किल्ले पुरंदर व वज्रगड

१६५५ साली महाराजांनी नेताजी पालकर यांना गडाचे सरनोबत केले. संभाजी महाराजांचा जन्म सुद्धा सन १६५७ साली पुरंदर किल्ल्यावरच झाला त्याअर्थी शिवाजी महाराज कुटुंबियांसोबत पुरंदर किल्ल्यावर वास्तव्यास होते हे लक्षात येते.

किल्ले पुरंदर व वज्रगड

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

सह्याद्रीच्या उपशाखा तिच्या मुख्य धारेपासून पूर्व पश्चिमेस पसरल्या आहेत. सह्याद्रीच्या पूर्वेस पसरलेल्या शाखा या घाट माथ्यावर येतात. सह्याद्रीच्या पुणे जिल्ह्यातील अशाच उपशांखावर सिंहगड, तोरणा, राजगड, पुरंदर व इतर अनेक दुर्ग आहेत. खरं तर कोकणातल्या रायगडावर उभे राहून पूर्वेस नजर टाकली की सरळ टप्प्यात तोरणा व राजगड हे किल्ले दिसून येतात मात्र याच टप्प्यात पुढे असलेला पुरंदर मात्र दिसत नाही कारण तो किल्ले राजगडाच्या मागे लपला जातो. पुरंदर किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून आहे अदमासे १३४१ मीटर. 

पुरंदर म्हणजे इंद्राचे दुसरे नाव. पुराणात पुरंदर पर्वताचा उल्लेख इंद्रनील असा केला गेला आहे. इंद्र हा देवांचा राजा त्याअर्थी पुरंदर हा दुर्गांचा राजा असे मत या किल्ल्याचे नाव ठेवताना निर्माणकर्त्याचे असावे. हा किल्ला राष्ट्रकूट काळात बांधला गेला. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला पूर नावाचे गाव आहे व या गावातील नारायणेश्वराचे मंदिर हे अतिशय जुने म्हणजे यादव कालीन आहे. नारायणेश्वराच्या मंदिरामुळे पूर या गावास नारायणपूर या नावाने ओळखले जाते.

पुरंदर किल्ल्याचा जुना उल्लेख बहामनी काळातील आहे. त्याकाळी बहामनी राज्याचे बेदर येथील सरदार चंद्रसंपत देशपांडे यांनी हा किल्ला ताब्यात घेतला व नव्या बांधकामास सुरुवात केली , पुरंदर किल्ल्यावर जो शेंदरी नामक बुरुज आहे त्याचे काम या काळात लावण्यात आले होते. पण काहीना काही कारणाने हे काम सारखे ढासळत होते. 

अशावेळी बादशहास दृष्टांत (?) झाला की कुणाचाही मोठा मुलगा व मोठी सुन असे दोन जण बुरुजात घातली तरच काम सिद्धीस जाणार.  त्यावेळी येथील एकाने आपला पुत्र व सून शेंदर्या बुरुज पूर्णत्वास जावा यासाठी बहामनी राज्यास सोपवले. ही घटना तशी दुर्दैवी असली तरी शेवटी तो इतिहास आहे व पुरंदर किल्ल्याचा सर्वात जुना उल्लेख याच ताम्रपटात असल्याने ही घटना नमूद करावी लागते.

बहामनी राज्याची शकले उडाली आणि किल्ला निजामशाहीकडे गेला. निजामशाही नष्ट झाल्यावर किल्ला आदिलशाह कडे गेला. महादजी नीलकंठ हे किल्ल्याचे अंमलदार वारल्यावर त्यांचे दोन पुत्र हक्कासाठी भांडू लागले. ही भांडणे पाहून शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला आपल्या अमलाखाली आणला व तेथूनच कारभार पाहू लागले. खरं तर पुरंदर हा किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांची पहिली डोंगरी राजधानी. शिवाजी महाराज पुरंदर किल्ल्यावरून आपला राज्यकारभार चालवत होते याचा दाखला देणारे एक पत्र आहे त्यामध्ये शिरवळचे मल्हारजी आपाजी देशमुख अनाजी नामाजी यांना म्हणतात की, 

शहाजी राजे धरिले. त्यांचा लेक शिवाजी पुरंधरी बैसून दिवाण नामजादीसी झगडो लागले. सर सुभेदार फत्तेखान तीही शिरवलास फाझीलशाह व आशाफाशा पाठविले. तीही कोट पर मज वळविला. त्यावरी पुरंधरीवरून शिवाजी राजे धाविनले. झगडा झाला.

या लढाईत शिवाजी महाराज व रणमर्द मावळे यांनी फत्तेखानाचा दणदणीत पराभव केला.

१६५५ साली महाराजांनी नेताजी पालकर यांना गडाचे सरनोबत केले. संभाजी महाराजांचा जन्म सुद्धा सन १६५७ साली पुरंदर किल्ल्यावरच झाला त्याअर्थी शिवाजी महाराज कुटुंबियांसोबत पुरंदर किल्ल्यावर वास्तव्यास होते हे लक्षात येते.

