रायगडावरील लोहस्तंभाचे रहस्य

रायगड किल्ल्यावरील बाजारपेठेच्या भिंतीच्या थोडे पुढे गेल्यावर शेकडो वर्षे ऊन पावसाचा मारा झेलत आजही उभा असलेला लोहस्तंभ आपल्या दृष्टीस पडतो.

रायगडावरील लोहस्तंभाचे रहस्य

दुर्गेश्वर रायगड ही स्वराज्याची पहिली अधिकृत राजधानी. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून गडाची निवड केल्यावर गडावर राजधानीच्या ठिकाणास योग्य अशा अनेक वास्तूंचे निर्माणकार्य संपन्न झाले. रायगडावरील अगणित अशा ऐतिहासिक स्थळांमध्ये एक विशेष स्थळ म्हणजे रायगडावरील लोहस्तंभ.

रायगड किल्ल्यावरील बाजारपेठेच्या भिंतीच्या थोडे पुढे गेल्यावर शेकडो वर्षे ऊन पावसाचा मारा झेलत आजही उभा असलेला हा लोहस्तंभ आपल्या दृष्टीस पडतो. या ठिकाणी काही घरांच्या चौथऱ्याचे अवशेषही दृष्टीस पडतात. रायगडावरील सर्वच वस्तूंची खानेसुमारी करण्यात आली असून प्रत्येक वस्तूची व वस्तूची ओळख लिखित स्वरूपात उपलब्ध आहे मात्र या लोहस्तंभाविषयी ठाम निष्कर्ष तूर्तास तरी निघालेला नाही.

हा लोहस्तंभ अदमासे दोन मीटर उंचीचा असून त्याच्या सर्वात वर एक लोखंडी कडी आहे. गेली अनेक वर्षे उन्हाचा व पावसाचा मारा अंगावर झेलत उभा असल्याने हा लोहस्तंभ आता पूर्णपणे गंजला आहे.

रायगडावरील या लोहस्तंभाचे निमित्त काय याचा निष्कर्ष अनेक इतिहास अभ्यासकांनी आपापल्या परीने काढण्याचा प्रयत्न केला व यातून अनेक निष्कर्ष निर्माण झाले व ते काय होते याचा आपण विचार करू. 

रायगडावरील या लोहस्तंभाचा स्थानिक व सर्वात प्रचलित निष्कर्ष म्हणजे यास छत्रपती संभाजी महाराजांचा मल्लखांब म्हटले जाते. छत्रपती संभाजी महाराज हे उत्तम व्यायामपटू असून लहानपणापासून त्यांना शरीरसौष्ठव, शास्त्र व शस्त्र इत्यादी कलांचा अभ्यास होता याचे उल्लेख अस्सल साधनांत मिळतात त्यामुळे मल्लखांब ही तत्कालीन योध्यांची महत्वाची अभ्यास साधना असल्याने हा स्तंभ खास संभाजी महाराजांसाठी बांधला गेला असावा असा प्रचलित निष्कर्ष आहे.

दुसरा निष्कर्ष म्हणजे हा एक वध स्तंभ असावा ज्याचा वापर आरोपींना शिक्षा देण्यासाठी होत असावा. 

तिसरा निष्कर्ष म्हणजे रायगडावरील हत्तीस बांधण्यासाठी हा स्तंभ निर्माण करण्यात आला असावा व लोहस्तंभावर असलेल्या कड्यास साखळदंड लावून त्याद्वारे किल्ल्यावरील हत्तीस तेथे ठेवण्यात येत असावे.

काहींच्या मते या स्तंभाचा वापर त्याकाळातील घड्याळ म्हणून करण्यात येत असावा. त्याकाळी मोकळ्या मैदानात एक स्तंभ बसवून सूर्याच्या भ्रमणावरून स्तंभाच्या पडणाऱ्या सावलीनुसार वेळ ओळखण्याच्या पद्धतीस सूर्यघटी असे म्हणण्यात येत असे.

विशेष म्हणजे या लोहस्तंभावर एक कोरीव लेख होता व पूर्वी याचे वाचन करण्यात आले होते मात्र तूर्तास लोहस्तंभ पूर्णपणे गंजला असल्याने लेख पूर्णतः नष्ट झाला आहे मात्र गो. नि. दांडेकर यांच्या दुर्गभ्रमणगाथा या पुस्तकात त्यांनी या स्तंभाविषयी जो निष्कर्ष मंडला आहे त्यानुसार हा स्तंभ एक विजय स्तंभ म्हणून बांधला गेला असावा.

या वेळी य स्तंभावरील अस्पष्ट अशा लेखाचे वाचनही त्यांनी केले होते त्यानुसार स्तंभावर असलेला लेख हा चार अस्पष्ट ओळींचा असून पहिल्या ओळीत श्री ---- वा दे, दुसऱ्या ओळीत हि रो -------  उ नी, तिसऱ्या ओळीत मी ------ मा र्न दी व ज व चौथ्या ओळीत ज स ल ब ड्या  अशी अक्षरे कोरलेली आहेत.

दुसऱ्या ओळीत लिहिलेल्या हि रो -------  उ नी या ओळींतील हि रो या शब्दांवरून हा स्तंभ रायगडाचे वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांनी बांधला असावा असा निष्कर्ष निघू शकतो मात्र दांडेकरांच्या मते चौथ्या ओळीत असलेल्या ज स ल ब ड्या या शब्दावरून हे कुणा रायगडावरील जुन्या पाळेगाराचे नाव असावे कारण रायगडाचा इतिहास यादवकाळापर्यंत मागे जातो व त्याकाळी रायगडास तणस व रासिवटा अशीही नावे होती त्यामुळे हा स्तंभ यादवकालीन असावा असाही निष्कर्ष दांडेकर मांडतात.

असे अनेक निष्कर्ष रायगडावरील या लोहस्तंभाच्या बाबतीत विचारात घेतले गेले असले तरी आजही हा स्तंभ रायगडावरील एक अज्ञात रहस्य असल्यासारखा आपले अस्तित्व कायम ठेवून आहे, भविष्यात यावर आणखी संशोधन होऊन रायगडावरील या लोहस्तंभाचे रहस्य उजेडात येईल अशी अपेक्षा करूया.