हरिहर - विजयनगर साम्राज्याचा मूळ संस्थापक
हरिहराने आपल्या कारकिर्दीची सुरुवात होयसळ राजा तृतीय बल्लाळ याच्या कार्यकाळात केली व होयसळ राज्यात त्याने मंत्रिपद व सरदारपद भूषवले.
विजयनगर साम्राज्याचा संस्थापक म्हणून ज्याचे नाव घेतले जाते तो प्रख्यात राजा म्हणजे हरिहर. हरिहर यादववंशातील असून त्याच्या वडिलांचे नाव संगम असे होते त्यामुळे यास हरिहर संगम या नावाने सुद्धा ओळखले जाते.
हरिहराने आपल्या कारकिर्दीची सुरुवात होयसळ राजा तृतीय बल्लाळ याच्या कार्यकाळात केली व होयसळ राज्यात त्याने मंत्रिपद व सरदारपद भूषवले. याच काळात दक्षिणेत विस्तार होत असलेल्या मुस्लिम राज्यांशी त्याचा परिचय आला.
कालांतराने हरिहराने अनागोंदी येथे नवे राज्य निर्माण केले आणि विद्यारण्य नामक एका विद्वानाशी हरिहर याचा परिचय होऊन त्यास धार्मिक व राजकीय दृष्टी नव्याने प्राप्त झाली.
हरिहराने विद्यारण्यांना आपले गुरु मानले व कालांतराने त्याने तुंगभद्रा नदीच्या दक्षिण तीरावर एक शहर वसवले व त्यास आपल्या गुरुंवरून विद्यानगर असे नाव दिले.
१३४० साली मुहम्मद तुघलकाच्या दक्षिणेतील एका सरदारास हरिहराने मदत केल्याचा उल्लेख आढळतो मात्र उत्तरेतील मुस्लिम राज्यांच्या विरोधात कालांतराने दक्षिणेतील हिंदू राज्यांनी एकीची वज्रमूठ उगारली आणि या युतीअंतर्गत बल्लाळ होयसळाने रामेश्वर पर्यंतचा प्रांत जिंकून तेथे विजयाचा जयस्तंभ उभारला.
हरिहर याने सुद्धा स्वतंत्रपणे कार्य सुरु करून मोठा मुलुख काबीज केला. या काळात म्हणजे १३४२ साली कोप्पम येथे झालेल्या एका लढाईत मदुरेचा सुलतान घियासुद्दीन दामघानी याच्या विरोधात लढताना बल्लाळ होयसळचा मृत्यू झाला.
यानंतर हरिहर याने बल्लाळ होयसळच्या राज्यातील मोठा मुलुख ताब्यात घेतला आणि १३४६ साली होयसळांची राजधानी जिंकून होयसळांना पूर्णतः नामशेष करून हरिहराने स्वतःच्या साम्राज्याचा अमल सुरु केला. होयसळांचे राज्य जिंकल्यावर हरिहराने सुद्धा जयोत्सव साजरा केला आणि शृंगेरी मठास भेट देऊन मोठा दानधर्म केला.
१३४७ साली दक्षिणेतील मुस्लिम सरदारांनी दिल्लीच्या बादशाहाविरोधात बंड उभारून अल्लाउद्दीन हसन गंगू बहामनी याच्या नेतृत्वाखाली गुलबर्गा येथे स्वतंत्र राज्य उभारले आणि हरिहराने जिंकलेल्या राज्यावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली एवढेच नव्हे तर १३५१ साली बहामनी राज्याने भीमा नदी ओलांडून हरिहराच्या राज्यातील सागर नावाचा प्रांत बळकावला.
याचवेळी बहामनी राज्याकडून अनेक सरदार मोठे सैन्य घेऊन हरिहरावर चालून आल्याने सर्वांसोबत एकत्रित लढा देणे हरिहरास अशक्य झाल्याने त्याला बहामनी राज्यास कृष्णा नदीच्या उत्तरेकडील मुलुख आणि मोठी खंडणी देऊन तह करणे भाग पडले.
हरिहरास कंप, बुक्क, मारप आणि मूद्दप असे एकूण चार भाऊ होते व हे चारही भाऊ हरिहरच्या आज्ञेत असत व हरिहर सुद्धा त्यांना मायेने वागवीत असे. आपल्या चारही भावांना त्याने विविध भागांचे प्रांताधिकारी म्हणून नेमले होते आणि युवराजपद सुद्धा बहाल केले होते. मारप कडे चंद्रगुत्ती, बुक्क कडे होसपट्टण, कंप कडे नेल्लुर आणि कडाप्पा आणि मुद्दप कडे काही भाग हरिहराने सोपवला होता.
हरिहारने आपल्या राजधानीचे ठिकाण म्हणून अनागोंदीची निवड केली होती. १३५५ साली हरिहराचा मृत्यू झाला मात्र त्याच्या चार भावांमध्ये बुक्क हा विशेष कर्तबगार निघाल्याने आपल्या मरणापूर्वी त्याने आपले राज्य बुक्क याच्याकडे सोपवले व बुक्काने विजयनगरच्या साम्राज्याचा आणखी उत्कर्ष केला.