कोकणचे प्राचीन व्यापारी महत्व

कोकणातील व्यापारी मार्ग अथवा व्यापारी केंद्रांची माहिती काढावयाला गेल्यास आपण इ. स. पूर्व 225 पर्यंतच्या कालखंडामध्ये जाऊन पोहोचतो.

कोकणचे प्राचीन व्यापारी महत्व
कोकणचे प्राचीन व्यापारी महत्व

इ.स. पूर्व 300 साली चाणक्याच्या कौटील्य अर्थशास्त्र नामक ग्रंथात उत्तम नगरे कशी असावीत याचे वर्णन केले आहे.  कौटील्याच्या मते बाजार पेठेची गावे अशा ठीकाणी वसवावीत जेथे जलमार्ग व स्थलमार्ग दोन्ही येऊन मिळतात कारण तेव्हा जलमार्गही अतिशय महत्त्वाचा व्यापारी मार्ग समजला जात असे.  

अशा गावांमध्ये वारिपथ बांधावेत कारण नदीवर ठीकठीकाणी उतार व वाळूचा किनारा बघून नावांसाठी धक्के बांधून व्यापारी माल उतरवणे व यासाठी योग्य त्या सुविधा निर्माण करणे म्हणजेच जलपथ बांधणे असे म्हटले आहे. त्याकाळी नदीवर निरनिराळ्या ठिकाणी धक्के बांधून मालाची चढ-उतार करीत असत.  

समुद्रावर तथा नदीमुखापाशी बंदर बांधण्याची कला भारतीयांना फार पूर्वीपासून म्हणजे कमीत कमी इ. स. पूर्व 1500 पासून माहीत होती.  असे गुजराथ मधील लोथल येथील उत्खननावरुन उजेडात आले होते.

याकाळी कोकणात नागोठणे, महाड, गोरेगाव, राजपुरी या पुरातन व्यापारी पेठा होत्या. सह्राद्री पर्वतामधून कोकणात उतरणार्‍या कोंडाणे घाट, हिंदोळ घाट, मिरघाट, बोरघाट, कुरवंडा घाट, आंबेनळी, पायमोडी (मोराडी) घाट, निसणी (सव), कोराई (काठी), अनघाई, वारसदार, वाघजाई, सवाष्णी, भोरप्या, नांणदांड, नाळेची वाट, गाढवलोट, सावळा, लेंड आणि ताम्हाणी यासारख्या घाटातून विविध बंदरांत आयात केलेला माल देशभर पाठविण्यात येत असे.

येथून येणाया व्यापारी व इतर लोकांच्या वस्तीसाठी कोकण मार्गे देशावर जाणाया याच घाटरस्त्यांवर कार्ले, भाजे, कुडे, घारापुरी, नेणवली (खंडसाबळे), ठाणाळे इत्यादी लेण्या वेगवेगळ्या राजवटींच्या काळामध्ये कोरून काढण्यात आल्या. वरील सर्व लेण्यांवरून असे दिसून येते की इ. स. पूर्व 100 ते इ. स. 300 पर्यंत बोरघाटामार्गे रहदारीचा मुख्य मार्ग होता.

नेर्न या इतिहासकाराच्या मते प्राचीन काळी सह्राद्रीच्या घाटांमधून चालणाया व्यापाराची उलाढाल चौल मार्गे चालत असे आणि चौल हे नागोठण्यास समांतर आहे. चौलवरून रेवदंडा खाडीमार्गे सुकेळी खिंडीतून व्यापारी मार्ग जात असावा. त्यामुळे तत्कालिन प्रमुख मार्ग बोरघाट ते पनवेल, पनवेल ते नागोठणे, नागोठणे ते अष्टमी आणि अष्टमी ते चौल हा असावा.  

इ. स. सनाच्या दुसया शतकात भारतात आलेल्या भूगोलतज्ञ टोलेमीने नागोठण्याचा उल्लेख नानागुना (नागोठणा) आणि नागरोरी (नागपुरी) असा केला आहे. पेरिल्समध्ये जे वर्णन करण्यात आले आहे त्यानुसार इ. स. 70 ते 80 च्या सुमारास इजिप्तबरोबर धान्य, तीळ, साखर, तांदुळ, आले, कापड, खाद्यतेले इत्यादी वस्तूंचा व्यापार चालत असे. याशिवाय विविध प्रकारची मद्ये, कापड, तांबे-पितळ, जस्ताची भांडी, सोन्या चांदीची नाणी, शिंपल्यांचे दागिने, चांदीचे पेले, थाळ्या यांची आयात निर्यात होत असे.

