अंकोल वनस्पतीचे गुणधर्म व फायदे
अतिसारावर आणि विषबाधेवर उपयोगी असणाऱ्या अंकोल या औषधी वनस्पतीबद्दल या लेखामधून जाणून घेऊ.
अंकोल हा वृक्ष बहुदा भारतातील सर्वच राज्यांत आढळतो. अंकोलच्या फांद्या वेड्यावाकड्या असून त्याची साल राखी रंगाची, जाड व खडबडीत असते. अंकोलचे मूळ जड, पिवळे, तेलकट व टणकदार असते. अंकोला ला बाराही महिने पालवी फुटत असली तरी फुले येण्यापूर्वी झाडाची पाने गाळून पडतात.
अंकोल झाड आकाराने मोठे असून त्याची पाने कण्हेरीच्या पानाप्रमाणे लांब असतात व त्यांची रुंदीही बऱ्यापैकी मोठी असते.
अंकोल झाडास येणारी फळे ही लाल रंगाची असतात. या फळांच्या बियांपासून तेल तयार होते ज्यास 'अंकोल तेल' म्हटले जाते. यांची चव तुरट, कडू, थोडी तिखट असून प्रकृती तीक्ष्ण, उष्ण व स्निग्ध आहे.
अंकोलचा रस विष, कफ, वाटशुळ, कृमी, सूज, आम, पित्त, रक्तदोष आणि कुत्रे, मांजर आणि उंदीर यांच्या विषावर गुणकारी ठरतो.
अंकोलच्या बियांचे तेल वात व कफाचा नाश करते आणि आंघोळीच्या वेळी हे तेल शरीरास लावले असता त्वचारोगावरही गुणकारी ठरते.
अतिसारावर आणि विषबाधेवर अंकोलच्या मुळाची साल तांदळाच्या धुण्यात उगाळून मधासोबत घेतली असता फरक पडतो.
याशिवाय प्रमेह, कृमी, जलोदर, व्रण, त्वचारोग, वायूने अंग ठणकणे, सूज, दाहज्वर, मूत्रावरोध इत्यादी विकारांवर अंकोलचा वापर विविध औषधी वनस्पतींसोबत केला जातो.
अंकोलचा एक वेगळा उपयोग म्हणजे आंब्याची जी कोय असते तिला अंकोलाच्या तेलाची सात पुटे देऊन ती कोय जमिनीत पुरली असता आंब्याचे झाड लवकर उगवते.
अंकोला वृक्षास संस्कृत मध्ये अंकोट,अंकोल, हिंदीत ढेरा अथवा टेरा, बंगाली भाषेत धल/आंकोट, धलाकुर, धलाआंक्रा, गुजराती मध्ये अंकोल, मल्याळम, तेलगू व तमिळ मध्ये अंकोलम, कन्नड मध्ये अंकोलेमर, इंग्लिश मध्ये Sage-leaf Alangium तर लॅटिन भाषेत Alangium Lamarkii या नावांनी ओळखले जाते.