छत्रपती शिवाजी महाराज व छत्रसाल बुंदेला यांची ऐतिहासिक भेट
शिवकाळातील मध्य भारतातील एक तरुण राज्यकर्ता ज्याने नाईलाजास्तव मोगलांकडे चाकरी स्वीकारली मात्र शिवाजी महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊन त्याने प्रत्यक्ष महाराजांची भेट घेतली व त्यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन घेऊन आपल्या प्रांतास पारतंत्र्यातून मुक्त केले व तो तरुण म्हणजे महाराजा छत्रसाल बुंदेला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी साडे तीनशे वर्षांपूर्वी मोगल व आदिलशाही अशा बलाढ्य सत्तांना आव्हान देऊन स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या या कार्याची प्रेरणा आजही प्रत्येकजण घेतो मात्र आजच नव्हे तर शिवाजी महाराजांच्या काळातही त्यांच्या कार्याची प्रेरणा अनेकांनी घेतली व शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या स्वाभिमानाच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करून यश प्राप्त केले.
शिवकाळातील मध्य भारतातील एक तरुण राज्यकर्ता ज्याने नाईलाजास्तव मोगलांकडे चाकरी स्वीकारली मात्र शिवाजी महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊन त्याने प्रत्यक्ष महाराजांची भेट घेतली व त्यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन घेऊन आपल्या प्रांतास पारतंत्र्यातून मुक्त केले व तो तरुण म्हणजे महाराजा छत्रसाल बुंदेला.
भारतातील बुंदेलखंड हा एक वैशिट्यपूर्ण प्रदेश व तूर्तास त्याचे स्थान उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या राज्यांत आहे. याच बुंदेलखंडाच्या पूर्वेस महोबा नामक एक छोटे राज्य होते व या राज्यावर चंपतराय बुंदेला हा शासक राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव कालीकुमारी असे होते. चंपतरायास कालीकुमारी पासून झालेला चौथा पुत्र म्हणजे छत्रसाल. छत्रसाल यांचा जन्म १६५० साली झाला.
त्या काळात मोगल साम्राज्य वैभवाच्या शिखरावर होते व उत्तर भारतातील बहुतांश प्रदेश त्यांनी व्यापला होता. बुंदेलखंडातील अनेक राज्ये मोगलांच्या शरणी गेली मात्र स्वाभिमानी अशा चंपतरायाने मोगलांसमोर गुडघे टेकले नाहीत. शाहजहान हा बहुतांश राज्ये आपल्या ताब्यात घेण्याच्या मार्गास लागला असताना चंपतराय त्यास कायम विरोध करीत होता. पुढे औरंगजेबाने पित्याच्या विरोधात बंड उभारले व शहाजहान विरोधातील सर्व राज्ये आपल्यासोबत घेऊन त्याने शहाजहान ची मक्तेदारी संपवण्याचा चंग बांधला.
या बंडात झालेल्या शामूगढच्या युद्धात चंपतरायाने पराक्रम गाजवला यावेळी औरंगजेबाने त्यास त्याच्या राज्याचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे वचन दिले व १२ हजार स्वरांची मनसबदारी दिली मात्र चंपतरायास मनसबदारी मान्य नव्हती तर त्यास हवे होते राज्याचे स्वातंत्र्य.
मात्र औरंगजेबाने पूर्वी वचन देऊनही चंपतरायाचे स्वातंत्र्य मान्य करण्यास नकार दिला त्यामुळे चंपतराय याने स्वतःच्या राज्यास स्वतंत्र घोषित केले. यामुळे औरंगजेबाने आपले अनेक सरदार चंपतरायाच्या राज्यावर पाठवून त्याचा पराभव करण्याचा प्रयत्न सुरु केला. चंपतरायानेही स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याची तयारी दर्शवली. बलाढ्य मोगल सेनेसोबत लढा देताना अखेर १६६१ साली चंपतरायाने मैदानात आपला देह ठेवला. आपल्या पतीच्या निधनाने दुःखी झालेल्या कालीकुमारीने तलवारीने आपला कंठ कापून प्राण दिले व छत्रसाल आपल्या भावांसह माता पित्याच्या प्रेमास पारखा झाला.
नाईलाजास्तव छत्रसालाने मोगलांचा सरदार मिर्झाराजे जयसिंग याच्या सैन्यात जागा स्वीकारली. १६६५ साली मिर्झा जयसिंग स्वराज्यावर चालून आला तेव्हा १५ वर्षीय छत्रसाल सुद्धा त्याच्यासोबत होता व पुरंदरच्या लढाईत त्याने चांगले कर्तृत्व सुद्धा दाखवले मात्र या कर्तृत्वाचा सन्मान फारसा केला गेला नाही याचे त्यास अत्यंत दुःख झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका केली तेव्हा त्यांची कीर्ती संपूर्ण भरतखंडात गेली व त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ छत्रसालासही पडली. पुढे जयसिंगाने छत्रसालास दिलेरखानाकडे सोपवले व दक्षिणेकडील युद्धात जयसिंगास आलेले अपयश व यामुळे औरंगजेबाने त्याचे केलेले खच्चीकरण व एकेकाळच्या बलाढ्य अशा जयसिंगाचा पुढे शोचनीय अवस्थेत आलेला मृत्यू हे सर्व छत्रसालाने डोळ्याने पहिले अशावेळी मोगलांसाठी कितीही केले तरी शेवटी आपली गत जयसिंगासारखीच होणार असे विचार छत्रसालाच्या मनात येऊ लागले.
