किल्ले उंदेरी उर्फ जयदुर्ग
कोकणातील जलदुर्गांच्या शृंखलेतील एक महत्वाचा जलदुर्ग म्हणजे उंदेरी. उंदेरीस जयदुर्ग असेही नाव आहे.
उंदेरी हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यात आहे. खांदेरी व उंदेरी ही जलदुर्गांची जोडी प्रसिद्ध आहे व यातील खांदेरीच्या पूर्व दिशेस उंदेरी हा किल्ला फक्त १.५ किलोमीटर अंतरावर आहे. १६७४ साली इतिहास लेखक फ्रायर या किल्ल्याचा उल्लेख Hunarey असा करतो तर ब्रिटिश या किल्ल्याचा उल्लेख kenry असाही करत.
१६७८ च्या दरम्यान शिवाजी महाराजांच्या आदेशाने नौदलप्रमुख दर्यासारंग, मायनाईक भंडारी आणि दौलतखान यांना खांदेरी हे बेट ताब्यात घेतले. खांदेरी बेट मराठ्यांच्या ताब्यात आल्याने मुंबईवर मराठ्यांचा वचक निर्माण होऊ शकेल या भीतीने ते काम उध्वस्त करण्यासाठी ब्रिटिशांनी केग्वीन यास खांदेरीची नाकेबंदी करण्यास धाडले याचवेळी ब्रिटिशांच्या मदतीस गेलेल्या सिद्दी कासिमने खांदेरी शेजारील उंदेरी हे बेट ताब्यात घेऊन तिथे तटबंदी उभारली.
मराठ्यांच्या ताब्यात खांदेरी तर सिद्दीच्या ताब्यात उंदेरी आल्याने खांदेरी व उंदेरी हे दोन किल्ले तत्कालीन शत्रूराष्ट्रांसारखी झाली होती, एक किल्ला सिद्दीकडे तर एक किल्ला मराठ्यांकडे असल्याने उत्तर कोकणच्या किनारपट्टीवर व विशेषतः मुंबईवर वचक ठेवण्यासाठी या परिसरात प्रचंड चकमकी होत असत..
१६८० मध्ये संभाजी महाराजांनी उंदेरीवर २०० सशस्त्र सैनिक उतरवण्याचा प्रयत्न केला होता. १७३२ साली सेखोजी आंग्रे यांनी सिद्दीच्या ताब्यातून उंदेरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र सिद्दीने तो तात्पुरता ब्रिटिशांच्या ताब्यात दिला. शाहू महाराजांना ही बातमी समजल्यावर त्यांनी सेखोजीना उंदेरी किल्ला इंग्रजांकडून विकत घेण्याची बोलणी करण्यास सांगितले.
१७३६ साली अलिबाग तालुक्यातील कामार्ले येथे चिमाजी अप्पा व मानाजी आंग्रे यांची सिद्दी सात सोबत चकमक होऊन त्यात उंदेरीचा सुभेदार सिद्दी याकूब मारला गेला. १७५४ मध्ये खांदेरीमधून मराठ्यांचे एक गलबत उंदेरीच्या दिशेने गेल्याने उंदेरीवरून सिद्दीने मराठ्यांवर हल्ला केला. १७५८ साली तुकोजी आंग्रे यांनी रामाजी महादेव व महादजी रघुनाथ यांना सोबत घेऊन रेवदंडा येथून आरमार घेऊन उंदेरीस वेढा घातला व थळ येथे मोर्चे लावले.
सरखेल मानाजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर १७५९ साली सिद्दीने थेट कुलाब्यावर हल्ला करून तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला यावेळी नानासाहेब पेशवे आणि राघोजी आंग्रे यांनी उंदेरीस वेढा घातला आणि १७६० साली सुभेदार नारो त्रिंबक यांनी उंदेरी किल्ला ताब्यात घेतला यानंतर १८१८ सालापर्यंत उंदेरी किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात होता.
उंदेरी किल्याच्या चारही बाजूना मजबूत तटबंदी असून एक मुख्य व दुसरा उपदरवाजा आहे. किल्ल्यावर अनेक तोफा आजही अस्तित्वात असून त्यांची संख्या अदमासे १५ असावी. किल्ल्यावर पाण्याची तीन टाकी आहेत मात्र ती पूर्णपणे नादुरुस्त असल्यामुळे किल्ल्यात पिण्याचे पाणी बिलकुल नाही. याशिवाय किल्ल्यात वाड्याचे भग्नावशेष आहेत जेथे किल्ल्याचा सुभेदार राहत असावा.
उंदेरी हा किल्ला सध्या मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या ताब्यात असल्याने या किल्ल्यास त्यांच्या पूर्वपरवानगीनेच भेट देता येते. उंदेरीस जाण्याचा मुख्य मार्ग हा थळमार्गे. थळपासून उंदेरीचे अंतर १४०० मीटर आहे. येथून छोट्या होडीत बसून उंदेरी किल्ल्यास जाता येते व किल्ल्याच्या ईशान्य दिशेस बोट लावून किल्ल्यात उतरता येऊ शकते.