प्रबळगड व कलावंतीण दुर्ग

प्रबळगडाचा घेरा प्रचंड असून त्याचे माची प्रबळगड, कलावंतीण सुळका व बालेकिल्ला असे तीन विभाग आहेत. गडाचा माथा ६.४ किलोमीटर दक्षिणोत्तर असून ४.८ किलोमीटर पूर्व पश्चिम आहे. प्रबळगडाचा उंची समुद्रसपाटीपासून अदमासे २५०० फूट असून किल्ल्याची चढाई दुर्गप्रेमींची परीक्षा पाहणारी असते.

प्रबळगड व कलावंतीण दुर्ग

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग व हे राज्य स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांवरूनच निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रभूमीस गडकोटांचा उज्वल वारसा आहे. महाराष्ट्राच्या प्रचंड अशा दुर्गशृंखलेतील एक गड म्हणजे किल्ले प्रबळगड. प्रबळगड हा दुर्ग रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यात असून प्रबळगडाचा इतिहास सुद्धा अतिशय रंजक असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी या किल्ल्यावर शहाजी महाराज व राजमाता जिजाऊंसोबत वास्तव्यही केले होते.

त्याकाळी प्रबळगडास मुरंजन या नावाने ओळखले जात असे व किल्ल्याचा ताबा मोगलांचा एक राजपूत सरदार केशरसिंग याच्याकडे होता. महाराजांनी जेव्हा उत्तर कोकण स्वराज्यात सामील करून घेण्याचे कार्य सुरु केले त्यावेळी त्यांची नजर बळकट अशा मुरंजन किल्ल्यावर पडली. बालपणातील काही काळ या गडावर व्यतीत केल्याने या गडाचे महत्व शिवरायांना ठाऊक होतेच त्यामुळे उत्तर कोकणातील हा बुलंद असा किल्ला स्वराज्यात घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले.

महाराजांनी सुरुवातीस भेदनीति वापरून हा किल्ला मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतः प्रबळगडावर मोहीम काढली. मराठ्यांचे व मोगलांचे युद्ध सुरु होऊन अनेक दिवस लोटले मात्र छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आपली हार निश्चित आहे हे केशरसिंगच्या लक्षात आले व त्याने किल्ल्यावरून सैन्यासहित तळाशी येऊन अंतिम युद्ध केले व या युद्धात तो त्याच्या सैन्यासहित मारला गेला. महाराजांनी यानंतर केशरसिंग व त्याच्या सैन्याच्या प्रेतांवर अत्यंसंस्कार करवून घेतले मात्र केशरसिंगची आई व कन्या या किल्ल्यावरच अडकल्या होत्या व ही गोष्ट महाराजांना समजल्यानंतर महाराजांनी त्यांना मोठ्या अदबीने वागवून व त्यांचा सन्मान करून स्वगृही पाठवून दिले. 

प्रबळगड स्वराज्यात आल्यावर महाराज किल्ल्याची पाहणी करण्यासाठी किल्ल्यावर गेले यावेळी एक अनोखी घटना घडली. महाराज पालखीमधून गडाची पाहणी करीत असताना अचानक त्यांच्या शेल्यास बोरीच्या झाडाची फांदी लागली व शेला खाली पडला. महाराजांनी पालखी थांबवली व खाली उतरून ते म्हणाले की "या ठिकाणी आम्हास उभे केले, त्यापेक्षा येथे भुईखाली द्रव्य असावे' मग त्यांनी त्या ठिकाणी खोदकाम करवून घेतले असता जमिनीत खरोखरच द्रव्याचा प्रचंड साठा प्राप्त झाला. हा साठा तब्बल चार लाख सुवर्ण मोहोरांचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाच्या स्वरूपानुसार त्याचे प्रबळगड असे यथोचित नामकरण केले. पुरंदरच्या तहात प्रबळगड हा पुन्हा एकदा मोगलांकडे गेला मात्र आग्र्याहून सुटकेनंतर महाराजांनी पुन्हा एकदा प्रबळगड स्वराज्यात आणला.

प्रबळगडाचा घेरा प्रचंड असून त्याचे माची प्रबळगड, कलावंतीण सुळका व बालेकिल्ला असे तीन विभाग आहेत. गडाचा माथा ६.४ किलोमीटर दक्षिणोत्तर असून ४.८ किलोमीटर पूर्व पश्चिम आहे. प्रबळगडाचा उंची समुद्रसपाटीपासून अदमासे २५०० फूट असून किल्ल्याची चढाई दुर्गप्रेमींची परीक्षा पाहणारी असते. गडावर जाण्यास दोन वाटा असून एक वाट ही पनवेल तालुक्यातील शेडुंग या गावापासून ठाकूरवाडी मार्गे आहे व दुसरी वाट ही माथेरान मार्गे आहे मात्र माथेरानची वाट कठीण आहे. शेडुंग फाट्यावरून आपण जेव्हा गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडी या गावात पोहोचतो तेव्हा आपल्या प्रचंड आकार व उंचीने प्रबळगड आपल्या समोर उभा ठाकतो. येथून चढाई करत आपण प्रथम पोहोचतो ते ५०० मीटर उंच अशा माची प्रबळगडावर. माची प्रबळगडावर मनुष्य वस्ती असून राहण्याची व खाण्याची सोय तेथे होऊ शकते.

माची प्रबळगडावर पोहोचल्यावर डाव्या बाजूस गगनाला गवसणी घालणाऱ्या कलावंतीण सुळक्याचे व उजव्या बाजूस तितक्याच दुर्गम अशा बालेकिल्ल्याचे दर्शन होते. कलावंतीण सुळका हे गिर्यारोहकांचे आवडते ठिकाण असून पायथ्यापासून कातळात कोरलेल्या पायऱ्या चढत माथ्यावर पोहोचण्याचा अनुभव अतिशय साहसपूर्ण असतो. प्रबळगडास पूर्वी भक्कम तटबंदी होती व तटबंदीस २ दरवाजे आणि ११ बुरुज होते व किल्ल्यावर अनेक इमारतींचे बांधकाम करण्यात आले होते मात्र १८१८ साली ब्रिटिशांनी या किल्ल्याची अपरिमित हानी केली त्यामुळे अनेक अवशेष आज पाहावयास मिळत नाहीत.

प्रबळ गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे कलावंतीण सुळका, माची प्रबळगडावरील शिवमंदिर, दोन मानवनिर्मित गुहा, बालेकिल्ल्यावरील महाद्वार, तटबंदी व उत्तरेकडील तटबंदिस्त बुरुज व दक्षिणेकडील काळा बुरुज, याशिवाय माथ्यावर वाड्याचे व इतर इमारतींचे अवशेष व पाण्याचे तलाव व टाक्या व काही समाध्या सुद्धा पाहावयास मिळतात. काळ्या बुरुजावर एक चुन्याचे घाणे सुद्धा पाहावयास मिळते. स्वच्छ हवा असल्यास गडावरून कर्नाळा, माणिकगड, इर्शाळगड, विकटगड, मलंगगड हे किल्ले व माथेरान या गिरिस्थानाचे दर्शन होते. नावाप्रमाणेच प्रबळ असा हा प्रबळगड किल्ला पूर्ण पाहावयाचा असेल तर हातात एक पूर्ण दिवस हवाच. प्रबळगडाच्या प्रबळपणाचा अनुभव घ्यावयाचा असल्यास व त्याचबरोबर आपल्या शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहावयाची असल्यास या किल्ल्यास एकदा तरी आवर्जून भेट देणे गरजेचे आहे.