पद्मदुर्ग उर्फ कांसा किल्ला
सिद्दीवर जरब बसवण्यासाठी १६६३ साली महाराजांनी राजपुरी खाडी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते त्याच मुखावर एका कांसा नावाच्या प्रचंड खडकावर पद्मदुर्ग हा किल्ला बांधला.

१६५७ साली शिवाजी महाराजांनी आदिलशाहच्या ताब्यातील उत्तर कोकण हा प्रांत स्वराज्यात घेतला यानंतर त्यांनी मराठ्यांचे आरमार स्थापन करण्याची तयारी सुरु केली. कोकणात विविध ठिकाणी गुराब व गलबते तयार करण्याचे कारखाने सुरु केले. आरमारकरी लोक समुद्रात फिरून गनिमांवर जरब स्थापन करू लागले. ही बाब शत्रू राष्ट्रांच्या नजरेत आली व त्यांचे धाबे दणाणले.
१६५९ मध्ये अली आदिलशहाने एक फर्मान काढले की शिवाजी महाराजांनी निजामशाही कोकणातील (उत्तर कोकण) मुलुख बळकावून कित्येक किल्ले ताब्यात घेतले आहेत. यासाठी अफजलखान यास त्यांचे पारिपत्य करण्यास पाठवीत आहोत.
पुढे अफजलखानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला आणि आदिलशाही हादरली. पोर्तुगीजांपर्यंत ही बातमी पोहोचली. ते तर इंग्रजांप्रमाणेच जलचर असल्याने समुद्रावर शिवाजी महाराजांचे वाढते राज्य पाहून त्यांना सुद्धा आपल्या अस्तित्वाची काळजी वाटू लागली.
एकदा तर गोव्याच्या व्हॉइसरॉयने थेट पोर्तुगालच्या बादशाहालाच पत्र लिहून कळवले की, शिवाजी या शहाजीच्या मुलाने वसई व चौलकडील प्रदेश काबीज केला असून तो बलिष्ठ झाला आहे. त्याने काही लढाऊ गलबतेही भिवंडी, कल्याण, पनवेल या वसई तालुक्यातील बंदरांमध्ये बांधली आहेत. त्यामुळे आम्हास खबरदारीने राहणे भाग झाले आहे. ही गलबते समुद्रात फिरकू न द्यावीत म्हणून आम्ही आमच्या कॅप्टनला आज्ञा केली आहे की त्याने ही गलबते बंदरातून बाहेर येऊच देऊ नयेत.
सिद्दीवर जरब बसवण्यासाठी १६६३ साली महाराजांनी राजपुरी खाडी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते त्याच मुखावर एका कांसा नावाच्या प्रचंड खडकावर पद्मदुर्ग हा किल्ला बांधला. हा किल्ला जंजिऱ्याच्या उत्तरेस अदमासे २ मैलांवर आहे. त्याकाळी आरमाराची जबाबदारी दौलतखान व दर्यासारंग या दोघांकडे होती. एका पत्रात शिवाजी महाराज हा किल्ला बांधण्यामागचा उद्देश स्पष्ट करतात, ते म्हणतात की..
पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे
महाराजांनी कांसा किल्ला बांधल्यावर त्याचे पद्मदुर्ग असे नामकरण केले कारण हा किल्ला जणू पाण्यातून उगवलेल्या कमळासारखाच होता. पद्मदुर्गाच्या अगदी समोर मुरुड शहर आहे. मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावरून समोर पहिले असता पद्मदुर्ग किल्ला अगदी स्पष्ट दिसून येतो. पद्मदुर्गास एक दरवाजा व अदमासे आठ बुरुज आहेत. किल्ल्यात अनेक तोफा व तोफगोळे सुद्धा पाहावयास मिळतात. किल्ल्याचे दोन वेगवेगळे भाग आहेत त्यापैकी मोठ्या भागात एक मोठा तलाव आहे व या तलावाचेही एक मोठा व दोन छोटे असे तीन भाग करण्यात आले आहेत. भर खऱ्या समुद्रात असूनही किल्ल्यातील या तलावातील पाणी कायम गोड असते.
मुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवीचे मूळ स्थान पूर्वी पद्मदुर्ग किल्ल्यात होते असे म्हणतात. कोटात अर्थात किल्ल्यात राहणारी देवी म्हणून तिचे नाव कोटेश्वरी असे आहे मात्र कालांतराने तिचे मुरुड शहरात स्थलांतर झाले. कोटेश्वरी देवी ही परिसरातील अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे.
जंजिरा किल्ल्याएवढाच पद्मदुर्ग किल्ला महत्वपूर्ण असला तरी जंजिऱ्याच्या तुलनेत पद्मदुर्गास भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. याशिवाय किल्ला पाहण्यास तटरक्षक दलाचीही परवानगी घ्यावी लागते. मुरुड मधील काही जलक्रीडा सेवा देणारी लोक मागणी केल्यास स्पीडबोटीतून किल्ल्याचे बाहेरून अथवा आतून दर्शन घडवून आणू शकतात. जर पद्मदुर्ग किल्ल्यास पर्यटकांना भेट देण्याची व्यवस्था पर्यटन विभागाने केली तर मुरुड जंजिरा तालुक्याच्या पर्यटन विकासामध्ये निश्चितच भर पडेल.