याशिवाय किल्ल्यावर महाराजांनी काही इमारती व कारखाने सुद्धा सुरु केले होते. पुरंदर येथे शिवरायांनी तोफा ओतण्याचा कारखाना सुद्धा सुरु केला होता. पुरंदर किल्ल्यावर त्यांनी प्रथम तोफांची निर्मिती सुरु करून स्वराज्याच्या युद्धसज्जतेचा पाया उभारला. मिर्झा राजा जयसिंग याने स्वराज्यावर स्वारी केल्यावर स्वराज्याच्या पूर्वीच्या पराभूत शत्रूंसोबत युतीची बोलणी चालवली. यामध्ये अफझलखानाचा मुलगा तसेच चंद्ररावाचे नातलग होते. यासंदर्भात १६६५ साली जयंसिंगाने औरंगजेबाला पाठवलेल्या पत्रात तो लिहीतो की,

'जावळीचा जुना जमिनदार चंद्रराय व त्याचा भाऊ यांना मी बोलावणे पाठविले आहे. त्यांना पुष्कळ अभिवचने देऊन पाथेयांचिही तजवीज केली आहे. अंबाजी, खारकुली व त्यांचे दोन भाऊ हे सर्व पुरंदरावर शिवाजीराजे यांनी तोफा ओतण्याकरिता ठेवले असून त्यांना ३००० ची मनसबदारी आहे.'

यावरून हे समजते की पुरंदरावर महाराजांनी तोफा ओतण्याचा कारखाना सुरु केला होता.

बलाढ्य मुघल सरदार जयसिंग व दिलेरखान जेव्हा स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याने प्रथम पुरंदर किल्ल्यावरच हल्ला चढवला. हा किल्ला लढवताना शूर सेनानी मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले व नाईलाजाने महाराजांना मुघलांसोबत तह करावा लागला ज्यास पुरंदरचा तह या नावानेच ओळखले जाते.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुरंदर मुघलांच्या ताब्यात गेला व मुघलांनी त्याचे नाव अजमगढ असे ठेवले. शाहू महाराजांच्या काळात शंकराजी नारायण यांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकला यानंतर तो किल्ला पेशव्यांकडे देण्यात आला. पेशव्यांचा तळ अनेक दिवस पुरंदरावर होता. अनेक वर्षांनी नारायणराव पेशवे यांचे पुत्र सवाई माधवराव पेशवे यांचा जन्म सुद्धा पुरंदर किल्ल्यावरच झाला.

१८१८ साली जसे इतर गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेले तसाच पुरंदर सुद्धा गेला. ब्रिटिशांनी पुरंदर हे त्यांच्या सैनिकी तळाचे ठिकाण बनवले. आजही तेथे सैनिकांचा तळ असून तो भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत मात्र उत्तरेकडील वाट मुख्य आहे. पायथ्याशी पानवडी नावाचे गाव आहे तेथून वर जाण्यास मार्ग आहे या वाटेने आपण सरदारवाजा चढून किल्ल्याच्या माचीत येतो. येथे राजाळे आणि पद्मावती असे दोन तलाव आहेत.

याच ठिकाणी काही वाडे व पुरंदरेश्वर आणि रामेश्वर ही जुनी मंदिरे आहेत व मुरारबाजी देशपांडे यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा आहे. पुरंदर किल्ला हा लांबीस अतिशय असून किल्ल्यास एकूण तीन शिखरे आहेत ज्यांना खंदकडा, राजगादी व केदारेश्वर अशी नावे आहेत. केदारेश्वर शिखरावर केदारेश्वराचे छोटेसे मंदिर आहे. केदारेश्वर शिखरावरून खूप सुंदर नजारा दृष्टीपथात येतो सिंहगड, तोरणा, राजगड, रोहिडा हे किल्ले सुद्धा स्पष्ट दिसतात. 

पुरंदर किल्ल्याचे जुळे भावंडं म्हणजे वज्रगड किल्ला. पुरंदर जसा इंद्र तसा वज्रगड हे त्याने हाती घेतलेले वज्र नावाचे आयुध. हा किल्ला पुरंदर किल्ल्याचाच एक भाग असून एक दुर्ग म्हणून याची स्वतंत्र ओळख आहे. माचीवरून पूर्वेस सरळ चालत गेल्यास वज्रगड पाहता येतो. वज्रगडाची उंची समुद्रसपाटीपासून १३०० मीटर आहे. गडास गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे. किल्ल्यास दोन माच्या असून माच्यांना व बालेकिल्ल्यास बुरुज व तटबंदी करण्यात आली आहे. पूर्वेकडील माचीवर पाण्याच्या दोन टाक्या आहेत.

आता किल्ल्यावर भारतीय लष्कराने पक्की सडक बांधली आहे व तेथून त्यांची वाहने कायम ये जा करत असतात मात्र या रस्त्याचा वापर करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक तसेच किल्ल्यावर राहताही येत नाही. किल्ल्यावर सैनिकांची वसतिगृहे, अधिकारी लोकांची घरे, कार्यालये व कवायतीच्या जागाही पुष्कळ आहेत. येथे असलेले इंग्रजकालीन चर्च सुद्धा पाहण्यासारखे आहे.