प्रतापगड - शिवरायांच्या प्रतापाचा साक्षीदार

जावळीच्या खोऱ्यातील एक बुलंद किल्ला म्हणजे प्रतापगड. महाबळेश्वरच्या पश्चिमेस अदमासे १० मैलांवर असलेला प्रतापगड दुर्ग समुद्रसपाटीपासून ३५४३ फूट उंच आहे.

प्रतापगड - शिवरायांच्या प्रतापाचा साक्षीदार

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

शिवाजी महाराजांनी मोऱ्यांकडून जावळी हस्तगत केल्यानंतर जावळी प्रांत, नीरा व कोयना नद्यांचे खोरे यांवर नजर ठेवता यावी म्हणून तसेच पारघाटाची नाकेबंदी करता यावी म्हणून पारघाटानजीक एका उंच डोंगरावर शिवाजी महाराजांनी १६५७ साली हा किल्ला बांधला व त्याचे नाव ठेवले प्रतापगड. 

प्रतापगड बांधण्याचे काम मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे यांच्याकडे होते. एका जुन्या यादीत प्रतापगडाचा उल्लेख पुढीलप्रमाणे येतो..

किले प्रतापगड हा किला कोंडवी तर्फ बिरवाडी हे गाव हरदू महालाचे हादीवर मोठा पहाड डोंगर आहे त्या डोंगरावर सिवाजी महाराज यांही बंदिस्ती केली ते शके १५७९. 

आणखी एक महत्वाचा उल्लेख एका टिपणात पुढीलप्रमाणे येतो 

शके १५७८ दुर्मुखी नाम संवत्सरे सबा खमसैन आल्फ सन १०६६ शिवाजी राजे यांनी भोरपा डोंगर यास इमारतकाम येडका बुरुजाजवळ लावले. अर्जोजी यादव इमारत उर्फ प्रतापगड. 

यावरून हे लक्षात येते की प्रतापगडास पूर्वी भोरप्याचा डोंगर म्हणत असत. भोरप्याचा डोंगर पार व किन्हईश्वर या दोन्ही गावांमध्ये होता. या भोरप्याच्या डोंगरास चोहो बाजूनी तटबंदी करून महाराजांनी एक बुलंद दुर्ग येथे उभारला.

प्रतापगड येथे येण्यासाठी कुंभरोशी या गावातून मार्ग आहे. किल्ल्याच्या पायथ्यापासून माथ्यावर जाण्यास फार वेळ लागत नाही. पायथ्यालाच शिवाजी महाराजांनी ज्यास नेस्तनाबूत केले अशा आदिलशाही सरदार अफझलखानाची कबर दिसून येते.

किल्ल्यावर जाण्यास पायऱ्यांचा मार्ग आहे, या पायऱ्या चढून आपण वर पोहोचलो की डाव्या हातास शिवाजी महाराजांची कुलदेवता तुळजा भवानी हीचे देखणे मंदिर आहे. या मंदिराचे मूळ बांधकाम काळ्या पाषाणाचे होते व देवीची मूर्ती ही गंडकी नदीच्या शिळेपासून तयार करण्यात आली होती.

भवानी मातेची ही मूर्ती अतिशय रेखीव असून तिची उंची १ फूट आहे. मूर्तीची रचना अशा विशिष्ट रित्या केली आहे की सूर्योदय झाल्यावर सूर्याची किरणे थेट देवीच्या मूर्तीवर पडतात. मूर्तीच्या बाजूस स्फटिकाचे एक देखणे शिवलिंग आहे. मंदिराचा सभामंडप पूर्वी लाकडी असून तो ५० फूट लांब, ३० फूट रुंद व १२ फूट उंच होता. संभामंडपाच्या पिंजरीस वर तांब्याचा पत्रा होता जो छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी बसवला होता. प्रतापगडावर श्री केदारेश्वर हे महादेवाचे एक अतिशय पुरातन मंदिर आहे जे शिवपूर्वकालीन आहे.

देवीच्या मंदिरासमोर एक गोड्या पाण्याचा तलाव आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस गडावरील पुजारी, पुराणिक, गुरव इत्यादी देवीच्या सेवेकऱ्यांची घरे आहेत. गडाच्या पश्चिम व उत्तर दिशेकडील कडे तुटल्यामुळे किल्ला त्या बाजूने दुर्गम झाला आहे. या कड्यांच्या बाजूस उभे राहिले असता कोकणपट्टीचे खूप सुंदर दर्शन होते. किल्ल्याचा बालेकिल्ला अदमासे अर्धा मैल आहे.

बालेकिल्ल्यावर हनुमानाचे मंदिर आहे. दरवाज्यातून आत आल्यावर सदरेची जागा व महादेवाचे मंदिर लागते. उजव्या बाजूस शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व उद्यान आहे. भवानी मंदिराच्या पूर्वेस एका चिंचोळ्या भागावर तटबंदी उभारून तटबंदीच्या शेवटी एक बुरुज बांधला आहे ज्यास अफझल बुरुज असे नाव आहे.

प्रतापगडाच्या चोहो बाजूने न्याहाळयास अनेक नजारे दृष्टीस पडतात. उत्तरेस रायगड, दक्षिणेस मकरंदगड व पूर्वेस महाबळेश्वर दिसून येतात. प्रतापगड हा किल्ला शिवाजी महाराजांच्या प्रतापाचा साक्षी आहे त्यामुळे या परिसरात गेल्यावर आजही शिवकाळात आल्यासारखे वाटते. शिवकाळाचा वेगळ्या अर्थी अनुभव घ्यायचा असेल तर प्रतापगडास एकदा तरी भेट द्यायलाच हवी.