आकार प्रमाणात नसला तरी हर्मिका सुंदर कोरलेली आहे.

येथील बाहेरील शिलालेखाची झीज झालेली आहे, पण लेणी अभ्यासकांच्या संदर्भाचा विचार केल्यास, या शिलालेखात या डोंगराचे नाव "मानमुकुड" (संस्कृत मध्ये "मानमुकुट") असे दिले आहे. आजही ते "मानमोडी" या अपभ्रंश रुपात दोनशे वर्षा नंतरही प्रचलित आहे.

इथे निवास करणाऱ्या भिक्षूसंघास "गिध विहार" असे वर्णन शिलालेखांत आढळते.

● लेणी क्र २७ व २८ या लेण्या बाहेरच्या भिंतीवर असणाऱ्या शिलालेखात, भरुकच्छ (भडोच) येथील आससमाचे पुत्र बुद्धमित्र व बुद्धरक्षित या दोन बंधूनी या लेण्यातील दोन खोल्या दान दिल्या असा उल्लेख आढळतो.

● लेणी क्र २९, येथे विहारा बाहेर स्तंभ कोरलेले आहेत. बाहेर भग्न स्तुपाचे अवशेष आहेत.

इथे असणारा शिलालेखात, गणाचा आचार्य सुलस याचा शिष्य चेतीय, त्याचा नातू नंदन याने हा स्तूप दान दिल्याचा उल्लेख आढळतो.

● लेणी क्र ३०, सिमेंटच्या नव्याने बांधलेल्या, दगडी जुन्या पायऱ्यांना जोड देणाऱ्या दगडी जिन्याने आपण पहिल्या मजल्यावर पोहोचतो, लेणीच्या बाहेरच्या दोन्ही बाजूस जैन क्षेत्रपाल व चक्रेश्वरी देवीची शिल्पे कोरलेली आहेत. आत गेल्यावर भिंतीवर आदिनाथ, नेमिनाथ व अंबा अंबिका देवीची शिल्पे आहेत, या वरूनच या लेणी समूहाला अंबा अंबिका लेणी समूह असे नाव प्रचलित आहे.

शिवजन्मभुमी जुन्नर परिसर, लेण्याबाहेर असलेली नीरव शांतता, लेण्यांमधील थंड, गूढ वातावरण अन मूर्ती व लेणी अभ्यासक सदानंद आपटे काकांनी सांगीतलेली अभ्यासपूर्ण माहिती!!! एक ना अनेक कारणांनी ही लॉकडाऊन मधील जुन्नर भेट, अविस्मरणीय ठरली हे मात्र खरं...

संदर्भ -

  • जुन्नर परिसरातील बौद्ध लेणी - सदानंद आपटे
  • जुन्नर शिवनेरी परिसर - सुरेश वसंत जाधव
  • लेणी महाराष्ट्राची - दाऊद दळवी
  • प्राचीन महाराष्ट्र - डॉ श्रीधर व्यंकटेश केतकर (प्र आ १९३५)(दु आ १९८९)

- ऍड हेमंत वडके