इर्शाळगड - एक इरसाल दुर्ग

इर्शाळगड हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ६०० मीटर आहे.

इर्शाळगड - एक इरसाल दुर्ग

महाराष्ट्राच्या दुर्गश्रुंखलेतील एक महत्वाचा किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड.

गडाच्या पायथ्याशी इर्शाळवाडी हे गाव असून तेथून गडाचा चढ सुरु होतो. गडाकडे येण्यापूर्वी गडाच्या दक्षिणेकडील नढाळ येथे यावे लागते व तेथून प्रथम इर्शाळवाडी गाठून मग गडावर जाता येते.

हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ६०० मीटर आहे.

गड चढत असताना पूर्वेकडील भव्य असे मोरबे धारण आणि आसमंतातील सह्याद्रीच्या शाखा पाहून डोळ्याचे पारणे फिटते.

या किल्ल्यास विशाळगड असे दुसरे नाव सुद्धा आहे आणि हा किल्ला ज्या डोंगरावर उभारण्यात आला आहे तो डोंगर विशाळ अथवा इर्शाळ या नावाने प्रसिद्ध आहे.  स्थानिक लोक या डोंगरास जिनखोड या नावाने ओळखतात.

इर्शाळगड हा किल्ला माथेरानच्या दक्षिणेस आहे व पूर्वी या ठिकाणी राहणारे युरोपियन लोक किल्ल्यास सॅडल हिल या नावाने ओळखत.   गडास ही नावे मिळण्याचे कारण म्हणजे किल्ल्याच्या दोन बाजूस दोन सुळके असून लांबून पाहता हा किल्ला एखाद्या अश्वासारखा दिसतो.

किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी खडक फोडून वाट तयार करण्यात आली आहे. किल्ल्याच्या माथ्याचा चढ थोडा अवघड असून कातळारोहण करून वर जावे लागते.

कड्यावर पिण्याच्या पाण्याची टाकी कोरलेली दिसून येतात. कडा चढताना अवघड ठिकाणी शिडी तसेच दोरखंडाचा आधार घेऊन वर जावे लागते.

वाटेत एका गुहेत गडाची देवता इर्शाळ देवीचे मंदिर दिसून येते व मंदिरात देवीची मूर्ती आणि बाजूस आणखी दोन लहान मूर्ती दिसून येतात.

या किल्ल्याचे  वैशिट्य म्हणजे या किल्ल्यास इतर किल्ल्यांसारखी तटबंदी नाही मात्र पाण्याची एकूण सहा कोरीव टाकी आणि चार निवासी गुहा या ठिकाणी आहेत त्यामुळे या किल्ल्याचा वापर टेहळणी साठी केला जात असावा.

किल्ल्यावर एका ठिकाणी हे नैसर्गिक नेढं सुद्धा दिसून येते. विशेष म्हणजे याचा आकार चौकोनी आहे. किल्ल्यावरून पूर्वेकडील मोरबे धरणाचे विहंगम दृश्य दिसून येते. याशिवाय पायथ्याशी असलेल्या गावाचे दर्शनही मनास सुखावणारे असते.

या ठिकाणी कड्यास खेटून एक वाट पुढे गेली आहे व या वाटेने पुढे गेल्यावर दोन तीन माणसे बसू शकतील एवढी मोकळी जागा दिसून येते. कड्याच्या एका अंगास पाण्याचे एक टाके दिसून येते. येथून खूप दूरवरील आसमंत दृष्टीस पडतो. तेव्हा आकाराने इरसाल असा हा इर्शाळगड री एकदातरी पाहायलाच हवा.