शिवरायांनी संभाजी महाराजांना केलेला अमूल्य उपदेश

दक्षिण दिग्विजय मोहिमेपूर्वी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना एक अमूल्य उपदेश केला जो शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी केला होता. हा उपदेश आजच्याही युगात आचरणात आणण्यासारखाच आहे.

शिवरायांनी संभाजी महाराजांना केलेला अमूल्य उपदेश

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज शब्दशः शिव आणि शंभू यांचा अंश असे वर्णन समकालीन लेखकांनी व कवींनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे वडील शहाजी महाराज व आई जिजाबाई यांच्याकडून उत्तम संस्कार मिळाले ज्याचे रूपांतर शिवाजी महाराजांनी आनंदवनभुवन अशा स्वराज्यात केले. 

संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई या संभाजी महाराज लहान असतानाच त्यांना सोडून परलोकी गेल्याने संभाजी महाराजांना आईचा सहवास फारच कमी लाभला अशावेळी त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी संभाजी महाराजांना आईची माया कमी पडू दिली नाही. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर काही दिवसांनी आपल्या मुलास सिंहासनाधीश झालेले पाहून धन्य झालेल्या जिजाबाई यांनी सुखाने डोळे मिटले. 

संभाजी महाराजांचा खूप मोठा आधार हरपला. जिजाबाई यांच्या निधनावेळी संभाजी महाराज अदमासे सतरा वर्षांचे युवक होते. मुळातच त्यांचा स्वभाव भावनिक होता त्यामुळे जिजाबाई यांच्या जाण्याचे प्रचंड दुःख त्यांना झाले असावे.

आपल्या ज्येष्ठ पुत्राच्या मनाची झालेली ही कोंडी जाणते असलेले शिवाजी महाराज यांच्या नजरेतून सुटली नाही. सईबाई व जिजाबाई यांच्यानंतर संभाजी महाराजांना एकमेव आधार होता तो त्यांचे वडील शिवाजी महाराज यांचा मात्र आपण अजून किती काळ पुत्राच्या साथीला असू अशावेळी त्यास उपदेश करणे गरजेचे आहे हे ओळखून शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना एक अमूल्य उपदेश केला जो शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी केला होता.

हा उपदेश आजच्याही युगात आचरणात आणण्यासारखाच आहे. प्रत्येक वडिलाने वयात आलेल्या मुलास हा उपदेश आजही केला तर अनेक प्रश्न मार्गी लागतील इतकी ताकद या उपदेशात आहे.

शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी राजसदरेत दरबार भरला होता व प्रचंड गर्दी लोटली होती. कर्नाटक मोहिमेची पूर्वतयारी या विषयावर कदाचित या दरबारात अनेक खलबते झाली होती कारण दक्षिण दिग्विजय ही अतिशय महत्वाची व प्रचंड अशी मोहीम होती त्यामुळे राज्यातील समस्त लोक या दरबारास हजर राहिले होते.

दरबार सुरु असताना युवराज संभाजी महाराजांचे तेथे आगमन झाले. नुकताच व्यायाम करून शुचिर्भूत होऊन संभाजी महाराज हातात धनुष्य व पाच बाण घेऊन शिवाजी महाराजांच्या दर्शनास दरबारात आले. ते दरबारात येत असताना दरबारातील लोक त्यांना नमस्कार करत होते आणि ते नमस्कार स्वीकारत संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या दिशेने चालत होते. 

सिंहासनाजवळ आल्यावर संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या चरणास स्पर्श केला. एवढ्यात शिवाजी महाराजांनी त्यांचे दोन्ही हात पकडून त्यांना आपल्या जवळ सिंहासनावर बसवले मात्र महाराज आपले वडील असले तरी दरबारात ते एक छत्रपती आहेत ही मर्यादा संभाजी महाराजांना माहित असल्याने ते बसले नाहीत व महाराजांच्या बाजूस उभे राहिले.

माध्यान्हीचा समय होता. अनेक दरबारी लोक स्वराज्याचे थोरले व धाकले धनी यांच्या नात्याचे दृश्य पाहत होते. दुपार झाल्याने रायगड किल्ल्याचे वातावरण अतिशय तप्त झाले होते. हे पाहून महाराजांनी दरबारी लोकांना नजरेनेच दरबार संपल्याची सूचना केली व दरबारी मंडळी आपापल्या घराकडे जाऊ लागली. 

