सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे

'गड आला पण सिंह गेला' या वाक्यांतूनच स्वराज्याचे शिलेदार तानाजी मालुसरे यांची महती स्पष्ट होते. तानाजी मालुसरे हे मूळचे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील उमरठ या गावचे मात्र शिवाजी महाराजांसोबत त्यांची मैत्री ही अगदी बालपणापासून होती.

सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या सुरुवातीच्या काळापासून तानाजी यांनी महाराजांना साथ दिली. उंबरखिंडीची लढाई, अफजलखानाचा वध, सूर्यराव सुर्वे यांच्यावरील मोहीम इत्यादी अनेक लढायांत त्यांनी पराक्रम गाजवले. कालांतराने ते स्वराज्याचे सुभेदार बनले. 

शिवाजी महाराजांनी सन १६४५ नंतर भेदनीति वापरून आदिलशाहच्या ताब्यातील कोंडाणा हा बळकट किल्ला ताब्यात घेतला. पुणे जहागिरीमधील हा किल्ला ज्याच्याकडे त्याचे या परिसरात वर्चस्व असणे साहजिकच होते. महत्वाचे म्हणजे हा किल्ला महाराजांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता स्वराज्यात आणला होता. 

सिहंगडावर महाराजांचे वर्चस्व प्रस्थापित झालेले पाहून आदिलशहाच्या तळपायाची आग मस्तकात गेली कारण हा किल्ला महाराजांच्या ताब्यात असणे म्हणजे पुणे परिसरावरील आदिलशाही अस्तित्व कायमचे गमावण्याचा प्रकार होता. त्यामुळे आदिलशहाने शिवाजी महाराजांच्या हालचालींकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवून महाराजांचे बळ कमी पडावे म्हणून खुद्द शाहजी महाराजांना दग्यानें अटक केले. महाराजांसाठी हा मोठा पेचप्रसंग झाला होता. एका बाजूस आपले वडील व दुसऱ्या बाजूस कोंडाणा या द्विधा मनस्थितीत महाराजांनी शाहजी महाराजांची सुटका व्हावी यासाठी सिहंगड आदिलशाहच्या ताब्यात दिला.

पुढे पुरंदरच्या तहातही हा किल्ला महाराजांना मोगलांकडे सोपवावा लागला. महाराजांनी कालांतराने मोगलांची धूळधाण उडवून स्वराज्यातील बराचसा मुलुख परत ताब्यात घेतला मात्र सिंहगड हा अगदी सन १६७० पर्यंत महाराजांच्या ताब्यात आला नव्हता याचे वैषम्य महाराजांसोबत जिजाबाईंना सुद्धा कायमचे होते. राजगडावर निवास असताना जिजामातांचे लक्ष नेहमी कोंडण्याकडे जात असून हा किल्ला स्वराज्यात नसल्याची खंत त्या अनेकदा महाराजांकडे व्यक्त करीत. शेवटी हा किल्ला स्वराज्यात काही करून घ्यावा अशी मागणी जिजाबाईंनी शिवाजी महाराजांकडे गेली व सिंहगड विजयाची एक जबरदस्त मोहीम उभी राहिली.

त्यावेळी कोंडाण्यावर औरंगजेबाने उदयभान राठोड नावाचा एक कडवा राजपूत सेनापती नियुक्त केला होता. मूलतः राजपूत असला तरी कालांतराने धर्म बदलल्याने त्याचे प्रस्थ विशेष होते. याशिवाय त्याच्या हाताखाली तब्बल १२०० राजपुत सैन्य तयार असल्याने किल्ल्याची नाकेबंदी अतिशय अभेद्य झाली होती. 

गडाच्या पायथ्याशी कोळी समाजाची वस्ती असून त्यांच्या नायकाकडे गडाच्या पायथ्याच्या रक्षणाचे काम होते. गडाला दोन दरवाजे असून त्यांची नावे कल्याण दरवाजा व पुणे दरवाजा अशी होती. या व्यतिरिक्त चारही बाजूने तुटलेले कडे व भक्कम तटबंदी असल्याने गडावर येणारी वाट अशी नव्हतीच. तटबंदीवर मोठ्या प्रमाणात तोफा असल्याने येणाऱ्या शत्रूवर चारही बाजुंनी तोफेचा मारा करून त्याला जायबंदी करून टाकणे सहजशक्य होते. यामुळेच ही मोहीम अतिशय अवघड होती. 