पुढे औरंगजेबाने दक्षिणेच्या सुभ्यावर शाहजादा मुअज्जम याची निवड केली व दिलेरखानास गोंडवनाच्या मोहिमेवर पाठवले यावेळी दिलेरखान सोबत छत्रसाल होता. येथील देवगडच्या युद्धात छत्रसालाने वीरश्री गाजवून विजयश्री खेचून आणली. या लढाईत अवघ्या १६-१७ वय असलेल्या छत्रसालास खूप जखमा झाल्या होत्या. या युद्धानंतर आपल्या पराक्रमाचे कौतुक केले जाईल असे त्यास वाटले मात्र दुर्दैवाने सर्व श्रेय दिलेरखानाने घेतले व औरंगजेबास छत्रसालाचे नावही घेतले नाही.
या घटनेनंतर छत्रसाल अत्यंत निराश झाला व त्यास या पारतंत्र्यात राहण्याचा त्रास होऊ लागला. आपल्या मात्या पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्याचे विचारही त्याच्या मनात घोळू लागले होते. मात्र शक्तिशाली अशा मोगल साम्राज्यासमोर भारतातील सर्वच राज्यांनी शरणागती पत्करली असताना आपल्या एकट्याच्या बंडाचा निभाव कसा लागेल हा प्रश्नही त्याच्या समोर उभा राहत असे. याच वेळी त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी शून्यातून स्वराज्य कसे निर्माण केले व मोगल साम्राज्यास कसे हादरे दिले याची माहिती छत्रसालास होती. औरंगजेबाच्या साम्राज्याला शह देऊ शकणारे भारतात एकमेव राजे आहेत व ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या साहाय्यानेच आपण मोगल सत्तेस नेस्तनाबूत करू शकतो असा विश्वास छत्रसालास वाटलं व त्याच्या मनात महाराजांची भेट घेण्याची इच्छा घर करू लागली.
दिलेरखानाच्या सैन्यात असल्याने छत्रसालास महाराजांची भेट घेणे अशक्यप्राय होते मात्र तो केव्हा ही संधी मिळेल याची आतुरतेने वाट पाहत होता. महाताबखानाचा पराभव झाल्यावर औरंगजेबाने बहादूरखान, दिलेरखान, अमरसिंह चांदवत या सरदारांना १६७१ साली स्वराज्यावर धाडले. हे सैन्य प्रथम बागलाणात उतरले. बागलाण येथून आपण शिवाजी महाराजांची भेट घेऊ शकतो हे छत्रसालास ठाऊक होते यासाठी त्याने दिलेरखानाकडे शिकरीची परवानगी मागितली आणि आपल्या पत्नीसह छावणी सोडली आणि अत्यंत वेगाने प्रवास करून महाराजांना येऊन भेटला.
शिवाजी महाराजांना छत्रसाल भेटला त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. यावेळी छत्रसालाने शिवाजी महाराजांना अशी विनंती केली की मी आपला अंकित होऊन काम करायला तयार आहे तेव्हा तशी संधी आपण मला कृपया द्यावी. मात्र जाणते राजे असलेल्या महाराजांनी छत्रसालास मोलाचा उपदेश केला व म्हणाले की तुझ्याकडे एका राज्यसंस्थापकाची योग्यता आहे, औरंगजेबाच्या सर्वच शत्रूंनी दक्षिणेत एकाच ठिकाणी राहून त्यास त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही त्यामुळे मी जसे महाराष्ट्रातून स्वराज्य निर्मितीचे कार्य करीत आहे तसे तू बुंदेलखंड येथे राहून कर व अशा रीतीनेच आपण मोगल सत्तेला हादरे देऊ शकतो. औरगंजेब जर बुंदेलखंडात तुझ्यावर चालून आला तर मी येथे महाराष्ट्रातून मोगलांविरोधात धामधूम उडवीन आणि जर तो माझ्यावर चालून आला तर तू बुंदेलखंडात धामधूम उडव. अशा प्रकारे आपण एकमेकांना साहाय्य करून औरंगजेबास नामोहरम करू.
महाराजांचे हे मोलाचे उपदेश छत्रसालास पटले व त्याने त्वरित मोगलांची ताबेदारी सोडून बुंदेलखंड येथे जाऊन मोगल साम्राज्यविरोधात बंड उभारले व बुंदेलखंडास मोगलांच्या जोखडातून स्वतंत्र करून तेथे विजयाचा ध्वज उभारला. महाकवी भूषण सुद्धा छत्रसालाबद्दल आपल्या काव्यात म्हणतो की,
'यमुनेपासून नर्मदेपर्यंत व चंबळपासून टोंसपर्यंत छत्रसालाने आपले खङग असे तळपविले की त्याच्याशी लढण्याची योध्यांची इच्छाच मरून गेली'
स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यस्थापनेच्या उपदेशाने प्रेरित होऊन बुंदेलखंडाच्या छत्रसाल या शूर राजपुत्राने इतिहास रचला. शिवरायांच्या अतुल्य कर्तृत्वाने संपूर्ण भारतवर्षात लोकांच्या मनात स्वराज्याविषयी आत्मीयता वाटू लागली, लोकांना हा जाणता राजा एक खंबीर आधार वाटू लागला. धन्य हो शिवाजी राजा !