पुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी

पुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या वैभवाचा अत्युच्च काळ मानला पाहिजे.

पुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

पुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या वैभवाचा अत्युच्च काळ मानला पाहिजे कारण पुरीने अर्थात मुंबईने त्याकाळात कोकणच्या राजधानीचे स्थान भुषविले व एवढेच नव्हे तर त्याकाळी उत्तर कोकणासही पुरी-कोकण अशी संज्ञा प्राप्त झाली.

कालांतराने मौऱ्यांच्या पतनानंतरही उत्तर कोकणाची ओळख ही थेट शिलाहार साम्राज्याचा अंत होईपर्यंत पुरी कोकण अशीच राहिली व शिलाहारांनी आपली राजधानी साष्टी बेटावर वसवुनही त्यांनी या प्रांताची ओळख पुरी प्रमुख कोकण अर्थात पुरीअंतर्गत येणारे कोकण अशीच राखली.

मात्र शिलाहार काळातही पुरीचे राजधानी म्हणुन महत्त्व कायम होते का या प्रश्नाचा विचार आपण येथे करु. डॉ. खोबरेकर आपल्या कोकणचा राजकिय इतिहास या पुस्तकात कोकणचे मौर्य व चालुक्य द्वितिय पुलकेशी यांच्यात झालेल्या लढाईच्या वर्णनासंदर्भात असे म्हणतात की पुलकेशीने सुकेतुवर्मन मौर्याचा पराभव करुन कोकण आपल्या ताब्यात घेतल्यानंतर पुरीचा जो दर्जा होता तो जो गेला तो परत कधीही मिळाला नाही.

खोबरेकरांचे विधान काही अंशी खरेच आहे कारण त्यांच्या मते हि मौर्यसत्ता स्वतंत्रपणे कोकणावर राज्य करत असुन त्यांची राजधानी सुद्धा कोकणातच होती. मौर्यांनंतर जि राज्ये कोकणावर नांदली त्यांपैकी काहींच्या राजधान्या कोकणातच असल्या तरी पुरीचा उल्लेख मुख्य कटक अथवा राजधानीचे ठिकाण म्हणुन नंतर सापडत नाही कारण सुकेतुवर्मनच्या दुर्दैवी अंतानंतर पुढील राजसत्तांना हि द्विपप्राय राजधानी असुरक्षित वाटू लागली असावी मात्र मौर्यांनी पुरीस राजधानी केल्यापासुन उत्तर कोकणास पुरी कोकण म्हणुन उल्लेखण्याचा जो प्रघात होता तो मात्र अगदी शिलाहारांपर्यंत कायम राहिल्याचे दिसुन येते.  

इसवी सनाच्या आठव्या शतकात चालुक्यांचे मांडलिक हरिश्चंद्रिय भोगशक्ती हे पुरीकोकणातील १४००० गावांचे स्वामी असल्याचा उल्लेख असलेले दोन ताम्रपट नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी या ठिकाणी सापडले. या ताम्रपटात पुरीचा उल्लेख आला असला तरी या काळात प्रमुख प्रशासकिय स्थळ हे पुरीच होते याचा स्पष्ट उल्लेख कुठेही आला नाही मात्र या राज्याची पारंपारिक ओळख म्हणुन पुरीकोंकण असा उल्लेख तेथील जनतेस व प्रशासनास पुर्वीपासुन अंगवळणी पडलेला असल्याने हिच ओळख पुढेही कायम करण्यात आली असावी.

शिलाहारांनी ही पुढील काळात हाच पायंडा चालू ठेवल्याचे दिसून येते. त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम अशी साष्टी बेटाच्या पुर्वेच्या सिमेवरील जागा आपल्या राजधानीसाठी निवडून तिथे आपले ठाणे (कटक) दिले व हेच स्थळ पुढे स्थानक या नावाने प्रख्यात झाले. मात्र शिलाहारांनी तब्बल ३०० हून अधिक वर्षे उत्तर कोकणावर राज्य करुनही त्यांनी पुरीकोकण ही ओळख न बदलता पुरीलाच उत्तर कोकणाचे मुख्य स्थळ मानुन आपल्या लेखांत पुरीप्रमुखकोकण अथवा पुरीप्रभुतीकोकण असे उल्लेख केले आहेत.

शिलाहारांच्या लेखांत वारंवार येणारे उल्लेख पाहता पुरी हिच शिलाहारांची मुख्य राजधानी तेव्हाही असून स्थानक अथवा ठाणे हि दुय्यम राजधानी असावी असा समज होण्याची शक्यता आहे.   या समजावर मिराशी यांनी मांडलेले मत संयुक्तिक आहे. ते म्हणतात की, जरी शिलाहारांच्या लेखांत पुरीप्रमुख कोकण अथवा पुरीप्रभुती कोकण असे उल्लेख अनेकदा आला असला तरी राजधानीचे स्थळ हे पुरीच होते असा उल्लेख कोणत्याही लेखात आलेला नाही याउलट शिलाहारांच्या तिसऱ्या पिढीतील राजा पुल्लशक्ती याची राजधानी सुद्धा स्थानक उर्फ ठाणे हिच होती.

यावरुन हा निष्कर्ष काढता येऊ शकतो की, सुकेतुवर्मन मौर्याच्या अंतानंतर पुरीची उत्तर कोकणाचे प्रमुख स्थान हि ओळख कायम राहिली असली तरी प्रशासकिय व्यवहारांची ठिकाणे वेगळीच होती. याबाबत रायगड जिल्ह्याचेच उदाहरण घेता येईल पुर्वी या परिसराचे सर्व कामकाज रायगड किल्ल्यावरुन चालत असे व राजधानी सुद्धा हिच होती मात्र आधुनिक काळात प्रशासकिय कारभार हे अलिबाग येथून पाहिला जातो पण जिल्ह्याचे नाव आजही रायगड हेच आहे कारण हिच या जिल्ह्याची जुनी ओळख आहे. याशिवाय याच जिल्ह्याची कुलाबा व रायगड अशी दोन नामांतरे प्रसिद्ध आहेत.