अर्थात मोहीम कठीण असली तरी महाराजांनी स्वराज्य निर्मिती करताना अशा अनेक कठीण मोहिमांचे विजयात रूपांतर केले होते व या मोहिमेचे विजयात रूपांतर करण्यासाठी त्यांच्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती उभी राहिली व ती म्हणजे हशमाचें सुभेदार तानाजी मालुसरे. 

त्यावेळी तानाजी यांचा पुत्र रायबाच्या लग्नाची धामधूम चालू होती मात्र ही मोहीम फत्ते करण्याचा निश्चय करून 'आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे' असे उद्गार जिजामाता व महाराजांसमोर काढून ते कोंडाण्यास आपल्या सैन्यासह रवाना झाले. यापूर्वी त्यांनी तेथील पायथ्याशी असणाऱ्या कोळी नायकांना आपल्या सामील करून गडावर जाणाऱ्या दुर्गम व चौकी पहारा नसणाऱ्या वाटेची माहिती घेतली. ही वाट म्हणजे डोणगिरीचा अतिशय भयानक उतार असलेला कडा. या कड्यावरून कोणी वर येईल अशी कल्पनाही उदयभानास नसल्याने या कड्याच्या वर चौकी अथवा पहारा बसवण्यात आलाच नव्हता.  

माघ वद्य नवमीच्या अंधाऱ्या रात्री तानाजी आपल्या सैन्यासह गड चढून गेले. किल्ल्याच्या माथ्यावर गेल्यावर मावळ्यांनी समोर जो दिसेल त्याला कंठस्नान घालण्यास सुरुवात केली. हा हल्ला मुघलांच्या दृष्टीने अनपेक्षित होता. हल्ल्याची बातमी लागल्यावर उदयभान व इतर राजपूत सैन्य सावध झाले. तोपर्यंत तानाजी व मावळ्यांनी मुघलांचे अनेक सैनिक कापून काढले होते. शेवटी वेळ आली खाशा लोकांच्या द्वंदाची मात्र मोहिमेस सुरुवात करून डोणगिरी कडा चढणे व माथ्यावर येऊन शेकडो सैनिकांना कापून काढणे हे प्रचंड श्रम तानाजी यांना झेलावे लागले अशावेळी उदयभान नुकताच युद्धास उतरल्यामुळे जोर थोडा अधिक होता.  

शेवटी तो क्षण आला आणि या दोनही मात्तबरांमध्ये द्वंद्व रंगले. एका क्षणी उदयभानचा तलवारीचा घातक वार तानाजींच्या ढालीवर होऊन ढाल तुटून पडली. मग तानाजी यांनी कमरेचा शेला हातास गुंडाळून युद्धास परत आरंभ केला. मात्र केवळ शेल्याच्या सहाय्याने हे नरवीर किती काळ लढणार होते. लढता लढता एक घाव वर्मी लागून तानाजी युद्धभूमीवर कोसळले मात्र कोसळताना त्यांनी एक जबरदस्त वार उदयभानावर केला व त्याला सुद्धा जमिनीवर लोळवले. 

तानाजी खाली कोसळताच मावळ्यांचा धीर खचुन किल्ल्यावर धावपळ माजली मात्र शेलार मामा व तानाजी यांचा धाकटा बंधू सूर्याजी यांनी सर्वांना रोखले व म्हटले की इथे तुमचा बाप मरून पडला आहे आणि तुम्ही मैदान सोडून जाता? या उद्गाराने सैन्यास आवेश आला व काही वेळातच समस्त मुघल सैन्याची धूळधाण उडवून मावळ्यांनी किल्ल्यावर विजयाचा ध्वज रोवला. हा विजय महाराजांना समजावा यासाठी सूर्याजीने गडावरील झोपडयांच्या गवतास आग लावून दिली त्याने भडकलेल्या जाळाने महाराजांना राजगडावर मोहीम फत्ते झाल्याची बातमी समजली. 

मात्र ही मोहीम फत्ते करताना आपला जिवाभावाचा सवंगडी आपण गमावला अशी कल्पना त्यांना नव्हती. जेव्हा त्यांना ही बातमी कळली तेव्हा त्यांनी खूप शोक केला. 'एक गड आला पण माझा दुसरा गड गेला' असे उद्गार काढले. तानाजी मालुसरे यांचे पार्थिव त्यांच्या कोकणातील मूळ गावाला मढे घाटातून नेण्यात आले यावेळी स्वतः महाराज व जिजाबाई तानाजी यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी उमरठ येथे दाखल झाले होते.