आता दरबारात फक्त संभाजी महाराज व शिवाजी महाराज होते. हा प्रसंग अतिशय दुर्मिळ होता जे संस्कार शाहजी महाराजांनी शिवाजी महाराजांना वारशाच्या रूपात दिले तेच शिवाजी महाराज संभाजी महाराजांना प्रदान करणार होते. 

शिवाजी महाराज संभाजी महाराजांना म्हणाले. बाळा, हे राज्य अतिशय जबाबदारीचे आहे. आठही लोकपालांच्या अंशाने बलवान झालेला राजा हे राज्य सुरळीत चालवू शकतो. बाळा मी हे राज्य कसे प्राप्त केले ते ऐक.. 

आदिलशाह दरबारी मोठ्या पदावर असलेले माझे वडील माझ्यातील गुण पाहून राज्यविस्तार करण्याचे गुण माझ्यात आहेत हे ओळखून मला एक दिवस म्हणाले. मोठे असले तरी हे राज्य मला पुरेसे नाही. तेव्हा या राज्याचा विस्तार तू स्वतः करायला हवास. माझे जे अन्य पुत्र आहेत त्यांना मी वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग दाखवीन मात्र फक्त माझ्या राज्याचा उपभोग न घेता स्वतःचे राज्य निर्माण करण्याची क्षमता तुझ्यात आहे हे मला ठाऊक आहे. 

कितीही गुण असले तरी जे फक्त वडिलांच्या संपत्तीचाच उपभोग घेत राहतात त्यांना लोक किंमत देत नाहीत. पित्यापासून दूर राहून मुलगा जितका सुशिक्षित होतो तितका त्याच्या सानिध्यात राहून होत नाही. तेव्हा शिवबाळ तू माझ्या पुणे जहागिरीचा ताबा घेऊन तेथून आपल्या राज्यविस्तारास सुरुवात कर. तुझा थोरला बंधू संभाजी माझ्या सोबत राहील. त्याने आपल्या कर्तृत्वाने युवराजपद मिळवले आहे. तू पुणे जहागिरीस जाऊन आपल्या कर्तृत्वाने राजपद मिळव.

इतके बोलून शिवाजी महाराज पुढे म्हणाले, शंभूबाळ खंडेरायाच्या कृपेने मी या जहागिरीच्या आजूबाजूचे सर्व प्रांत जिंकून जहागिरीचे राज्यात रूपांतर केले व रायगड किल्ल्यास या राज्याची राजधानी बनवून माझे राज्य स्थिर केले आहे. मात्र बाळा आता मी सुद्धा वार्धक्याकडे झुकू लागलो आहे. गेली अनेक वर्षे अथक परिश्रम करून मी हे राज्य मिळवले या अथक परिश्रमाने माझे शरीर आता थकले आहे. अशावेळी भविष्यात मंत्रीगण, सेनापती, सरदार अधिकारी यांच्या साथीने हे राज्य तू वाढवावेस अशी माझी इच्छा आहे.  मी कर्नाटक मोहिमेवर जाऊन येईपर्यंत तू शृंगारपूर येथे राहून प्रशासनाचे धडे गिरव त्या प्रांतात राज्यकारभाराचे प्रशिक्षण घे.

हे ऐकून संभाजी महाराज म्हणाले. पिताश्री माझ्यासाठी पिता, माता व गुरु हे कायम वंदनीय आहेत. ते सांगतात तसे वागणे गरजेचे आहे. आपण जगावर राज्य करणारे आहात. आज मला तुम्ही जो अमूल्य उपदेश केलात तो पूर्वी कधीही केला नव्हता. आज मला माझ्या आईची खूप काळानंतर आठवण झाली.

आपण शेकडो वर्षे या स्वराज्याचे राज्य सांभाळा. आपण नसाल तर माझेही मन रायगडावर रमू शकणार नाही. तुम्ही हे राज्य मिळवले आणि अजूनही मिळवाल मात्र पित्याकडे जो संपत्ती मागतो तो पुत्र नव्हेच. राजाला कुणीही साहाय्य करत नाही तर धैर्यच त्याचे एकमेव सहायक असते. ते असेल तर आपणाप्रमाणेच मी सुद्धा राज्यावर शासन करण्यास पात्र ठरेन.

शंभूराजांचे उत्तर ऐकून शिवाजी महाराज अतिशय प्रसन्न झाले. आपल्या मागे राज्यास सांभाळणारा उत्तम वारस निर्माण झाला हा विश्वास घेऊन ते राज्यविस्तारासाठी दक्षिण दिग्विजय मोहिमेस रवाना झाले.