मौर्य काळाशिवाय सातवाहन, चालुक्य, शिलाहार, मराठे, गुजरातचे सुलतान, आदिलशाही, निजामशाही इत्यादी काळातही कोकणचे व्यापारी महत्व कायम होते. शिलाहार काळातील अनंतदेव राजाचा ताम्रपट खारेपाटण येथे सापडला असून त्याने आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे महाप्रधान दुर्ग श्रेष्ठींचे पुत्र भवन श्रेष्ठी आणि त्यांचे भाऊ धर्मश्रेष्ठी यांच्या मालवाहू जहाजांस नागोठणे, चौल व नालासोपारा या तीन बंदरामध्ये करमाफी दिल्याचा उल्लेख आहे. ही करमाफी फक्त त्यांनाच नव्हे तर त्यांचे पुत्र आणि नातू श्रेष्ठी पनम, श्रेष्ठी कुलकल, श्रेष्ठी मलय आणि इतर लोकांनासुद्धा लागू होती.

याशिवाय गुजरात सुलतान, निजामशाही काळात चौलमार्गे कोकणातून देशावर जाणाया मुख्य व्यापारी रस्त्यावर वाहतूक सुलभ होण्याकरिता 1580 साली चौलच्या काजी अलाऊद्दीनने अंबा नदीवरील पूलसुद्धा बांधला होता.

इ. स. 1881 पर्यंत अंबा नदीवरील नागोठणे ते धरमतर, करंजा, नागोठणे, रोहा, राजपुरी, बाणकोट, आपटे, साखर, मांदाड, घारापुरी, बोरखार, रेवदंडा, मुरुड, श्रीवर्धन इत्यादी खाड्यांवर प्राचीन काळापासून तरसेवा होती. पूर्वी अंबा नदीचा धरमतरपासून मुखापर्यंत 16 कि. मी. प्रवाह जलवाहतुकीस उपयोगी पडायचा. धरमतरच्या दक्षिणेकडील प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने विशेष सोयीचा नव्हता. भरतीच्या वेळी आवटीपर्यंत आणि उधाणाच्या भरतीच्या वेळी नागोठण्यापर्यंत लाँचेस जायच्या. ऑक्टोबर ते मे पर्यंत नागोठण्यापर्यंत बरीच जलवाहतूक चालायची. याकाळी या नदीवर एकूण पाच तरसेवा उपलब्ध होत्या. सर्वात जवळ असलेली तरसेवा नागोठण्यापासून 5 कि. मी. अंतरावर बेणसे गावात होती, दुसरी 8 कि. मी. वर गांधे गावात, तिसरी 10 कि. मी. अंतरावरील आवेटी जवळ, चौथी धरमतरच्या दक्षिणेस 7 कि. मी. वर खारजुई आणि पाचवी मुखाच्या 5 कि. मी. दक्षिणेस माणकुळे गावाजवळ होती. धरमतर खाडीवर पूल बांधल्याने आणि नदीत गाळ साचल्याने तरसेवा बंद पडली.  

इ. स. 1864 साली नागोठण्याहून धरमतरच्या पूर्वेस 3 कि. मी. ला संपणारा 21 कि. मी. लांबीचा रस्ता जात होता जो आधी खुष्कीचा मार्ग म्हणून प्रचलित होता. त्यावर नंतर अनेक मोया व इतर मातीकाम आणि दोन मोठे पूल बांधण्यात आले होते. इ. स. 1881 पर्यंत नागोठणे-धरमतर रस्त्याचे अपुरे काम पूर्ण करण्यात आले. नागोठण्याहून कोलाड, माणगाव, महाड, पोलादपूरहून पुढे महाबळेश्वरच्या पायथ्यापर्यंत जाणारा 90 कि. मी. लांबीचा मुख्य मार्ग बांधण्यात आला जो सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो.

नागोठणे ते माणगाव दरम्यान हा रस्ता सात ठिकाणी नद्या नाले ओलांडत असे. पावसाळ्यात तो बैलगाडीच्या वाहतुकीस योग्य नसल्याने डोक्यावरून किंवा घोड्यावरून वाहतूक होत असे. अंबा नदीवर पाटणसई येथे तरसेवा होती. धरमतर-नागोठणे-माणगाव-महाड-पोलादपूर-महाबळेश्वर या रस्त्यास अनेक छोटे मार्ग मिळत असत. 1880-81 साली नागोठणे-महाबळेश्वर मार्गावरील नागोठणे ते पश्चिमेस तळे आणि तळे ते मांदाड खाडीपर्यंत मालाठेपर्यंत रस्ते बांधण्यात आल्याने माणगाव भागातील कृषीमाल समुद्रापर्यंत नेण्याची सोय झाली.