छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजा तलवार

सदर लेखात आपणछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख तलवारींपैकी एक मात्र इतिहासात फारशी नोंद नसलेल्या तुळजा या तलवारीविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजा तलवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या खाजगी शस्त्रागारातील प्रमुख तलवारी म्हणून भवानी, व तुळजा या तलवारी अत्यंत प्रसिद्ध आहेत. या तलवारींपैकी भवानी तलवारीचा उल्लेख शिवरायांचा इतिहास वाचताना अनेकदा पाहावयास मिळतो.

भवानी तलवार ही शिवाजी महाराजांना कशी प्राप्त झाली याविषयी अनेक अभ्यासकांनी लिखाण केले आहे मात्र तुळजा तलवार शिवाजी महाराजांना कशी प्राप्त झाली याविषयी फार अल्प माहिती उपलब्ध आहे.

सदर लेखात आपणछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख तलवारींपैकी एक मात्र इतिहासात फारशी नोंद नसलेल्या तुळजा या तलवारीविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

१६६२ साली शहाजी महाराज व शिवाजी महाराज या दोघा पितापुत्रांची ऐतिहासिक भेट जेजुरी येथे झाली. यावेळी शहाजी महाराजांसोबत त्यांच्या द्वितीय पत्नी तुकाबाई व पुत्र व्यंकोजीराजे सुद्धा होते.

जेजुरी येथे शहाजी महाराज व शिवाजी महाराज या पितापुत्रांची ऐतिहासिक भेट झाली व तेथून शहाजी महाराज शिवाजी महाराजांसहित पुणे येथे दाखल झाले व पत्नी जिजाबाई आणि पुत्र शिवाजी महाराज यांच्यासहित कौटुंबिक वातावरणात दोन महिन्यांचा दीर्घ काळ व्यतीत केला. 

या दोन महिन्यांच्या काळात शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांची उत्तम बडदास्त ठेवली. आपण स्वहस्ते निर्माण केलेला मुलुख त्यांना दाखवला. शहाजी महाराजांनाही आपल्या पुत्राने निर्माण केलेले स्वराज्य पाहून अतिशय समाधान वाटले.

शहाजी महाराजांनी पुण्यास येताना आपल्या पुत्रास भेट देण्यासाठी कर्नाटकातून काही उत्कृष्ट तलवारी तयार करवून आणल्या होत्या व या तलवारी त्यांनी शिवरायांना भेट केल्या व यावेळी आपल्या पुत्राने स्वकर्तृत्वावर जे राज्य प्राप्त केले आहे या गोष्टीचा अभिमान म्हणून त्यांनी स्वतःची एक बहुमूल्य अशी तलवार स्वहस्ते शिवाजी महाराजांना भेट केली आणि ही तलवार म्हणजेच शिवरायांची प्रसिद्ध तुळजा तलवार. 

आपल्या पित्याकडून मिळालेला आशीर्वाद म्हणून शिवाजी महाराजांनी ही तलवार नम्रतापूर्वक स्वीकारली आणि ज्या तलवारीच्या योगे शहाजी महाराजांनी गेली कित्येक वर्षे मोठं मोठ्या शत्रूंशी लढा देऊन आपले स्थान कायम ठेवले अशी यशस्वी पुरुषाची यशस्वी तलवार मिळणे हे स्वतःचे परमभाग्य समजून व भोसले घराण्याची कुलदेवता तुळजा भवानी हिचे स्मरण करून या तलवारीचे 'तुळजा' असे नामकरण केले आणि तिला आपल्या खाजगी शस्त्रागारातील प्रमुख तलवारींमध्ये तिला भवानी तलवारीच्या सोबतचे स्थान दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजा तलवार ही खऱ्या अर्थी समस्त शिवप्रेमींचे श्रद्धास्थान असून तिच्या इतिहासावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.