सह्याद्रीचा स्नानसोहळा
सह्याद्रीचा स्नानसोहळा आपल्यासारख्या भटक्यांनी विविध वेळी आणि विविध ठिकाणी अनुभवला. कधी तो कुठल्या घाटवाटेवर, तर कधी गर्द रानात. कधी रायरेश्वराच्या पठारावर तर कधी धारकुंडसारख्या धबधब्याच्या ठिकाणी. कधी नाणेघाटातल्या नानाच्या अंगठ्यावर तर कधी थेट मराठवाड्यातल्या कपिलधारा क्षेत्री.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपल्या शिवछत्रपती या ग्रंथात पवसाळ्यात चिंब भिजलेल्या सह्याद्रीचे फारच सुरेख वर्णन करतात. ते म्हणतात, “सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे. तितकाच तो रेखीव आहे. त्याच्या घट्ट अंगाखांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की तेथून खाली डोकावत नाही. मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की या खांद्यांवरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो तो ऐकावा. सह्याद्रीचं हसणंखिदळणं ते. बेहोष खिदळत असतो. एवढा राकट, रांगडा गडी तो. चार महिने त्याचे महास्नान सुरु असते. त्याच्या अंगावरची लाल माती या अभिषेकाने वाहून जाते. धबधब्यांच्या रूपाने हे त्याचे स्नानोदक खाली येते आणि असंख्य ओढे, नद्या यांच्यामार्गे प्रसाद रूपाने सर्व जमीन सुजलाम सुफलाम करीत जाते. नवरात्रीचे घट बसू लागले की सह्याद्रीचा हा स्नानसोहळा संपू लागतो. त्या असंख्य मेघमाला निरोप घेताना आहेर म्हणून सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. सोनकी, कारवी, कांचन, झेंडू, तेरडा अशा असंख्य फुलांची नक्षी त्या शेल्यावर शोभून दिसते. देखण्या सह्याद्रीचे रूप अजून खुलून दिसते.
सह्याद्रीचा स्नानसोहळा आपल्यासारख्या भटक्यांनी विविध वेळी आणि विविध ठिकाणी अनुभवला. कधी तो कुठल्या घाटवाटेवर, तर कधी गर्द रानात. कधी राय्र्रेश्वाराच्या पठारावर तर कधी धारकुंडसारख्या धबधब्याच्या ठिकाणी. कधी नाणेघाटातल्या नानाच्या अंगठ्यावर तर कधी थेट मराठवाड्यातल्या कपिलधारा क्षेत्री. मेघमालांच्या वर्षावासोबत आपलीसुद्धा चिंब भटकंती सुरु असते. जो चालतो त्याचं नशीब चालतं असं आपल्याकडे सांगितलं जातं.
सह्याद्रीच्या साक्षीने त्याचा हा महास्नानसोहळा अनुभवल्यावर सह्याद्रीचं बदललेलं रूप बघायला आणि अनुभवायला आता नवनवीन ठिकाणं आपली वाट पाहत असतात. आश्विनाचा महिना सुरु झालेला मेघमाला आपले रिकामे कुंभ घेऊन परतू लागलेले. थंडीची चाहूल देणारं धुकं सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर पसरलेलं दिसू लागतं. अतिशय आल्हाददायक हवा आणि सगळा परिसर हिरवागार झालेला. अशा वेळी घरात बसणं शक्यच नाही. कदाचित चिंब भटकंती नसेल जमली तरी आता मात्र सह्याद्रीच्या भेटीला जायलाच हवं. नवरात्रीचे दिवस संपून दसरा उजाडतो. हा तर सीमोल्लंघनाचा दिवस. तोच मुहूर्त साधून बाहेर पडावं. रानभाज्या आणि रानफुले आपल्या स्वागताला तयार असतातच. कौला-भारंगी-शेवळं-टाकळा या खास रानभाज्या दूर ग्रामीण भागातच खायला मिळतील. अनेक फुलांची उधळण बघायला मिळेल. त्यासाठी फक्त कासच्या पठारावर गर्दी करण्याची गरज नाही. रतनगड, पाबरगड, पेबचा किल्ला, पानशेत ते वेल्हा परिसर,रायरेश्वर, हाटकेश्वर, बागलाण परिसरातले किल्ले, इथेपण असंख्य रानफुले पसरलेली असतात. विविध रंगांची ही रानफुले कोवळ्या उन्हात अत्यंत देखणी आणि तजेलदार दिसतात. डोंगरमाथ्यावरून अजूनही अनेक निर्झर वाहत असतात. ट्रेकिंगसाठी हा सुकाळ असला तरी निव्वळ भटकणाऱ्यांसाठीसुद्धा ही पर्वणी असते.
