ढेकण्या - गेल्या शतकातील एक भन्नाट वस्तू

या जगात ढेकुण हा खूप अजब कीटक आहे. एका संस्कृत सुभाषितामध्ये याचे मोठे गंमतीदार वर्णन केले गेले आहे. ते सुभाषित असे, कमले कमला शेते, हरः शेते हिमालये। क्षीराब्धौ च हरिः शेते, मन्ये मत्कुणशङ्कया II

ढेकण्या - गेल्या शतकातील एक भन्नाट वस्तू
ढेकण्या

गरज ही शोधांची जननी आहे असे म्हटले जाते. ही गरज आणि ती भागविणारे शोध हे अनेकदा स्थानिक स्वरूपाचे असतात.कांही उदाहरणे तर खूप चमत्कारिक, गंमतीदार,विनोदी असतात. पण जर त्यातून गरज भागत असेल, उपाय हा स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा असेल तर तो पटकन लोकप्रिय होतो. आपण जेव्हा आपले गाव किंवा शहर सोडून अन्य ठिकाणी जातो तेव्हा असे अनेक प्रकारचे शोध, व्यवस्था,वस्तू पाहायला मिळतात. आता सहज उपलब्ध समाजमाध्यमांमुळे त्या लगेचच सर्वगामी होतात. पण ज्यावर आता काळाचा पडदा पडला आहे अशा जुन्या काळातील कित्येक गंमतीदार वस्तू जाणून घेण्यासारख्या रंजक आहेत. 

या जगात ढेकुण हा खूप अजब कीटक आहे. एका संस्कृत सुभाषितामध्ये याचे मोठे गंमतीदार वर्णन केले गेले आहे. ते सुभाषित असे,

कमले कमला शेते, हरः शेते हिमालये। क्षीराब्धौ च हरिः शेते, मन्ये मत्कुणशङ्कया II

याचा मतितार्थ असा की लक्ष्मी ही कमळामध्ये शयन करते, शंकर बर्फाच्या कैलास पर्वतावर  तर भगवान विष्णू हे दुग्धसागरात शयन करतात. सुभाषितकार म्हणतात की मला वाटते की ते ढेकणाच्या शंकेने अशा ठिकाणी शयन करीत असावेत. आता जर देवांनाच  इतकी भीती वाटत असेल तर माणसाचे काय ? 

म्हणूनच ढेकणांचे  निर्दालन करण्यासाठी माणसाने शोधलेली अशीच एक भन्नाट वस्तू म्हणजे ढेकण्या! पूर्वी गावाला खूप मोठी आणि परंपरागत घरे असत. भिंती कुडाच्या किंवा  मातीच्या असायच्या. त्या मातीने अनेकवेळा लिंपल्यामुळे, त्यावर पोपडे धरत असत. जमीन मातीने किंवा शेणाने सारवलेली असायची. अंथरूणे, गाद्या, उशा, चादरी, वाकळ, गोधड्या, घोंगड्या, चिरगुटे ही वर्षानुवर्षे वापरलेली असत. ती धुण्यासाठी १०० लिंबाच्या शक्तीचे साबण उपलब्ध नव्हते. त्यामुळे यात वारंवार ढेकूण होण्याचे प्रमाण मोठे असे. ढेकूण, मुंग्या, वाळवीचे किडे इत्यादी कीटकांची प्रचंड संख्या हेच त्यांचे बलस्थान असते. सतत मोठ्या प्रणात होणारे ढेकूण मारायचे कसे ? खाटा, पलंग, सर्व अंथरूणे कडक उन्हात नेऊन टाकली तरी ते रोज शक्य नसे. शिवाय भिंतींच्या पोपड्यात शिरून लपून बसणारे ढेकूण मारणे शक्य होत नसे. तेव्हा डीडीटी, फिनाईल आणि रॉकेल ही तीन जंतुनाशके उपलब्ध असत. पण त्यांना हे ढेकूण दाद देत नसत. अशा या गरजेपोटी ढेकण्या ही वस्तू शोधली गेली.

ह्या ढेकण्या कशा तयार करीत ते जाणून घेऊया. एखाद्या जाड लाकडी पट्टीला किंवा लाकडी ठोकळ्याला छिद्रे पाडली जात असत. गावाला अशा पट्ट्यांना तोटा नसतो. या पट्ट्यांना खिळे किंवा गिरमिटाने ( भोके पाडण्याचे तत्कालीन ड्रिलिंग मशीन ) भोके पाडली जात असत. ढेकणांच्या सवयी लक्षात घेऊन कांही भोके अर्धवट तर कांही आरपार पडली जात. यासाठी कुठली लाकडे वापरायची नाहीत हे ठरलेले असे. निलगिरी, कडुलिंब अशी तीव्र वासाची किंवा खैर, चिंच यासारखी वेगळ्या चवीची लाकडे वापरली जात नसत.अन्य कुठलीही चालत असत. अशा तऱ्हेने तयार केलेल्या पट्ट्या, ठोकळे म्हणजे ढेकण्या ! रात्री झोपतांना अशा अनेक ढेकण्या प्रत्येकाच्या अंथरुणांच्या आजूबाजूला ठेवल्या जात असत. अंथरुणावर झोपलेल्या माणसाला रात्रभर छळून झाल्यावर ढेकूण परत आपल्या भिंतीतील निवासस्थानी परतत असत. भिंतीपर्यंत पोचण्याआधीच या पट्ट्यांमध्ये तयार केलेली ही गृहयोजना त्यांना आवडून ते त्या पट्ट्यांमध्ये शिरून बसत. या पट्ट्या नंतर उन्हामध्ये आपटून, नुसत्या तापत ठेऊन किंवा त्यावर उकळते पाणी ओतून त्यातील ढेकणांचा नाश केला जात असे. ढेकणांचा उपद्रव कायमचा नाहीसा होणे अशक्य असले तरी ही व्यवस्था तशी सोपी, सुटसुटीत आणि बरीचशी परिणामकारक ठरत असे.   

आता मोठे वाडे, घरे, मातीच्या भिंती नाहीशा होत चालल्या आहेत. परिणामकारक जंतुनाशके उपलब्ध ( ती ही ढेकणांवर १०० % परिणामकारक ठरत नाहीत ) होत आहेत. ढेकण्या आणि एकूणच ही भन्नाट व्यवस्था आता इतिहासजमा झाली आहे. 

( माझ्याकडील संग्रहातील एका ढेकण्याचा फोटो सोबत देत आहे.)    

 © मकरंद करंदीकर ([email protected])