त्रिपुरी पौर्णिमेला गावोगावी शंकराच्या मंदिरात उजळल्या जाणाऱ्या दीपमाळा अगदी न चुकता बघ्याव्यात. गावोगावच्या जत्रा-यात्रा किंवा साप्ताह याठिकाणी आवर्जून उपस्थिती लावावी. आता भटकंतीसाठी कुठले तरी उंचावरचे ठिकाण शोधावे. एखादा किल्ला किंवा कोणते तरी गिरीस्थान. कारण जशी सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर फुले फुललेली असतात तशीच पायथ्याच्या गावांमधून केलेली फुलशेती बघायची असेल तर असे उंचावरचे ठिकाण उत्तम. त्यातल्या त्यात जुन्नर तालुक्यात असलेल्या हाटकेश्वर या गिरीस्थानी मुद्दाम गेलं पाहिजे. पायथ्याशी असलेल्या आल्मे आणि गोद्रे या गावांत झेंडूची शेती मोठ्या प्रमाणावर करतात. उंचावरून खाली पाहिले की सर्वत्र पसरलेली झेंडूची शेती अतिशय सुंदर दिसते. सगळा परिसर हिरव्या पिवळ्या रांगांनी रंगून गेलेला असतो. तसेच बागलाणात जावे. बागलाण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि कळवण परिसर. आग्रा रस्त्याला समांतर धावणारी सह्याद्रीची सातमाळा रांग आणि त्यावर एकाशेजारी एक असलेले बेलग असे दुर्ग. त्यावरून सारा आसमंत अप्रतिम दिसतो. दुंधा, बिष्टा, कऱ्हा, अजमेरा, भिलाई या छोटेखानी किल्ल्यांवरून खालचा प्रदेश न्याहाळावा. बागलाणात फुलशेती आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. आखीवरेखीव शेतात फुललेली हिरवाई मुद्दाम उंचावरून पहावी.
सर्वत्र सह्याद्रीच्या रांगांचा गराडा पडलेला आणि पायथ्याशी सपाट जागेत हिरवागार गालीचा पसरलेला बघायचा असेल तर बागलाणात जायलाच हवे.
ऋतू कोणताही असो, सह्याद्री भटकणाऱ्याला कधीही कमी पडू देत नाही. नुसता सह्याद्रीच नाही तर अख्खा महाराष्ट्र अतिशय देखणं आहे. विविध धरणे, धबधबे, अभयारण्ये, समुद्रकिनारे, निबिड वने, देवस्थाने आणि अनेक गडकोटकिल्ले यांनी तो नटलेला आहे. ज्याच्या पायात भटकायला बळ आहे त्याला इथे कधीही कमी पडत नाही. नवनवीन ठिकाणे कायमच आपल्याला खुणावत असतात आणि आपण चिंब भटकंतीसारखा त्यांचाही आस्वाद घेत राहतो. जो चालतो त्याचं नशीबही चालतं या न्यायाने ऋतू जरी बदलला तरी आपली भटकंती अशीच अव्याहत चालत राहो.
- आशुतोष बापट